? विविधा ?

☆ पाळीव प्राणी ☆ श्री प्रसन्न पेठे ☆

माणूस खूप हुश्शार, बुद्धिमान, सामर्थ्यवान वगैरे असल्यामुळे तो आपल्या बुद्धीच्या ताकदीवर अनेक पक्ष्याप्राण्यांना आपल्या घरी “पाळतो”!!  ब-याचदा तो “सिंगल” प्राणी पाळतो, क्वचित पक्ष्यांच्या “नर-मादी” अश्या जोड्याही पाळतो किंवा बैल, घोडे, गाढवं अश्या “मालवाहू” केसेसमधे दोन “नरां”नाही पाळतो…

अश्या “कुत्रा, मांजर, साप, सरडा, अस्वल, ससा, कासव, घोडा, गाढव, हत्ती, वाघ, सिंह, पोपट, काकाकुवा, मोर, मासे” वगैरे पाळलेल्या प्राण्यांनी मग त्यांचं मूळ निसर्गदत्त हॕबिटॕट आणि त्यांचे मूळ जेनेटिक आईबाप, आज्जीआजोबा, काकाकाकू, मामामामी वगैरे  सोडून आपल्या ह्या नवीन मानवी आई-बाप, आज्जीआजोबा, काकाकाकू, मामामामी वगैरेंना आपल्या मूळ चतुष्पाद किंवा मूळ पंखवाल्या नातेवाईकांसारखंच “आपलं” मानून मग ह्यांच्या नवीन घरी अॕडजस्ट होत जगायचं असतं… आणि जमेल तसं ‘मनोरंजन’ही करायचं असतं!!…

त्यातही गाय, बैल, घोडा, गाढव, हत्ती वगैरेंना या नवीन आईबाबांच्या थेट घराच्या आत हाॕलमधे, किचनमधे, बेडरुममधे केवळ आकारमानामुळे  प्रवेश नसतो (त्यांचं बोनसाय करता आलं असतं तर तोही मिळाला असता! ?) मात्र कुत्रा, मांजर, ससे, गिनीपिग्ज, बॕजर्स, सरडे, साप, माकडं, पक्षी वगैरेंना घरात कुठेही मुक्त प्रवेश असतो… त्यांना घरातल्या इतर माणसांसारखं “बोलता” येत नसलं तरी माणसांचं बोलणं शिकायलाच लागतं… त्यातही जनरली ‘घराबाहेर बांधलेल्या’ प्राण्यांशी मेजाॕरिटीली त्या त्या मानवी आईबापाच्या मातृभाषेत बोललं जातं.. पण घरात कुठ्ठेही बागडू शकणा-या कुत्रा, मांजर, माकड, ससा, कासव, सरडे, बॕजर, पक्षी वगैरे घरातल्या मेंबर्सशी (मुलगा, मुलगीच असतात हां का ते!) शक्यतो “इंग्लीश”मधे बोललं जातं! ?  कमाल आहे नाही?  ..म्हणजे आपण मानव आपल्या जन्मदात्या आईबाबांची भाषा सोडून जगातल्या इतर माणसांच्या दोनतीन इतर भाषा लिहिता-बोलता येण्यासाठी धडपडून, त्या बोलता यायला लागल्या तर कोण उड्या मारतो, काॕलर टाईट करुन घेतो!! …पण मानवापेक्षा कमी बुद्धी असणारे हे पाळीव प्राणी मात्र त्यांच्या जेनेटिक आईबाबापास्नं तोडले जाऊन जगाच्या पाठीवर, जबरदस्तीनं जगात कुठलीही भाषा बोलणा-या मानवी घरात गेले तर त्यांना लगेच त्या त्या मानवी आईबाबांची भाषा “समजायला” लागते (हे ते ते आईबाप छातीठोकपणे  सांगतातच!!) म्हणजे मग मानव जास्त हुषार की हे सारे पाळीव प्राणी? ? ? ?

अश्या त्या जेनेटिक आईबाबापास्नं दूर मानवी आईबाप स्विकारावा लागलेल्या ह्या सा-या प्राण्यांना, मग त्या नवीन मानवी घरातल्यांचंच नव्हे, तर घरात येणा-या पाहुण्यांचंही मनोरंजन करावं लागतं… आलेला पाहुणा कितीही अनोळखी असला तरी घरातल्या मानवी आईबाबांनी सांगितल्यावर त्या पाहुण्याच्या जवळ जाऊन बसावं लागतं… लगट करावी लागते… डोक्यावर थोपटून घ्यावं लागतं.. मानेखाली कुरवाळून घ्यावं लागतं… (हे सगळं त्या त्या आईबापाची ही अमानवी मुलं निमूट करत असली, तरी त्या आईबाबांची सख्खी मानवी मुलं मात्रं कधीच करत नसतात ही गंमतच!! ??

एक असंही मनात आलं मानवापेक्षा प्रगत असणा-या आणि मानवापेक्षा कॕयच्यॕकॕय वेगळा, विचित्र देह, भाषा असणा-या कुठल्या परग्रहवासीयांनी समजा म्या मानवाला (किंवा तुम्हाला कुणालाही!) असं एकेकटं उचलून त्यांच्या घरात नेऊन “पाळायला” सुरुवात केली, तर मी (आणि तुम्ही सगळेच) नक्की काय प्रकारे मनोरंजन करु त्या नवीन आईबाबांचं?  “प्रसन्न ये ..हे खा… बबन उडी मार… निशा झोप… राहुल ओरडू नको, थांब पट्टा काढते गळ्यातला, मग गपचूप पडून राहा..” वगैरे त्यांच्यात्यांच्या परग्रहावरच्या भाषेत बोलल्यावर म्या प्रसन्न कसा उड्या मारेल त्यांच्या कोचावर, मांडीवर?.. आपल्या जेनेटिक आईबाबांच्या कुशीचा स्पर्श विसरुन कसे त्या वेगळ्याच आईबाबांच्या बेडवर त्यांच्या कुशीत रात्री झोपेन मी????  ते खातात तेच अन्न “प्रसन्न eat!” म्हणून मला दिल्यावर निमूट खाईन मी? किंवा human-food म्हणून त्यांच्या इथल्या ‘पेट-शाॕप’मधून मिळणारं फूड आपल्यासमोर ओतल्यावर बिनतक्रार खाऊ आपण सारे मानव? आणि असं सर्व करत एकाकी जगू त्या जेनेटिक नसणा-या नवीन आईबाबांच्या घरी?..

हे असंच डोस्क्यात आलंय कायकाय..

 

©  श्री प्रसन्न पेठे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments