सौ. अमृता देशपांडे

? जीवनरंग ?

☆ लाॅकडाऊन लग्न… ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

प्रिया आणि प्रथमेशचं लग्न झालं. प्रेम विवाह असल्याने जास्तच दणक्यात झालं. नातेवाईक,  मित्रपरिवार सगळे जण मिळून 70-75 माणसे प्रकाश व प्रगती जाधवांच्याकडे चार दिवस रहायलाच होती. सासर त्याच गावात असलं तरी ते दोघं IT engineer असल्याने  बेंगलोर ला रहाणार होते. त्यांना लगेचच तिकडे जायचे होते.

लग्नाआधी मेंदी,  हळद,  संगीत वगैरे सर्व हौसेनं आणि मजेत झालं. दुसरे दिवशी प्रियाच्या सासरी सत्यनारायणाची पूजा होती, त्यांनी तिच्या माहेरच्या सर्वांना बोलवलं होतं. पूजेच्या दुस-याच दिवशी  प्रिया  प्रथमेश तिच्या माहेरी येऊन लगेचच बेंगलोरला जाणार होते.

घरातले सर्व नातलग अजून निघायचेच होते परत. प्रिया  लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी येणार म्हणून सगळेजण तयारी करून वाट बघत होते.  तितक्यात टीव्हीवर breaking news  आली.   सर्व देशात लाॅकडाऊन जाहीर केले होते.  कोविड 19 महामारीने हळूहळू  देशभरात कब्जा केला. सावधगिरी आणि सुरक्षिततेची खबरदारी अत्यावश्यक आहे,  हे जाणून पंतप्रधानांनी लगेच काटेकोरपणे आदेश दिले होते.  सतत बातम्या येत होत्या.  पण चिंताजनक परिस्थिती इतकी वा-यासारखी फैलावेल,  अशी कल्पनाही नव्हती.

लाॅकडाऊन झाल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले. वाहतूक बंद केली गेली. सर्व काही जिथल्या तिथे थांबले. सगळा देश गोंधळलेल्या आणि घाबरलेल्या अवस्थेत होता. टीव्ही वरच्या बातम्यांनी भीतीत आणखी भर पडत होती. लाॅकडाऊन मुळे आलेल्या पाहुण्यांना तिथेच रहावे लागले. लग्नघरात जवळ जवळ 50-55 लोक एकाच ठिकाणी अडकून राहिले. त्यात वीस पंचवीस स्त्रिया,  आठ-दहा मुले, आणि बाकीचे पुरुष  असा गोतावळा होता. त्यात लग्नाच्या चार दिवसासाठी नेमलेला स्वयंपाकी ही होता. त्यालाच पुढे काही दिवस काम चालू ठेवायला सांगितलं. कारण तो शेजारच्या गावचा असल्याने त्याला तिथेच रहावे लागले.

दोन दिवस असेच संभ्रमात गेले. नंतर मात्र परिस्थितीचं गांभीर्य जाणवू लागलं. नातलगांना सुद्धा पाहुण्यांच्या घरात रहाणे अवघड वाटू लागले. पण दुसरा उपायच नव्हता ना!

तेव्हा प्रियाच्या बाबांनी सर्वांना आधार दिला. ” परिस्थितीच अशी निर्माण झाली आहे, त्यामुळे सर्वजण मनात अवघडलेपण न धरता शांतपणे रहा. ही वेळ एकमेकांना आधार देण्याची आणि सावधगिरी बाळगण्याची आहे. आपणही सर्वजण योग्य त्या खबरदारी घेऊन राहू या ” . प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून कामे वाटून घेतली. आर्थिक भारही उचलला. मनात भीती होतीच, एकत्र रहाण्यातही आनंद होता. आठ दिवस,  पंधरा दिवस, महिना गेला, पण लाॅकडाऊन उठण्याची काही चिन्हे दिसत नव्हती.

घरातल्या बायका स्वयंपाक घरात मग्न होत्या. पुरूष ही अनेक कामात मदत करत होते. लहान मुलांची मज्जा होती . खाऊ आणि खेळू!

प्रियाची आई स्वयंपाक घरात  सर्व देखभाल स्वतः करत होती.  तिची भाची, चुलत भावाची मुलगी,  (जो भाऊ कोल्हापुरजवळच्या नागर गावात रहात होता, ) मदत करत होती.  ती जन्मतः च मुकी होती. तिचं नाव  मुग्धा. पन्नाशीला आली होती.  कामात हुशार. तब्येत ठणठणीत.  नेहमी हसतमुख असे.

प्रियाचे बाबा सगळीकडे लक्ष ठेवून होते. त्यांच्या अनुभवी नजरेनं एक गोष्ट हेरली,  प्रियाचा मामेभाऊ अश्विन आणि प्रियाच्या आत्याची नणंद रोमा यांची जास्तच मैत्री झाली आहे.  मैत्रीच्या पुढचं पाऊल आहे हे जाणवलं होतं त्यांना..प्रियाच्या मामीलाही शंका आलीच होती. प्रकरण मामा मामी आणि आत्या काका यांच्या चौकटीत  प्रविष्ट झालं.

तर दुसरीकडे प्रियाची धाकटी आत्या मीना, जी बॅकेत नोकरी करत होती,  तिच्या अति हट्टीपणा आणि अटींमुळे तिचे लग्न लांबले होते. चाळीशी ओलांडली होती. प्रियाचं लग्न झालं , आता तरी आपलेही लग्न व्हावे, ही प्रबळ इच्छा तिच्या मनात निर्माण झाली. आणि काय योगायोग ? तिची ओळख महेश शी झाली. महेश हा प्रकाश जाधवांच्या मित्राचा मुलगा, प्रियाच्या लग्नाला आला होता. काही कारणाने तोही वयाच्या चाळीशी पर्यंत अविवाहित राहिला होता. मीनाच्या आणि त्याच्या ओळखीचं रूपांतर विवाह बंधनाच्या समजूतदारपणात झालं. मीनानं आपल्या वहिनीला,  प्रगतीला मनातलं सांगितलं.  ते तिच्या भावापर्यंत पोचवायचं काम प्रियाच्या आईनं वेळ बघून केलं. प्रकाश नी महेशच्या वडिलांना फोनवर बोलून कल्पना दिली.  लाॅकडाऊन जरासं शिथिल झाल्याबरोबर येतो म्हणाले.

घरात आता लाॅकडाऊन रूटीन पद्धतीने कामे होत होती. दुपारच्या जेवणानंतर पत्ते,  कॅरम, बुद्धिबळ यांचे डाव रंगू लागले. दिवसें दिवस कोरोना केसेस वाढत होत्या.  पण इथे प्रकाश आणि त्यांचे मोठे काका चिंतन यांनी अतिशय काळजीपूर्वक घराचे व्यवस्थापन सांभाळले.  मास्क आणि सॅनिटायझर  उपलब्ध करणे, स्वच्छता, सुरक्षित अंतर राखणे या बाबतीत डोळ्यात तेल घालून काळजी घेतली. चिंतनकाका हल्लीच निवृत्त झाले होते. मुंबईत रहात होते.  प्रकाशनी खूप आग्रह धरला म्हणून ते प्रियाच्या लग्नाला आले होते. साठाव्या वर्षीही अतिशय स्मार्ट आणि तरतरीत होते.लग्नघरातल्या सर्व ञकार्याची जबाबदारी त्यांनी आपणहून स्वीकारली आणि नियोजनबद्धतेने पार पाडली. प्रियाची आई म्हणाली,

” काका,  प्रियाचं लग्न इतकं छान पार पडण्यात तुमचा फार मोलाचा हातभार आहे हं! तुम्ही आलात म्हणून छान वाटले. खूप खूप धन्यवाद. ” सर्वांनी मनापासून त्यांना दुजोरा दिला. तेव्हा काकांच्या डोळ्यातले पाणी प्रियाच्या बाबांच्या आणि आईच्या नजरेतून सुटले नाही. गरीबी मुळे काकांचे लग्न होऊ शकले नाही.  इतर जबाबदा-याही होत्या. पण आता आर्थिक परिस्थिती ही छान होती. स्वतःचे घर होते.  दुसरेच  दिवशी प्रियाच्या आईवडिलांनी आपसात काही वाटाघाटी करून चिंतनकाकांशी विचारविनिमय केला. आई मुग्धाशी बोलली, अचानक समोर आलेल्या प्रस्तावामुळे ती गडबडून गेली.    प्रिया च्या आईने मुग्धा च्या वडिलांशी फोनवरुन संपर्क करून ” ही संधी सोडायची नाही ” असा विचार स्पष्ट केला. मुग्धा चे वडील चिंतनला ओळखत होते.  त्यामुळे बहिणीवर विश्वास ठेवून मान्य केले.

प्रियाच्या लग्नाचा मांडव अजून तसाच होता. या शुभशकुनी मांडवाने आणखी तीन लग्नघरांच्या दारी तोरण बांधले.

लाॅकडाऊन ने माणसांना स्वतःकडे लक्ष द्यायला शिकवलेच, पण स्वतःला ओळखून गरजेइतकंच आणि उपलब्ध आहे त्यात आनंद मानून सुखी समाधानी होण्याचं तंत्रही शिकवलं. वर्षोनूवर्ष डोक्यात नको ते अहंगंड घेऊन आलेल्या सुखाला डावलणारी मने लाॅकडाऊन च्या परिस्थितीमुळे स्वच्छ झाली.

लाॅकडाऊन उठण्याबरोबर तिन्ही लग्न मर्यादित व-हाडासमवेत पार पडली.

अश्विन आणि रोमा, मीना आणि महेश,  चिंतन आणि मुग्धा यांच्या पाठोपाठ लग्नाबरोबरच  प्रकाश आणि प्रगती च्या लग्नाचा 25 वा वाढदिवस समारंभ तितक्याच मजेत साजरा झाला.

 

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा 

9822176170  

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Shyam Khaparde

सुंदर कहानी बधाई