सौ.मंजुषा सुधीर आफळे
विविधा
☆ प्रतिबिंब ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆
पावसाचे दिवस होते. काहीतरी१७/९/२०२१ बाजारातून आणायचे, म्हणून मी घराबाहेर पडले.त्यातच, थोडे अंतर गेल्यावर पावसाने मला गाठलेच. पाऊस कोसळू लागला. मी पण आडोशाला थोडा विसावा घेत उभी राहिले. विसाव्याच्या क्षणी मन एकांत न शोधेल तर नवलच. “मन वेड असतं” असे म्हणतात, ते पण खरं. विसाव्याच्या क्षणी, मनाच्या गाभाऱ्यात लपलेल्या प्रतिबिंबांना निरखून पाहण्याची एक सवय आपल्याला असतेच. मी पण या क्षणी वेगवेगळी प्रतिबिंब पाहण्यात दंग झाले.
मी जिथे उभी होते, तिथून काही अंतरावर असलेल्या जागेकडे माझी नजर पुन्हा पुन्हा वळत होती. कारण, मला रोज बकुळा येथेच भेटत होती. अगदी याच वेळी. आजही तिच्या आठवणींनी मन बेचैन झाले. बकुळा आता दूर गावी गेली होती. आमच्या राहत्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या, एका बिल्डिंग मध्ये ती राहत होती. ती जवळच्याच एका गतिमंद मुलांच्या शाळेत जात असे. आमच्या घराच्या समोरील रस्त्यावरूनच ती येत जात असे. मीही कधी कधी मोकळा वेळ मिळेल, तेव्हा त्याच शाळेत मुलांना भेटायला जात असे. संध्याकाळी फिरायला गेल्यावर, किंवा मंदिरात बकुळा मला भेटत असे. ती दिसायला खूपच छान होती. उंची तशी कमीच, आवाज मात्र मोठा. जीभ थोडी जड असल्याने कधी कधी तिचे बोलणे कळत नसे. स्वच्छ पण थोडे अघळपघळ कपडे ती घालत असे. केस छोटे. पण डोळे मात्र खूपच बोलके. रस्त्यात गर्दीच्या ठिकाणी, ती मला नेमकेपणे ओळखत असे. माझा हात आपल्या हातात पकडून, “ताई, उद्या येणार ना शाळेत?” असे विचारत असे. मग मी, “हो, तू पण ये हा” असे म्हणल्या शिवाय तिचे समाधान होत नव्हते. तिचा तो प्रेमळ स्पर्श आमचे आदल्या जन्मीचे ऋणानुबंध असल्याचे सांगुन जाई. तिच्या इतके प्रेमळ निरागस व भाबडे हास्य, मी याआधी आणखी कुणाचेही पाहिले नाही. काही क्षणांतच, ती आपला हात घाईघाईने सोडवून घेत असे. व हसत हसत झपाझप पुढे निघून जाई. एवढीच काय ती भेट. पण या भेटीची ही मनाला सवय लागली होती. आज तिच्या आठवणीने मनात प्रश्न उमटत राहिले. खरेच, कशी असेल ती? नवीन जागेत तिला समरस होता आले असेल का? आपली आठवण तर येतच असेल. आणि मी मनातल्या मनात प्रार्थना करू लागले.” देवा, तिला आवडणारी एखादी ताई तिला लवकर भेटू दे. ती नेहमी आनंदी, सुरक्षित, व सुखी राहू दे. आता पाऊस थांबला. मी पण एकांतातून बाहेर आले. काम आटपून घरी आले. आणि दारातच असणाऱ्या नारळीच्या झाडाकडे माझे लक्ष गेले. त्या नारळीच्या झाडात, एक छोटे सुपारी चे झाड आपोआप आले होते. ते झाड पाहून आम्ही सर्वजण आनंदित झालो. त्याची नीट काळजी घेऊ लागलो. पण तरी हळूहळू लक्षात येऊ लागले की, झाडाची वाढ खुरटली आहे. पाणी भरपूर असले तरी, सूर्यप्रकाशा साठी सुपारीला संघर्ष करावा लागत होता. नारळीच्या झावळ्यांचा, मोठा पसारा तिच्या डोक्यावर होता. नाजूक असूनही हे झाड, नारळी च्या कुशीत धिटाईने उभे होते. नुकत्याच, छोट्या छोट्या हिरव्या झावळ्या फुटल्या होत्या. तरीपण रोज पाणी घालताना काळजी वाटत होती. अगदी बकुळी सारखीच. कसे होईल या सुपारीचे? बाकी झाडांचे काय? आणि माणसांचे काय? सुख दुःख सारखेच की, दोन्हीही सजीव आहेत. आपला जिवंतपणा टिकवून चैतन्य देत राहतात. त्यांच्या सहवासात येणाऱ्यांना नवीन ऊर्जा देत राहतात. पण एकदा का त्यांची वाढ खुंटली. तर मात्र त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. त्यांच्या वेगळ्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागते. आणि मन जरा हळवे होतेच. पण त्यांच्यातील एकाकीपणा न्यूनता कमी करण्याच्या प्रयत्नात, आपल्याला हातभार लावता आला, तर तो आनंद फुलवताना खूप समाधान मिळते. व अशा वेळी आपल्याला होणारे कष्ट, खूपच क्षुल्लक वाटतात. म्हणूनच असे अनमोल क्षण अनुभवायचे, व मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवायचे. आठवणींची ही “मोरपिसे” मनाच्या आरशात प्रतिबिंब होऊन राहतात. आणि आपल्याला बरंच काही देऊन जातात. आपले मन प्रफुल्लित करणारी असतात. गरज असते, कधीतरी अंतर्मुख होऊन अशी प्रतिबिंब न्याहाळण्याची. म्हणूनच विसाव्याच्या क्षणी जेव्हा जेव्हा तुम्हाला या आरशात डोकावण्याची संधी मिळेल, तेव्हा ती सोडू नका. या मोरपिशी आठवणी, अनमोल आहेत. आयुष्यात रंगीबेरंगी ऊर्जा, चैतन्य निर्माण करणाऱ्या आहेत. या आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवतात.
© सौ.मंजुषा सुधीर आफळे
१७/९/२०२१
विश्रामबाग, सांगली.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈