सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ घेणेकरी… भाग ४ ☆ सौ राधिका भांडारकर ☆
कोर्ट तारखा अपील चालुच होतं..
मी आशा बाळगून होते कधीतरी दयाळची माणसं येतील .जीकेला सामानासकट रस्त्यावर आणतील.
त्यांना घाबरुन जीकेची दातखीळ बसेल.तो लोटांगण घालुन पपांची माफी मागेल.
पण धक्का यालाही बसायचा होता…
दयाळच्या वेटींग हाॅलमधे मी बराच वेळ बसुन होते.
दुसर्या दिवशी केस होती .कुणापुढे होती ते सांगायचं होतं.आता या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचाच.
तिथे अनेक लोक होते. क्षणभर वाटलं आपण यातले नाही.. का आलो आपण इकडे..?
भेटीची ठरवलेली वेळ उलटून गेली होती. मी आल्याची सूचनाही आत गेली होती.तरी इतका वेळ?
बेचैनी उदासी ताण वाढत होता.क्षणभर वाटलं,दार ढकलुन आत जावं…
अन् तेव्हढ्यात..
चक्क जीकेच आतून बाहेर आले.तेही रूबाबात.
त्यांनी मला पाहिलही पण दुर्लक्ष केलं.ते दयाळच्या माणसांशी लगटीने बोलत होते.जणु ही सारी माणसं त्यांच्या किती जवळची आहेत हे जाणूनबुजुन मला दाखवत होते…
मी आजारी असताना मला स्वत: डाॅक्टरकडे घेउन जाणारे, हाॅस्पीटलमधे रोज फुलं घेउन येणारे हे जीके…
आणि बंद दारापलिकडचा माझा बालमित्र दयाळ.
कोण खरं? कोण खोटं? कोण आपलं? कोण परकं..?
हे शहाणपण आपल्याला मिळवता आलं नाही याची खूप खंत वाटली.. सत्य श्रद्धा निष्ठा भावना चारित्र्य नीति हे सारं किती बेगडी आहे ..कांटेरी कुंपण आहे भोवती. कसे जाणार आपण या पलिकडे..
काळ वहात राहिला.सत्याला एका किनार्यावर ठेवून.
“कर्माची फळे याच जन्मी फेडावी लागतात…!!”
अक्षरे. वाळुतली.
पपा गेले. जीजीही गेली.पापांच्या पाचपाखाडीच्या प्राॅपर्टीवर जीके सौख्यभरे नांदताहेत.
दयाळचाही गूढ मृत्यु झाला.अपघात की खून…? सत्य बाहेर आलेच नाही…
अशाच सुन्न क्षणी,माझंही जीवन निवृत्तीच्या वाटेवरच आता..
मीनाचा फोन आला.
“अग! परवा जीके आले होते…”
पपांच्या अंत्यदर्शनाला जीके आले असताना याच मीनाने दु:खाच्या आवेगात त्यांना अक्षरश: हकलवुन लावले होते..!!
“आता काय हवंय् त्यांना?”
“अग! आईजवळ बसले..खूप रडले .मी माझा चांगला मित्र गमावला…”वगैरे बरच बोलत होते.”
“काही खरं नाही .जीके म्हणजे सापाची जात..आईला म्हणाव काही विश्वास ठेवु नकोस ..”
“अग! ऐक तर खरं..”
नंतर जीके खूप डबघाईला आले..धंदा बुडाला. देणी थकली.मुलीनं आत्महत्या केली.मुलगा विचारत नाही,.
सुन शिव्या देते…”
“मग..भोग म्हणाव कर्माची फळे आता..”
“त्याने एक प्रस्ताव आणलाय. दहा लाख रुपये मागतोय् तो..सर्व रिकामं करुन निघुन जाणार आहे..”
“पण आई कुठून देणार दहा लाख?चोर..घुसखोर..वरुन आपणच पैसे द्यायचे? हा कुठला न्याय?”
“अजय म्हणतोय् ही प्राॅपर्टी आता कमर्शीयल एरीयात येते.विकली तर जबरदस्त किंमत येईल..आईही म्हणतेय्
तिच्याही आयुष्याची किती वर्षे राहिली आहेत.!
या कोर्ट कचेर्या किती वर्षे चालणार ..सगळीच अनिश्चितता! अशा पद्धतीने जर मिटत असेल हे प्रकरण
तर संपवा हे सारं…”
मीना बरंच पटवत होती.
मला पटत होतं म्हणण्यापेक्षा वैचारिक बैठक बदलणं
क्रमप्राप्त होतं…
किंतु होतेच.
हे तरी कशावरुन खरे?
ही नवी फसवणुक कशावरुन नसेल..
आणि समजा नसली तर सत्याचा विजय झाला असे म्हणायचे का?जीकेला जे क्लेश भोगावे लागले ती त्याच्या गुन्ह्याची मिळालेली शिक्षा का?
मग कुठलाच गुन्हा न केलेल्या,संस्कृतीच्या नीतीच्या तत्वांच्या वर्तुळात असलेल्या आपल्याला ही इतकी वर्षे
मन:स्तापाची शिक्षा का झाली…?
पपा एकदा म्हणाले होते..”जीके माझा मागच्या जन्मीचा घेणेकरी आहे….”
तर्कशुद्ध मनाला नाही ना पटत…?
तरीपण म्हणावे लागते …”असेल..”
समाप्त
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈