जीवनरंग
☆ शिवाजी सावंत स्मृतीदिन विशेष – स्मरण मृत्युंजयकारांचे…. ☆ श्री आनंदहरी ☆
आपल्या शब्दसाहित्याने मृत्युवर जय मिळवलेल्या , अजरामर झालेल्या,मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांचा आज स्मृतीदिन .
जीवनातील काही आठवणी या अमिट असतात. त्यातही बालपणातील, शालेय जीवनातील काही आठवणी तर आपण काळीज-कोंदणात जपून ठेवत असतो.. अशीच एक आठवण मृत्युंजयकार यांना पाहिल्याची, भेटल्याची आणि ऐकल्याची.
१९७२-७३ चे शैक्षणिक वर्ष. न्यू इंग्लिश स्कुल ,पेठ मध्ये आठव्या इयत्तेत शिकत होतो. शालेय वय हे संस्कारक्षम वय.. ओल्या मातीला हवातसा आकार देण्याचे वय.. आणि म्हणूनच असेल शाळेमध्ये विविध कारणांनी साहित्यिक, कलाकार यांना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी बोलावण्याची परंपरा शाळेने जोपासलेली. त्या परंपरेनुसार शाळेत मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांना निमंत्रित केलेले. ते त्यावेळी राजाराम हायस्कुल, कोल्हापूर येथे शिक्षक होते. मृत्युंजय कादंबरी प्रचंड गाजलेली होती, गाजत होती पण तरीही ते पेठ सारख्या ग्रामीण भागातील शाळेत आलेले.
त्यावेळी जे.के.दैव हे इतिहासाचे शिक्षक होते.साहित्य, नाटक यांची प्रचंड आवड असणारे.. रसिक वाचक म्हणून मृत्युंजयकारांचे मित्र असलेले. त्यांनी त्यांना आमंत्रित केले होते. लष्करातील अधिकाऱ्यासारखे रुबाबदार व्यक्तिमत्व असणाऱ्या शिवाजी सावंतांचे प्रथम दर्शनच आदर निर्माण करणारे.. प्रेमात पडणारे.
शाळेच्या ग्रंथालयात ‘मृत्युंजय ‘ होतीच. माझ्यासह काही विद्यार्थ्यांनी त्यावेळच्या आकलनशक्ती नुसार वाचलेली आणि कार्यक्रमाच्या अगोदरच काही दिवस पाहुण्यांचा सविस्तर परिचय करून देण्याच्या शाळेच्या प्रथेनुसार सर्व विद्यार्थी वर्गाला परिचित झालेली व्यक्ती समोर पाहून मनात आनंदघन बरसू लागलेले.
मृत्युंजयकार बोलायला उभे राहिले. शब्द जणू जिव्हेवर येण्यासाठी आतुर झाले असावेत अशी ओघवती, काळजाला साद घालणारी भाषा.. त्यांचे बोलणे आणि आपले ऐकणे संपूच नये असे प्रत्येकाला वाटायला लावणारे वक्तृत्व. त्यांनी मृत्युंजयचा सारा निर्मिती प्रवास कथन केला.. कुरुक्षेत्राचा त्यांनी केलेला प्रवास, कर्णाबद्दलच्या लोककथा, दंतकथा, काही ग्रंथांचा अभ्यास, चिंतन, मनन ते विदित करत होते आणि आम्ही सर्व सहप्रवासी झालो होतो.
मृत्युंजयकारांनी त्या क्षणी मनात चिरंतन असे आदराचे स्थान निर्माण केले. मृत्युंजय नावाप्रमाणेच अजरामर अशी साहित्यकृती. रसिकवाचकांचे अढळ प्रेम लाभलेली, त्यांच्या मृत्युंजय, छावा, युगंधर या साऱ्याच साहित्यकृतींना राज्य शासनाचे, साहित्य अकादमीचे आणि नामवंत मानले जाणारे अनेक पुरस्कार मिळाले..
भारतीय साहित्यजगतातील नोबेल पुरस्काराइतकाच सर्वश्रेष्ठ मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार भारतीय ज्ञानपीठच्या संस्थापक अध्यक्षा रमाबाई यांच्या प्रेरणेने त्यांचे पती श्री. साहू शांती प्रसाद जैन यांनी १९६१ ला द्यायला सुरुवात केली होती. त्यानंतर १९८३ सालापासून मातोश्री मूर्तिदेवी यांच्या स्मरणार्थ भारतीय संस्कृती व तत्वज्ञान यावरील भारतीय भाषेतील ग्रंथासाठी पुरस्कार द्यायला सुरुवात केली. ज्ञानपीठ इतकाच महत्वाचा असा मूर्तिदेवी पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार १९९४ साली ‘ मृत्युंजय ‘कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना देऊन सन्मानित करण्यात आले. मराठीला मिळालेला हा एकमेव पुरस्कार आहे. मृत्युंजयकारांच्या साहित्यकृतीं अनेक भाषेत भाषांतरित ,अनुवादित झाल्या आणि गाजल्याही. या साऱ्या साहित्यकृतींना रसिक वाचकांचे अढळ प्रेम लाभले आणि आजही लाभत आहे.
शिवाजी सावंतांच्यामुळे आधी कर्ण भेटला.. समाजव्यवस्थेचा, समाज विचारधारेचा नाहक बळी ठरलेला, जन्मताच जन्मदात्या आईच्या मातृसुखाला पारखा झालेला पण अधिरथ व राधा या पालनकर्त्या आई वडिलांचे प्रेम लाभलेला, आयुष्यभर खऱ्या अर्थाने उपेक्षितच ठरलेला कर्ण..
छावा मध्ये छत्रपती संभाजी महाराज भेटले. राजकारणाचे नाहक बळी ठरलेले, जन्मापासून जन्मदात्या आईच्या मातृसुखाला पारखे झालेले पण जिजाऊ आणि धाराऊ चे निर्व्याज प्रेम लाभलेले, राजकारणामुळे आयुष्यभर विनाकारण प्रवादांनी घेरलेले उत्तुंग व्यक्तिमत्व..
युगंधर मध्ये कृष्ण भेटला. तोही जन्मदात्या आईच्या मातृसुखाला पारखा झालेला पण नंदराय आणि यशोदेचे निर्व्याज प्रेम लाभलेला.. महाभारतातील देवपदाला पोहोचलेली व्यक्तिरेखा.
या महावीर असणाऱ्या तीनही नायकांची आयुष्य समाप्ती ही ते निशस्त्र असताना झाली.. कर्णाची युद्धभूमीवर , छत्रपती संभाजी राजांची शत्रूच्या कैदेत स्वराज्यासाठी अनन्वित छळ सोसत..मनाला व्यथित करणारी, डोळ्यात अश्रू आणि त्वेष, चीड आणणारी… आणि कृष्णाची झाडाखाली निवांत बसला असताना व्याधाचा बाण पायाच्या अंगठ्यात लागून.
मृत्युंजयकारांनी अनेक पुस्तके लिहिली पण मृत्युंजय, छावा, युगंधर यातील एक जरी कादंबरी त्यांनी लिहिली असती तरी त्यांचे नाव मराठी साहित्यात अजरामरच झाले असते.
आयुष्यात आजवर अनेकदा मृत्युंजयकार भेटत राहिले..एक दोनदा प्रत्यक्ष, अनेकदा शब्दांतून.. आजही भेटतात.. कधी ‘ मृत्युंजय ‘ मधून, कधी ‘ छावा ‘मधून तर कधी ‘ श्रीकृष्ण : एक चिंतन ‘ मधून, ‘ युगंधर ‘ मधून… प्रत्येक भेट काळीज कोंदणात जपून राहिलेली. पुन्हा पुन्हा भेटावे असे वाटणारी.
जीवन अनुभवसंपन्न करणारी वाचनानुभूती देणाऱ्या, आपल्या शब्दवैभवाने चिरंजीव झालेल्या मृत्युंजयकारांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन !
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈