श्री उदय गोपीनाथ पोवळे
मनमंजुषेतून
☆ गिरगावातला गोविंदा ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
श्रावण महीना सुरू झाला की आपल्या सणांची सुरवात होते आणि नकळतच मन गिरगावात पिंगा घालायला लागते.
नाग पंचमी, राखी पौर्णिमा ह्यानंतर आठवड्यानी येणारी गोकुळाष्टमी हा सण गिरगावकर मोठ्या उत्साहाने आणि जोशाने साजरा करत.
१९६३ सालचे ‘ब्लफमास्टर’ सिनेमा मधील शम्मी कपूरचे गोविंदयाचे गाणे हे गिरगावातील मांगलवाडीत चित्रित झाल्याने
गिरगावातील गोविंदयाला खूपच प्रसिद्धी मिळाली. संगीतकार कल्याणजी आणि आनंदजी हे तेंव्हा गिरगावात रहात असल्याने त्यांनी गिरगावातील गोविंदयाचे हुबेहूब चित्रण करून गिरगावातील गोविंदयाचे जगभर दर्शन घडविले.
गिरगावात गोविंदा हा प्रत्येक वाडीमध्ये साजरा होत असे. प्रत्येक वाडीची गोविंदा टोळी ही आपल्या वाडीच्या हंड्या फोडल्या कि आपल्या आजूबाजूच्या दुसऱ्या वाडीच्या हंड्या फोडायला बाहेर पडत असत. ‘गोविंदा आला रे आला मडकी सांभाळ ब्रिजबाला’ तसेच ‘एक दोन तीन चार, XXX दादाची पोरे हुशार’ असे गात आणि नाचत गल्लोगल्ली फेरफटका मारला जायचा. तेंव्हा गिरगावात दादा लोकांची कमी नव्हती. जो गोविंदयाला जास्त पैसे देईल त्याचे नाव जोडले जायचे. हे करताना डावा हात पुढच्याच्या पॅन्टला धरून, कमरेत वाकून, उजवा हात हलवत एक एक पाऊल ठराविक लयीत टाकला जायचा. ह्याचे चित्रणही ब्लफमास्टरच्या गाण्यामध्ये व्यवस्थित केले आहे. त्या गाण्याच्या चित्रीकरणात मूळचे गोविंदा खेळणारे दिसत आहेत. हाल्फ पॅण्ट आणि बनियन ह्यावर गोविंदा बाहेर पडत असे. वाडीतील काही जण नेवैद्य म्हणून फळांचे ताट नाहीतर गोड शिरा असे गोविंदा समोर ठेवत असत. गोविंदावर सर्व बाजूनी पाण्याचा वर्षाव केला जायचा. त्यामध्ये एखादयाकडून गरम पाणी अंगावर पडल्यास, अजून पाणी टाकण्याची मागणी केली जायची. ‘तुमच्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा’ असे मोठ्याने ओरडून वाडीतील रहिवाश्याना अजून पाणी टाकण्यास उद्युक्त केले जायचे. काही टवाळ मुले लांबूनच पाण्याचे फुगे मारायचे. ते फुगे मारण्यात एवढं तरबेज असत कि ज्याला फुगे लागायचे त्याला कळायचेही नाही कि फुगे आले तरी कुठून. वरून होणारा पाण्याच्या फुग्यांचा मारा चुकवत वाडीच्याबाहेर पडणे म्हणजे एक मोठे दिव्यच असे.
पूर्वी गोविंदा हा राष्ट्रीय सण म्हणूनच मानला जायचा आत्तासारखे राजकीय सणाचे स्वरूप त्याला नव्हते. त्यामुळे टी शर्ट आणि मोठ्या बक्षिसांच्या थैल्यांचे आमिषही नव्हते.
काही मोठ्या वाड्यांचे गोविंदा बरोबर एक सीन ही असे. एका ट्रक मध्ये वाडीतल्याच मुलांना चेहऱ्यावर रंग लावून पुराणातील एखाद्या प्रसंगाचे दर्शन घडत असे. नंतर काही राजकीय घडामोडींचे किंवा त्यावेळेच्या ज्वलंत घडामोडीचे विषय घेऊन सीन बनवले जायचे.
बहुतेक हंड्या ह्या तीन ते चार थराच्या असायच्या. पूर्वी हंड्यांमध्ये उंचीची स्पर्धा नव्हती. हंड्या फोडून थोडे फार जे काही पैसे मिळायचे त्यामधून सगळ्यांना वडापाव मिळाला तरी बरे वाटायचे आणि जर काही जास्त प्रमाणात पैसे मिळाले असतील तर रात्री भुलेश्वरच्या कन्हैया ह्याच्या किंवा किका स्ट्रीटच्या पाव भाजीच्या गाडीवर त्याचे सेलिब्रेशन होत असे.
त्याकाळी गिरगावात ठाकूम – माकूम, ढोल – ताशा हि वाद्य जाऊन कच्छी बाजा आणी ढोल हा जास्त वापरात येत होता. १९५१ च्या अलबेला सिनेमात संगीतकार सी रामचंद्रांनी त्याचा पहिला वापर हा भोली सुरत ह्या गाण्यासाठी केला होता.
कच्छी बाजा आणि ढोल ह्याशिवाय गोविंदयाला पूर्णत्व मिळत नसे. तसे वाजवणारे खूप जण होते पण सनईवर अबूभाई आणि पोंक्षे, विजय चव्हाण, इब्राहिम, परश्या असे मोजकेच प्रमुख ढोल वाजविणारे ठरवायचे असले कि वर्गणी जमवण्यावर जोर द्यायला लागायचा. त्यासाठी वाडीतले सगळे एकवटून कामाला लागायचे. एकदा का गोविंदयाच्या दिवशी कच्छी बाजाचा आवाज यायला लागला कि आपोआप वाडीतले सगळे जमा होऊन आणि आपसूक टोळी तयार होऊन गोविंदा नाचायला सुरवात होत असे. कधी कधी दोन गोविंदा समोरासमोर आले आणि त्यामध्ये वरील दिग्गज वाजवणारे असले कि जुगलबंदी हि व्हायचीच आणि ऐकणाऱ्यांसाठी आणि नाचणाऱ्यांसाठी तो एक आयुष्यभरासाठी आठवणींचा ठेवा असायचा.
पूर्वी राजेश खन्ना रहात असलेली ठाकुरद्वारच्या कोपऱ्यावरची सरस्वती निवास येथेच एक उंच हंडी बांधली जायची. ती हंडी फोडायला लालबाग, उमरखाडी असे लांबून गोविंद्याच्या टोळ्या येत असत. एखादा गोविंदा ती हंडी फोडायचा प्रयत्न करतोय असे समजले कि पूर्ण ठाकूरद्वारचे चारही रस्ते खचाखच भरून जायचे. प्रत्येकजण एक विलक्षण अनुभूतीचा साक्षीदार होण्यासाठी धडपडत असे. पहिले तीन थर आरामात लावले जायचे. चौथ्या थरापासून थरार चालू होयचा. पाचवा थर हा फक्त दोन जणांचाच असायचा. प्रत्येकाचे श्वास रोखले जायचे. पाचव्या थरानंतर हंडी फोडायला दोन एक्के का तीन एक्के म्हणजे एकावर एक असे दोघे का तिघे लागतत ते ठरायचे आणि हंडीला कसाबसा फोडणाऱ्या गोविंदाचा हात लागायचा आणि हंडी फोडली जायची. हंडी फोडणारा आणि सगळे थर लगेच हळूहळू सावरत खाली यायचे आणि एकच जल्लोष व्हायचा. कच्छी बाजा जोरात वाजायला लागायचा आणि नुसता गोविंदाच नाही तर सगळेच जोशात नाचायला लागायचे. हंडी फुटल्याचे एक वेगळेच समाधान सगळ्यांच्या चेहऱ्यावर असायचे. संध्याकाळ पर्यंत सगळीकडे असेच उत्साहाचे वातारण असायचे. सकाळपासून गजबजलेला गिरगाव रात्रीमात्र शांत आणि थकलेला असायचा पण तो एका दिवसापुरताच कारण दुसऱ्यादिवशी पासून लगेच गणेशोत्सवाच्या तयारीला गिरगावात सुरवात व्हायची.
अजूनही गिरगाव सोडून गेलेला गिरगावकर गोविंदयाच्या दिवशी एकतर गिरगावातील गोविंदयाला हजेरी लावतो नाहीतर जेथे असेल तेथे गिरगावचा माहोल बनवून गोविंदा साजरा करतो. पण त्याचे मन मात्र गिरगावातच घिरट्या घालत रहाते हे ही तितकच खरं.
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
ठाणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈