सौ.ज्योत्स्ना तानवडे
विविधा
☆ अवघ्या आशा श्रीरामार्पण ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
‘गीतरामायण’ आणि कविवर्य ग. दि. माडगूळकर हे एक रत्नजडित समीकरण आहे. ही ६६ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. गदिमा आणि आकाशवाणीचे अधिकारी सीताकांत लाड रोज प्रभातफेरीला जात असत. मराठी श्रोते आपल्या कुटुंबासह आनंद घेऊ शकतील असा वर्षभर चालणारा एक कार्यक्रम आकाशवाणीवर सादर करण्याची कल्पना लाडांनी एकेदिवशी मांडली.बऱ्याच कालावधी पासून गदिमांच्या मनात रामकथा घोळत होती.आकाशवाणी कार्यक्रमाबद्दल ऐकले त्याच वेळी गदिमांच्या मनात गीत रामायणाचे बीज रुजले आणि त्यातून ही दैवी रचना आकाराला आली.
त्यावेळी श्रीराम कथेने त्यांना जणू भारून टाकले होते. या भारलेल्या अवस्थेतच प्रासादिक शब्दरचना, प्रासादिक संगीत आणि प्रासादिक स्वर यांच्या त्रिवेणी संगमातून एक महाकाव्य जन्माला आले ‘ गीत रामायण ‘. १एप्रिल १९५५ ची रामनवमी या दिवशी पुणे आकाशवाणी वरून पहिले गीत सादर झाले,
स्वये श्री रामप्रभू ऐकती
कुशलव रामायण गाती ||
एका दैवी निर्मितीची अशी ही सुरुवात झाली. रामनवमी १ एप्रिल १९५५ ते रामनवमी १९ एप्रिल १९५६ या काळात एकूण ५६ गीते सादर झाली.
प्रत्येक गीतातला रामकथेचा भाग रामचरित्रातीलच एका व्यक्तीच्या तोंडून सांगितलेला आहे. ही एक गीत शृंखलाच आहे. बऱ्याच गीतांमधील कथाभाग गीताच्या शेवटी पुढील प्रसंग किंवा पुढील गाण्याशी जोडलेला आहे.
मुळामध्ये ‘वाल्मिकी रामायण’ हे चिरंतन काव्य आहे. त्यातले अमृतकण गीत रामायणात देखील प्रकट झालेले आहेत. त्यामुळेच त्याला अध्यात्मिक अर्थ आणि श्रेष्ठत्व प्राप्त झालेले आहे. महर्षी वाल्मिकींनी उभ्या केलेल्या मंदिरात गदिमांनी श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या मराठमोळ्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. त्यामुळे गीतरामायण हे सर्वसामान्यांच्या देखील ‘मर्मबंधातली ठेव’ बनले आहे.
या रामकथेमधून मानवी प्रवृत्तीच्या विविध भावनांचे दर्शन होते. त्यामुळेच रामायणाच्या गीतांमधून सर्व रसांचा अनुभव आपल्याला येतो. रौद्र, कारुण्य, वात्सल्य, शौर्य, आनंद, असहाय्यता, त्वेष अशा सर्व भावनांचा यातून मिळणारा अनुभव थेट काळजाला भिडतो. या गीतांसाठी अतिशय चपखल अशी भावप्रधान, रसप्रधान शब्दयोजना आणि गायकी वापरली गेल्याने या गीतातील भावनेशी आपण सहज एकरूप होतो.मनाला भावविभोर करणारे संगीत आणि भक्तीच्या ओलाव्याने चिंब भिजलेले शब्दसामर्थ्य यांच्या मिलाफाने जनमानस अक्षरश: नादावून गेले.
मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम म्हणजे आदर्शांची परिपूर्ती. रामकथेच्या अनेक घटनांनी उत्तम आदर्श प्रस्थापित केले आहेत. मनुष्याला दुराचारापासून परावृत्त करणे आणि पुढे दुराचाराविरुद्ध उभे करणे ही रामायणाची प्रेरणा आणि चिंतन आहे. गीतरामायणाचे मोठेपण हे आहे की, या प्रेरणेचे आणि चिंतनाचे प्रतिबिंब त्यात उमटले आहे.
मनुष्य हा परमेश्वराचा अंश आहे म्हणजे, मुख्य ज्योतीने चेतविलेली एक छोटी ज्योत आहे. त्याने परमेश्वरी शक्तीचे आरतीरूप गुणगान केले, तसे होण्याचा प्रयत्न केला तर ‘नराचा नारायण होणे’ अवघड नाही. हे सर्व सार गदिमा सहज एका ओळीच सांगून जातात ज्योतीने तेजाची आरती.
कमीत कमी शब्दात गहन अर्थ भरण्याची गदिमांची हातोटी विलक्षण अशीच आहे.
कित्येक गीतांच्या ओळी या सुभाषितवजाच आहेत. ‘
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ‘
हे गीत याचा आदर्श नमुना आहे. श्रीरामांनी या गीतातून जीवनाचे सार आणि चिरंतन तत्वज्ञान साऱ्या मानवजातीसाठी सांगितलेले आहे. गदिमांच्या प्रतिभा संपन्नतेचा हा आविष्कार आपल्याला थक्क करणारा असाच आहे.
असे हे गीतरामायण गदिमा आणि सुधीर फडके यांच्या गीत आणि संगीत क्षेत्रातला शिरपेचच आहे. महाराष्ट्राला तर त्याने वेड लावलेच.पण त्याचबरोबरीने हिंदी, गुजराथी, कानडी, बंगाली, आसामी, तेलगू, मल्याळी, संस्कृत, कोकणीतही त्याचे भाषांतर झालेले आहे. मूळ अर्थामध्ये किंचितही फरक नाही. विशेष म्हणजे सर्वत्र बाबूजींच्या चालीत ते गायले जाते.
सर्व मानवी मूल्यांचा आदर्श असणारा ‘श्रीराम’ जनमानसाच्या गाभाऱ्यात अढळपदी विराजमान आहे. ही गीते आकाशवाणीवरून सादर होत असताना लोक रेडिओला हार घालून धूपदीप लावून अत्यंत श्रद्धाभावाने गीत ऐकत असत. असाच अनुभव दूरदर्शन वरून ‘रामायण’ सादर होतानाही आला. आत्ताच्या लॉक-डाऊनच्या काळात पुन्हा ‘रामायण’ प्रक्षेपित केले गेले तेव्हाही नव्या पिढीने अतिशय आस्थेने त्याला प्रतिसाद दिला. नवीन कलाकार अतिशय श्रद्धेने गीतरामायण सादर करतात आणि जागोजागी या कार्यक्रमांना मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून जनमानसावर रामकथेची मोहिनी अजूनही तशीच आहे याचे प्रत्यंतर येते. रामकथा ऐकल्यावर मन अननुभूत अशा तृप्तीने, समाधानाने भरून जाते. ” अवघ्या आशा श्रीरामार्पण ” याची अनुभूती येते.
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈