सौ.ज्योत्स्ना तानवडे
जीवनरंग
☆ खेळी…भाग 3 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
(नवऱ्याच्या विनवणीनं तिनं मुलांना जवळ घेतलं आणि ती घरात परत गेली. )
हे आठवून रागिणीने एक विचार पक्का केला. तिने मधुराला शेवंताची सर्व हकीकत सांगितली आणि आज कोर्टात एकाच नव्हे तर दोन्ही मुलांचा ताबा रितेशला देण्याचा बेत सांगितला. हे ऐकून मधुरा रडू लागली.
” मॅडम,दोन्ही मुलांना देऊन मी काय करू? मला नाही जमणार ते.”
” मधुरा, तुम्ही आधी शांत व्हा. अहो तुमच्या दोघांच्या भांडणात मुलांची फरपट व्हायला नको. मुलं खूप लहान आहेत. निदान त्या बहीणभावांची तरी ताटातूट व्हायला नको. तुम्ही मुलांची काळजी घ्यायला सक्षम आहात. कोर्टही इतक्या लहान मुलांना आई पासून वेगळं करत नाही. घाबरू नका.पण विचार करा ना, कुठलंही लहानसं सुद्धा काम न करणारा रितेश दोन मुलांची जबाबदारी घेऊ शकेल का ?”
आता मधुरा थोडी शांत झाली. म्हणाली ,”खरं आहे मॅडम. रितेशला कसल्याच कामाची सवय नाही. मुलांचे तर त्याने काहीच केलेले नाही. भीतीमुळे तर मुलं त्याच्याजवळ पण जात नाहीत.आतातर ती दोघजण त्याच्याकडे जायला मुळीच तयार होणार नाहीत.त्याचा नातेवाईकांशी संपर्क नाही,कुणाकडे येणं-जाणं नाही. इतकं कशाला त्याच्या या विक्षिप्त वागण्यामुळे त्याच्या आईवडिलांनी सुद्धा त्याच्याशी संबंध तोडलेले आहेत.सगळीकडूनच तो अगदी एकाकी पडलेला आहे.”
यावर रागिणी म्हणाली,” हेच सांगतेय मी. अशा परिस्थितीत कोर्ट त्याला एवढ्या लहान मुलांचा ताबा देणार नाही. पण फक्त दुसऱ्यांनाच दोष देणाऱ्यांना स्वतःच्या कर्तव्याची जाणीव होऊ दे ना. वडील म्हणून दोन्ही मुलांची जबाबदारी त्याचीसुद्धा आहेच ना. तुमच्यावर सर्व ढकलून हा नामानिराळा राहू शकत नाही.”
“बरोबर आहे मॅडम. पण मुलांच्या भवितव्याच्या बाबतही मी जबाबदाऱ्या,कर्तव्य असल्या व्यवहारांचा कसा विचार करू ? मी आई आहे त्यांची.” मधुरा कासावीस झाली होती.रागिणी म्हणाली,” मधुरा, मी तुमच्या भावना समजू शकते. पण कोर्ट प्रकरण म्हटलं की व्यवहार आलाच. तेव्हा आपण भावना जपूयात आणि त्याला व्यवहार जपू दे.”
” म्हणजे नक्की काय करायचं आपण ? “
रागिणीने समजावलं,” आपल्या भांडणापायी मुलांची वाटणी होऊ नये. त्यांचे हाल होऊ नयेत. त्यांचे भावविश्व उद्ध्वस्त होऊ नये म्हणून तुम्ही एकाच नाही तर दोन्ही मुलांचा ताबा वडिलांकडे देण्याला संमती द्यायची. आईच्या अधिकाराने तुम्ही रितेशच्या वागण्यावर लक्ष ठेवायचे. त्यांनी मुलांची कसलीही आबाळ न करता नीट काळजी घ्यायची. यात थोडी जरी हेळसांड दिसली तरी त्याने मुलांचा ताबा तुम्हाला परत द्यायचा आणि मुलांवरचा त्याचा अधिकार सोडून द्यायचा,असे प्रतिज्ञापत्र मुलांचा ताबा घेतानाच त्यांनी कोर्टात लिहून द्यायचे.यामुळे त्याच्यावर कोर्टाचा अंकुश राहील. तुमचे मुलांशी नाते अबाधित राहणार आहे.काळजी करू नका.रितेश सारखी फक्त स्वतःचाच विचार करणारी माणसं अशा जबाबदाऱ्या घेणं आणि त्यासाठी कायद्याच्या कचाट्यात अडकायच्या भानगडीत पडत नाहीत. तो फक्त तुम्हाला त्रास देण्यासाठी हे करतो आहे. घटस्फोट घेऊन एकट्याने राहणे सुद्धा त्याला जमणार नाही. तो कोलमडून पडेल. बघा तुम्ही.”
” एकदम खरं हे आहे मॅडम. पण रितेश एवढा वाईट नाही हो.अहो सुरुवातीला आमचे खूप चांगले संबंध होते.कशामुळं हे संशयाचं भूत त्याच्या मानगुटीवर बसलंय कोण जाणे ? आपल्या या प्रस्तावामुळे हे भूत उतरून तो ताळ्यावर येणार असेल तर अशी संमती द्यायला माझी तयारी आहे . या प्रयत्नाने आमचा संसार जर पूर्वपदावर येणार असेल तर चांगलंच होईल. त्यासाठी मी रितेशला एक संधी अवश्य देईन. नाही तर आहेच”
” मधुरा, सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा आता काळजी सोडा.” रागिणीने इतके समजावल्यावर मधुराने मनातली धास्ती दूर ठेवत चांगल्या भविष्याच्या अपेक्षेने दोन्ही मुलांचा ताबा देण्याच्या विचाराला संमती दिली आणि ती कोर्टात जाण्यासाठी केबिन मधून बाहेर पडली.
समाप्त
© सौ. ज्योत्स्ना तानवडे
सातारा
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈