सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ घेणेकरी… भाग ३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

म्हणूनच मी दयाळकडे जायचं ठरवलं.

एकेकाळची आमची विशेष गट्टी.. नंतर आयुष्य बदलली .

वाटा वेगळ्या झाल्या. कळलेही नाही. एकेकाळचा मळक्या कपड्यातला, अर्धी चड्डी घालणारा ,गोट्या खेळणारा दयाळ एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष होतो काय, वेगवेगळ्या ऊलाढालीतून प्रचंड वृत्तपत्रीय प्रसिद्धी मिळवून एका  मोट्ठ्या जनसमुदायाचा विश्वासार्ह नेता होतो काय..सगळंच अकल्पित..!

कित्येक वर्षांनी मी त्या गल्लीत जात होते…आपलं जुनं बालपणीचं नंतर कुणालातरी विकलेलं घर या निमीत्ताने पहायला मिळेल याची सुप्त ओढही होती.

पण ती गल्ली, अवतीभवतीचा परिसर परिसर पूर्ण बदलला होता.ओळखीच्या काहीच खुणा ऊरल्या नव्हत्या. दयाळचे चाळवजा घरही पार बदललं होतं..

तिथे एक इमारत उभी राहिली होती.एका राजकीय पक्षाच्या कार्यालयाचा नवा दिमाखदार चेहरा त्याला लाभला होता.

 दयाळला मी बदलेल्या रुपात पाहण्याचा प्रयत्न करत होते!!

एका गोष्टीचं खूप समाधान वाटलं.दयाळनं मला चटकओळखलं.

निवांत वेळ दिला. बाळपणीच्या आठवणींनी दोघही मोहरलो…

मग म्हणाला,

“बोल आता काय सेवा करु तुझी?..”

मग मी त्याला माझ्या येण्याचा उद्देश सांगितला.

घडलेली सगळी घटना सविस्तरपणे कथन केली.

त्याने शांतपणे ऐकून घेतली.म्हणाला,

“पपांसारख्या व्यक्तिच्या बाबतीत असे घडायला नको होते.किती सच्च्या दिलाचे तत्वनिष्ठ सरळ रोखठोक!! खूप आदर आहे माझ्या मनात त्यांच्याबद्दल…”

“दयाळ यातून काही मार्ग निघेल का?”

“निघेल ना! जीकेसारख्या माणसाला समज देउन सर्वसामानासह रस्त्यावर आणणं तसं आम्हाला काहीच कठिण नाही..”

“मग कर ना तसेच…”

“हो! करुच ग तेही. पण थोडे दिवस जाउदेत. कोर्टात दाखल केलेली केस कुणाच्या न्यायालयात ऊभी राहते ते बघू. सगळे लोक आपल्या हातातले आहेत .निकाल आपल्याच बाजुने लागेल. नाहीतर अखेर आमचे मार्ग आहेतच. तू नको काळजी करूस. ही समस्या माझ्याच घरची…आता..”

दयाळकडुन परतताना मी थोडीशी “ना इथे ना तिथे.” या मन:स्थितीत होतेच….

दयाळचं अश्वासन मला आशावादी बनवत होतं!

खरं म्हणजे सरळ मार्गाने. खाचखळगे टाळून जगणारी आपण माणसं. गुंडगिरी, दादागिरी, दडपशाही हे काही आपल्या जगण्याचे घटक नाहीत.पण कुणीतरी आपल्यासाठी परस्पर हे करणार आहे आणि तेही केवळ आपल्या मैत्रीखातर या जाणीवेनं मला कुठेतरी सुरक्षित

वाटत होतं. दुनियेत टिकून रहायचं असेल तर कधीतरी हाही पर्याय स्वीकारावा लागतो असे स्वत:चीच समजुत घालणारे विचार मनात गर्दी करु लागले होते….

दयाळच्या भेटीचा सर्व वृत्तांत मी पपांना सांगितला.

त्यांची प्रतिक्रिया शून्य…

जीजी म्हणाली “याची जन्मी भोगेल तो…”

त्यानंतर मी वेळोवेळी दयाळला फोन केले. तो व्यस्तच असायचा. म्हणायचा “मी करतो तुला दहा मिनीटात फोन…”

दहा मिनीटांनी दयाळ कुठल्या मीटींगमधे अडकलेला असायचा.. नाहीतर एखाद्या खेड्यावर निघुन गेलेला असायचा. कुठे दंगली, मारामार्‍या राजकीय, पक्षीय पेच सोडवण्यात तो गुंतलेला असायचा.

आणि त्याने म्हटल्याप्रमाणे त्याने मानल्या प्रमाणे त्याची ही घरचीच समस्या सोडवायला त्याला वेळच नव्हता……….

लहानपणचा  गोट्या खेळणारा, मळक्या चड्डीतला माझ्याबरोबर कधी भांडणारा, कधी मजेत

भाजलेल्या  भुईमुगाच्या शेंगा खाणारा दयाळ आता बदलला होता… हे जाणवत होतं..

आपलं राजकारणातलं ज्ञान पेपर वाचण्यापूर्त..

प्रत्यक्षात एखादी राजकीय व्यक्ती खरोखरच जनतेसाठी किती असते.. किती खरी असते, किती  खोटी असते याचा अनुभवच नसतो….

क्रमश:….

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments