पुस्तकावर बोलू काही
☆ ‘कोरडा भवताल’ – श्री आनंदहरी ☆ परिचय – श्री रमेश नागेश सावंत ☆
कवितासंग्रह – कोरडा भवताल
लेखक : आनंदहरी
प्रकाशक : प्रभा प्रकाशन, कणकवली
पृष्ठसंख्या : ८४
कोरडा भवताल —- जगण्याच्या मुळाशी भिडणारी कविता
कवी आनंदहरी यांच्या ‘ कोरडा भवताल’ या नव्या कवितासंग्रहातील कविता भवतालात घडणा-या घटितांवर लक्ष्यवेधी भाष्य करतात. आनंदहरी यांच्या संवेदनशील दृष्टीला जाणवलेले जगण्याचे भान त्यांच्या कवितांतून संयत भाषेत व्यक्त झाले असले तरी या कविता वाचकाच्या संवेदनशील मनाच्या तळाचा ठाव घेणा-या आहेत. ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ.गोविंद काजरेकर यांनी त्यांच्या विश्लेषक प्रस्तावनेत नमूद केले आहे की कवी आनंदहरी समकाळाची स्पंदने टिपण्यात यशस्वी झाले आहेत. आपला भवताल कोरडा असल्याची कवीची जाणीव ही अभावाची आहे आणि त्यामुळे त्यांच्या कवितेतून जगण्यातील अर्थशून्यता निदर्शनास येते. म्हणूनच सामान्य माणसाच्या जीवनसंघर्षाचा वेध घेणारी ही कविता वर्तमान काळाचा अवकाश व्यापून टाकणारी आहे. कवी आत्मनिष्ठ कवितेच्या दिशेने वाटचाल करत असताना त्याच्या कवितेचा सूर सामाजिक निष्ठेकडे वळलेला दिसून येतो. ‘मी साधेच शब्द लिहिले’ या पहिल्याच कवितेत अव्यक्त राहिलेल्या माणसांबद्दल कविला वाटणा-या सहसंवेदनेची ही जाणीव तीव्रतेने प्रकट झाली आहे.
“फक्त लागावा असा लळा
की ज्याला व्यक्त होता येत नाही त्याच्यासाठीच
माझ्या कवितेचे शब्द बोलत राहावेत
आयु्ष्यभर”
समकालीन मराठी कवितेत रुजलेला सामाजिक जाणिवेचा स्वर कवी आनंदहरी यांच्या कवितेतूनही प्रखरतेने उमटतो. ‘दिशा ‘ या कवितेत कविच्या सामाजिक अनुभूतीचे व्यामिश्र रंग उमटले आहेत.
भिरभिरलो दाहीदिशी आणि उतरलो धरेवर
सारा आसमंत कवेत घेऊन
आणखी कुणाच्याही दिशा
हरवून जाऊ नयेत म्हणून
कवीला त्याच्या आसपास दिसणा-या ‘ कोरड्या भवताला’ बद्दल वाटणारी संवेदना ‘आजचा काळ’, ‘वेदनेचे उठत राहतात तरंग’, ‘उपासमार’, ‘वासुदेव’, ‘मला माणूस म्हणू्न जगयाचंय’ या कवितांतून प्रकट झाली आहे. ‘आजचा काळ’ या कवितेतून कवीने सध्याच्या काळात मानवजातीवर घोंघावत असलेल्या असहिष्णुतेच्या वादळावर अतिशय मार्मिक शब्दांत आघात केला आहे.
वादळ कधीच करत नाही भेद
पाहत नाही रंग झाडापेडांचा, घरादाराचा आणि माणसांचाही
आजचा काळ असाच तर आहे असहिष्णुतेचा !
कोणत्याही कवीला शब्दांचा, प्रतिमांचा आणि प्रतिकांच प्रचंड सोस असतो. परंतु अल्प शब्दांत नेमक्या प्रतिमा वापरून आशयघन कवितेचे बिंब तयार करण्याचे कसब कवी आनंदहरी यांना जमले आहे. ‘ उपासमार ‘ या कवितेतून त्यांच्या काव्यगत प्रतिभेचे प्रत्यंतर येते.
तरीही मी राखलंय बियाणं शब्दांचं
रूजवू पाहतोय मनाच्या शेतात
निदान उद्या तरी डवरतील
शब्दांची कणसं
साध्या आणि सरळ भाषेत व्यक्त होतानाही मोठा आशय मांडणारी ही कविता थेट वाचकांच्या काळजालाच हात घालते. ‘ बांद’ या बोली भाषेत लिहिलेल्या गावरान बाजातल्या कवितेत ग्रामीण जीवनाचे चित्र कवीने आत्मीयतेने साकारले आहे. या कवितेतील ‘ बाप ‘ आणि ‘ आजा ‘ वाचकांना भावूक करून आठवणी चाळवणारा आहे.
आनंदहरी यांच्या कवितेची भाषा जितकी सहज, स्वाभाविक तितकीच त्यांची काव्यशैली देखील चिंतनशील प्रवृत्तीची आहे. त्यांच्या कविता जगण्याच्या मुळाशी भिडणा-या असून कविच्या भावना हळुवार शब्दांतून व्यक्त करतात. ‘ ऊनही आताशा’ या कवितेत एकीकडे निराशा आणि कोरडेपणा यांचे चित्रण करताना कविचा सूर भरपूर आशादायी असल्याचे जाणवते.
आशेची पाखरं
अवचितच झेपावतात आकाशात
आकाश पंखात घेण्यासाठी
रणरणत्या टळटळीत दुपारीही!
‘मला माणूस म्हणून जगायचं आहे’ या कवितेतून समाजातील दांभिक प्रवृत्तींचा वेध घेताना कवीने असामाजिक तत्वांवर शाब्दिक कोरडे ओढले आहेत. कवीचा आंतरिक आक्रोश हा जनमानसाचा प्रातिनिधिक आक्रोश आहे. सांप्रत काळात समाजमनावर पडलेला धर्माचा अतिरेकी प्रभाव आणि धर्माचे बदलते स्वरूप याबाबत कविने ‘ धर्म ‘ या कवितेतून प्रश्न उपस्थित केले आहेत. मुक्त छंदातील अशा सामाजिक भान प्रकट करणा-या कवितांबरोबरच ‘ मन वारकरी झाले’ , ‘ माझ्या देहाचे रे झाड’, ‘जन्म तुझा होता बाई’ , या अष्टाक्षरी कविता तसेच ‘ सुने झाले गाव’, ‘ दाटते मनात भय’, ‘लखलाभ तुम्हाला’ या गजला कविच्या बहुपेडी प्रतिभेची जाणीव करून देतात.
या कवितांतून सामाजिक जाणीव व्यक्त करताना कवीने स्त्रियांच्या व्यथा मांडण्याचे भानही जागृत ठेवले आहे. ‘ उसन्या अवसानाने ‘ आणि ‘ नि:शब्द कविता ‘ या कवितांतून पुरूषी अहंकाराची दासी झालेली आधुनिक स्त्री, ‘ ‘तोड’ या कवितेत दारि्द्यावर घाव घालणारी ग्रामीण स्त्री, आणि ‘ती म्हणाली, ‘ शेवटी तू ही पुरूषच’ , या कवितेतील मुक्तीसाठी आसुसलेली स्त्री, अशा स्त्रियांच्या नानाविध रूपांचे वेधक दर्शन कवी आनंदहरी यांनी घडविले आहे. या कवितासंग्रहातील कवितांचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये पाहता समकालीन मराठी कवितेच्या क्षेत्रात कवी आनंदहरी यांच्या कवितेची योग्य दखल घेतली जाईल ही आशा बळावली आहे.
प्रस्तुति – श्री रमेश नागेश सावंत
मुंबई
संपर्क – 9821262767
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈