श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 102 ☆
☆ वाळवी ☆
प्रेमपत्रे कागदाची, मोठ्या कष्टाने जपली
गोड स्वप्नांना ह्या माझ्या, कशी वाळवी लागली
अक्षरे ही मौन होती, नाही काहीच बोलली
कोणा घाबरून त्यांनी, मान खाली ही घातली
कागदांची ह्या चाळण, अक्षरांचा झाला भुगा
राख स्वप्नांची सांडली, दिला नशिबाने दगा
साठलेले डोळ्यांमध्ये, होते सारे आठवले
एकएका अक्षराला, आज कोंब फुटलेले
देह कागदाचा होता, संपविण्या साधा सोपा
नष्ट करून दाखवा, माझ्या मनातला खोपा
प्रेमपत्रांचा हा गंध, साठलेला ह्या मनात
मन रेंगाळते आहे, भूतकाळाच्या वनात
गेली पत्रे जाऊदेत, जपू श्रद्धा काळजात
तुझी आठवण येता, अश्रु जमती डोळ्यात
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈