विविधा
☆ सत्यनारायण पूजा : काळाची गरज – भाग 1 ☆ श्री अभय शरद देवरे ☆
नुकतीच घरी सत्यनारायणाची पूजा यथासांग पार पडली. ही पूजा गेल्या कित्येक वर्षांपासून दर श्रावणात आणि मंगल कार्य झाल्यावर आमच्या घरात केली जाते. इतक्या वर्षात ती अंगवळणीही पडली आहे पण सोशल मीडियावर व्यक्त होणे जसे सोपे झाले तसे हिंदू धर्मावरील जहरी फुत्काराना उधाण आले.काही महाभाग तर केवळ त्या एका उद्दिष्टासाठीच जगू लागले. ( त्यांना त्यासाठी पैसे मिळत असावेत बहुतेक ) श्रावणापासून सुरू झालेले सण धुलीवंदनाच्या दिवशी संपतात पण सन्माननीय टीकाकार मात्र वर्षभर या सणांवर टीका करण्याचे इतिकर्तव्य वर्षभर पार पाडतात. कॉपीपेस्ट केलेल्या म्हणजेच चोरलेल्या या पोस्ट एखाद्या संसर्गजन्य आजाराप्रमाणे सर्वत्र पसरतात. त्यात मांडलेले मुद्दे इतके प्रभावी असतात की माझ्यासारख्या श्रद्धेय माणसाच्याही श्रद्धा डळमळीत होऊ पहातात. हिंदू धर्म म्हणजे जातीयवादी, परंपरावादी, स्पृश्यास्पृश्य मानणारा, एका विशिष्ठ समाजाच्या हातात सर्व अधिकार ठेवणारा अशा अनेक शेलक्या शेलक्या विशेषणांनी संभावना केली जाते. कोण तो मनू….जो काळा का गोरा हे माहीत नसतो किंवा त्याचा तो कुप्रसिद्ध मानला गेलेला ग्रंथ मुळापासून संस्कृतमधून वाचणे तर सोडाच पण साधा पाहिलेलाही नसतो, तरी पण त्याच्यावर आणि त्याला चिकटवलेल्या जातीवर, पीएचडी केल्यासारखे असंख्य महामहोपाध्याय तुटून पडतात. तेंव्हा असे वाटून जाते की खरेच आपला धर्म इतका वाईट आहे का ?
मग मी माझ्या अल्पबुद्धीने या धर्मातील रूढी परंपरांमागचा विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. विचार करु लागलो की कोडी सहजपणे सुटत जातात आणि माझ्या प्राणप्रिय धर्माची महानता समजू लागते. दरवर्षी घरात होणारी सत्यनारायणाची पूजा हीसुद्धा अशीच एक आदर्श परंपरा आहे. मला माहित नाही की सत्यनारायण या नावाचा देव खरच आहे का ते ! मला माहित नाही की तो साधुवाणी, कलावती किंवा लीलावती ही पात्रे खरेच होती का ? मला माहित नाही की हे व्रत न पाळल्यामुळे देव शिक्षा करतो का ते ! तरीही मी पूजा करतो कारण त्यातून मिळणारे आत्मिक समाधान मला शब्दात वर्णन करता येत नाही पण अनुभवता मात्र जरूर येते.
नेमके प्रत्येकाच्या घरात काय घडते जेंव्हा सत्यनारायणाची पूजा केली जाते तेंव्हा ? पूजा होणार म्हणून दोन दिवस अगोदर गृहिणी घराच्या साफ़सफाईला लागते. जाळेजळमटे, अडगळ काढून टाकली जाते. स्वच्छतेतून निर्माण होणारी धार्मिकता घरात वावरू लागते. पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदीविक्रीतून आपोआपच मार्केटमध्ये पैसे फिरू लागतो. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हे सण अनेक लोकांना अन्नाला लावतात. सत्यनारायणाची पूजा हीसुद्धा त्याला अपवाद नाही. ही पूजा जर कोणी नाही केली तर फुले, फळे, सुपारी, हळद, नारळ, तांदूळ, गहू, रवा, साखर दूध, आदी उत्पादकांना त्याकाळात वाढीव ग्राहक मिळणार नाही.
पूजेसाठी लागणा-या दुर्वा, पत्री, प्रसाद यांचे केवळ धार्मिक महत्व नाही तर या सगळ्या गोष्टींचा औषधी उपयोग आहे. म्हणूनच शास्त्रकारांनी पूजेत वापर करायला सांगितला आहे. हिंदू धर्मातील कोणतीही रूढी, परंपरा ही माणसाला निसर्गाच्या जवळ नेते आणि निसर्गाचे संवर्धन करायला शिकवते. पूजेनंतर वाटला जाणारा प्रसाद हा अनारोग्यातून आरोग्याकडे जाणारा एक राजरस्ताच आहे. प्रसाद भक्षण करून आपण विविध रोगांना आपले भक्ष्य बनू देत नाही हे आपल्या लक्षातच येत नाही. सोशल मीडियावर एक लेख आला होता तो जसाच्या तसा समोर ठेवत आहे.
देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू.
क्रमशः….
© श्री अभय शरद देवरे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈