सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
☆ मराठी साहित्य – विविधा ☆ माणुसकीचे व्रत – भाग – 12☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
रोज वेगळा वेगळा प्रसंग समोर आ वासून उभा रहात असे. लातूर ते ढोकी पुढे कळंब रोड येडशी पर्यंत गाडीतही कत्तली होत होत्या. सर्वत्र अशांत व अस्थैर्य असे वातावरण होते. एकदा गोरा कुंभाराच्या समाधीचे दर्शन घ्यावे म्हणून निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बऱ्याच ठिकाणी हाडं आणि कवट्या पडलेल्या दिसल्या. मन बेचैन झालं.छोट्या उषा आणि प्रकाश यांना कशाचंच गांभीर्य नव्हतं. अज्ञानातच सुखी होते बिचारे! पाच वर्षाचा प्रकाश आईला कधीतरी विचारायचा “आई कापून काढतो, फुंकून टाकतो, म्हणजे काय ग” आई उत्तर न देता गप्प बसायची. या तणावातच घरातली म्हैस व्याली. दुभते सुरू झाले. दोघांनाही म्हशीची काळजी वाटायची. पेटलेले रझाकार जनावरेही पळवत होते.मारत ही होते.कधी कधी जोरजोराच्या आरडाओरड्यांनी, बंदुकीच्या आवाजांनी जनावरेही घाबरायची. आणि ‘”शब्देविण संवादू ‘”,असं डोळ्यांनी बोलायची. आई तात्या दोघेही त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या अंगावरून हात फिरवायचे.आई इब्राहिमला म्हणायची , “का हो मारतात या जनावरांना? त्यांना का जात धर्म असतो? कसल्या चुकीबद्दल आणि कुठल्या न्यायालयातली ही शिक्षा? माणसांनीच स्वतःला धर्माच्या कोशात लपेटून घेतलंय”. आई रोज सकाळी मागचं दार उघडताना हात जोडायची, आणि आपली मुलं — जनावर सुरक्षित असल्याचे पाहून, परमेश्वराचे आभार मानायची.
काही प्रसंग असे आले की आईची अत्यंत अवघड परीक्षेची वेळ आली.एकदा मागच्या अंगणात अत्यंत घाबरलेल्या, दहा-बारा मुसलमान बायका लहान मुलांना घेऊन आल्या. लहान मुलांच्यासाठी त्यांना दूध हवे होते.आणि काही वेळ आसरा हवा होता.मोठा बाका प्रसंग होता. आईला काहीच सुचेना.आसरा द्यावा तर फंदफितुरी होईल. पुन्हा विचार केला. या छोट्या निरपराध, यांचा काय दोष? यांना ना जात ,ना धर्म, ना अधर्म ! त्यांनी काय केलंय? घरात दूध असताना, उपाशीपोटी परत पाठवायची शिक्षा, त्यांना का द्यायची? परस्पर विरुद्ध विचारांनी मनात हलकल्लोळ उठला. अखेर माणुसकी जिंकली.बापुड्या जीवांना दूध देऊन मागच्या अंगणातून त्यांना लवकर परत पाठविले. असे अनेक वेगवेगळे प्रसंग ! तोंड देणे चालू होते.
कधीतरी एखादा गावकरी तात्यांकडे यायचा. ” तात्या काय करू, जित्राब उपाशी हैत. लांडग्यांनी शेत कापून न्हेल की हो.” तात्या असेल त्यातला कडबा, जात पातीचा विचार न करता द्यायचे. कठीण प्रसंगात दोघांनीही माणुसकी श्रेष्ठ ठरविली.
एके दिवशी रझाकारांनी तेरणा नदीवरील पूल उडवून दिला.एकवीस दिवस दोन्हीकडील संपर्क तुटला.दोन्ही कडून येणाऱ्या गाड्या पुढे न जाता , पुलापासूनच परत जायच्या. रेल्वेने येणाऱ्या पाण्याच्या टाक्या बंद झाल्या. कोणीही ना आले ,ना गेले , चिठ्ठ्या, निरोप ,पत्र काहीच नाही.आसपासच्या पाच सहा स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबांना गावी पाठवलं होतं. अपवाद एकटी माझी आई, आणि उषा ,प्रकाश! वातावरण आणखीच तंग आणि गंभीर झालं होतं. तरीही आई हट्टानं तिथेच राहिली होती. इब्राहिम, रसूल, मोहम्मद पुन्हा पुन्हा सांगायचे. “हम नमक हराम है ही नही। हम आपके खाये हुए नमक का हक अदा करेंगे।” असं ऐकलं की आईला थोडा धीर यायचा.
दोन्हीकडील सैन्याची कुमक वाढली. एक दिवस इब्राहिम तात्यांना सांगायला आला “.तुमची सरशी होणार आहे.निजामाचा प्रधान कासिम रझवी, पाकिस्तानात जायच्या तयारीला लागलाय.” ‘”दिव्याची ज्योत विझण्यापूर्वी मोठी होऊन मग शांत व्हावी”, तसे झाले.
दंगली करून कत्तली करून अनेकांनी हात धुऊन घेतले. अखेर निजाम शरण आला.हैदराबाद संस्थान खालसा झाले.शांतता पसरायला लागली. अत्यानंदाची लाट वहायला लागली. इब्राहिम रसूल व मोहम्मद यांनी दिलेला शब्द मोठ्या मनाने पाळला. “आता राज्य तुमचंच आहे ,आम्ही आता जातो “असं म्हणून त्यांनी ,आई तात्यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला. उषा आणि प्रकाश यांना जवळ घेऊन त्यांना प्रेमाने खाऊ दिला. दहा महिने त्यांच्याशी सहवास झाला होता. जाताना सर्वांचेच डोळे पाणावले होते.त्यांनी तात्यांना काळी फरची टोपी व टॉवेल दिला. आईनेही त्यांना साग्रसंगीत जेवायला वाढले. त्या काळातही, आई जाती-धर्म भेद न मानता माणुसकीची पूजा करीत होती. इब्राहिमने दिलेल्या काळ्या फरच्या टोपीचा पेहराव, तात्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत सांभाळला.
इतक्या संकटातून स्टेशन सांभाळले, म्हणून ढोकी गावच्या लोकांनी तात्यांचा सत्कार केला. आदरसत्काराचे शब्द बोलताना, अनेकांना आनंदाश्रू येत होते. नवऱ्याच्या एकनिष्ठतेला बायकोने खंबीरपणाने व कणखरपणे दिलेली साथ ,प्राणिमात्रांची मुलांप्रमाणे घेतलेली काळजी, कठीण व तंग परिस्थितीत ,धर्म व जातीचा विचार न करता, सांभाळलेल्या माणुसकीच्या व्रताचे ‘ मूर्तिमंत उदाहरण’ म्हणून आईचा उल्लेख केला.शब्द ऐकताना तिचा ऊर भरून आला. कृतकृत्य वाटायला लागलं.
दोघेही आज हयात नाहीत पण त्यांनी माणुसकी व प्राणिमात्रांच्या सेवाव्रताचा दीप माझ्याकडे सुपूर्द केला आहे. .आता माझी इच्छा इतकीच आहे—-” दीप हा सांभाळुनी मी ठेविला. तेवती तत्जोती राहो उज्ज्वला.
——— समाप्त.
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈