जीवनरंग
☆ कथा ‘ वळण ‘ – भाग – पाच ☆ श्री आनंदहरी ☆
राधाबाईंना कुणाची तरी चाहूल लागली तसे त्यांनी पटकन कळशीतून ओंजळभर पाणी घेऊन चेहयावर हबकारा मारला. पदराने चेहरा पुसण्याच्या निमित्ताने डोळेही टिपले. कळशा उचलून घेतल्या आणि घरी परतण्यासाठी वळली.
” काय गं आज दुपारचे आलीस पाण्याला? “
” सकाळी पाणी थोडंचं न्हेलं होतं “
राधाबाई काहीतरी उत्तर द्यायचे म्हणून उत्तर देऊन झपाझप निघाल्या. जाताना त्यांनी पुन्हा एकदा एखाद्या जिवलग मैत्रिणीचा निरोप घ्यावा अशा नजरेने पाणवठ्याकडे पाहिले.
कितीक सासुरवाशीणींचा सखा-सोबती असणारा, अंतरातील गुज जाणणारा, मनातील दुःख हलकं करणारा तो अबोल पाणवठा कितीतरी त्यांच्या मनात घर करून राहिला होता.
राधाबाईंना मनात त्या सून म्हणून घरात आल्या त्या दिवसांच्या आठवणी तरळून गेल्या. त्यांचं मन पाणवठ्यापाशी थबकून राहिले.
‘आता प्रत्येक घरात नळाचे पाणी येतंय, आजकालच्या सुनां खरंच दुर्दैवी. त्यांच्या जीवनात मनातलं दुःख हलकं करणारा कुठला आलाय पाणवठा आणि भरू पाहणाऱ्या डोळ्यांना वाहू देऊन रितं करणारी कुठं आहे त्याची सोबत? मनातला ताण घालवणारा, व्यक्त भावनांची दुसरीकडे कुठेही वाच्यता न करता, टिंगल टवाळी न करता सारं काही स्वतःजवळ ठेवणारा अबोल जिवलग सोबती त्यांना कुठं आहे?’
राधाबाईंच्या मनात विचार आला आणि नकळत त्यांच्या मनात ऋतुजाबद्दल, त्यांच्या सुनेबद्दल कणव निर्माण झाली. आपण सासरी गेलो तेंव्हा आपल्याला कधी गप्पा माराव्याशा वाटल्या, काही बोलावसं वाटलं तर त्यासाठी,आपलं मन मोकळं करण्यासाठी, मनातल्या माहेरच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नणंदेसारखी जिवाभावाची मैत्रीण होती.सासूबाई किंवा कुणी काही बोलले तर मनातलं सांगायला, रितं व्हायला पाणवठ्यासारखा सोबती होता पण ऋतुजाने कुणाशी गुज करायचं? कुणाजवळ मन मोकळं करायचं? घरातच असणाऱ्या नळाजवळ?
राधाबाईंना आठवलं, मन रितं करून पांवठयावरून परतताना घराकडे जाताना एक वळण होते. त्या वळणापाशी जेव्हा त्या येत तेंव्हा त्या थबकत. वळल्यानंतर न दिसणाऱ्या पाणवठ्याकडे क्षणभर पहात, त्यावेळी त्या स्वतःच्याच मनाला निश्चयपूर्वक बजावत, ‘ आपण कधी आपल्या सुनेला तिच्या माहेरच्यांच नाव घेऊन असे टोचून बोलायचं नाही हं..कधीही नाही.’
हॉलमध्ये सोफ्यावर बसल्या बसल्या राधाबाईंच्या मनातील आठवणींनीची कुपी उघडली गेली होती. त्या त्यात रमून गेल्या होत्या. त्यांनी हळूहळू साऱ्या आठवणी परत कुपीत भरून ठेवल्या. मनातला पाणवठा हळूच कुपीत ठेवताना त्याकाळी पानवठयावरून येताना वळणावरून वळताना केलेला निश्चय त्यांनी केला ‘यापुढं ऋतुजाला तिच्या आईवडिलांचे, माहेरचं नाव घेऊन कधीच बोलायचं नाही. ‘ त्यांना खूप बरे वाटले. मन काहीसे निवांत झाले. त्यांनी जपाची माळ घेतली आणि शांत झालेल्या मनाने त्या जप करत बसल्या.
किचनमधून भांडे पडल्याचा आवाज ऐकू आला तशा जपाची माळ टीपॉयवर ठेवून राधाबाई उठल्या आणि झटकन किचनमध्ये गेल्या. दुपारचा चहा करायचा म्हणून गॅसवरून गरम दुधाचे भांडे उतरताना ऋतुजच्या हातून ते चिमट्यातून निसटून कट्ट्यावर पडले होते. साऱ्या कट्ट्यावरून दुधाचे ओघळ सिंकच्या दिशेने वाहू लागले होते. कट्ट्याजवळच्या ब भिंतीच्या टाईल्सवर दुधाचे काही शिंतोडे उडाले होते.
झाल्या चुकीची जाणीव होऊन ऋतुजाच्या डोळ्यांत पाणी आले होते. घाबरून जाऊन पडलेले भांडे गडबडीत उचलायचा प्रयत्न करायला गेलेल्या ऋतुजाच्या बोटांना जोराचा चटका बसला होता..
राधाबाईंना फक्त सांडलेले दूध दिसले.
त्या रागाने म्हणाल्या,
“अगं s अगं,हे काय? सांडलस सारे दूध? व्यवस्थित काम करायचं वळणच लावले नाही तुला तुझ्या आईने, त्याला तू तरी काय करणार म्हणा? “
पाणवठ्याच्या वळणावरून ‘वळणं ‘ राधाबाईंना जमलंच नाही.
समाप्त
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈