जीवनरंग
☆ जोगिया ☆ श्री आनंदहरी ☆
(गदिमा यांच्या ‘जोगीया’ कवितेचे कथारूप)
मैफिलीची वेळ झाली होती.. झुंबर आणि दिवे प्रज्वलित झाले होते.. गालिचा व्यवस्थित अंथरला होता.. लोड, तक्के.. सारी बैठक व्यवस्था सज्ज झाली होती.. कळीदार पाने, सुपारी, चुना कात, लवंग, वेलदोडे यांनी भरलेली पानांची तबके बैठकांसमोर ठेवलेली होती.. तिच्या येण्याचे प्रवेशदाराला लागूनच साजिंद्यांची बैठक.. सारे काही जय्यत तयार होते. तिच्या नृत्य- गायनावर, सौंदर्यावर फिदा असणारे, तिच्यावर जीव ओवाळून टाकणारे रसिक येऊन विराजमान झाले होते, वाद्ये जुळवली गेली होती. फक्त तिच्या येण्याची प्रतीक्षा होती. साऱ्या रसिकांचे डोळे ती यायची त्या प्रवेशदाराकडे लागून राहिले होते. तिचे आरसपानी सौन्दर्य पिऊन डोळ्यांत साठवायला अनेक डोळे आतुर झाले होते.
जशी वेळ पुढे पुढे सरकत होती तशी रसिकांमध्ये अस्वस्थता ,कुजबुज, चुळबूळ वाढू लागली होती पण अजून ती काही आली नव्हती. सखी तिच्या जागेवर बसून होती.. ‘ खरे तर असे कधी होत नाही. बाईजी अगदी वेळेवर बैठकीत येतात.. अगदी रसिक आल्यावर लगेच..’ तिच्या न येण्याने मनात काळजी दाटून आली तशी सखी अस्वस्थपणे उठली आणि तिच्या खोलीकडे गेली .
” बाईजी, चला खूप उशीर झालाय, सगळेजण तुमच्या येण्याची आतुरतेने वाट पाहतायत.”
हलकेच दार वाजवत सखीने तिला हाक मारली. तिने दार उघडले. सखीने पाहिले. ती रोजच्यासारखीच तयार झाल्याचे दिसत होते. ‘ बाईजी तयारच आहेत… पण काहीशा वेगळ्या का वाटतायत ?’ सखीच्या मनात तिला पाहताच विचार आला.
” आज मैफिल नाही होणार. सगळ्यांची माफी मागून जायला सांग .”
एवढेच बोलून तिने दार दडपून बंद केले होते. बंद दारापुढे सखी काही क्षण थबकली होती. सखीला तिच्या वागण्या- बोलण्याचा धक्काच बसला होता.
सखीने हात जोडून माफी मागत, बाईजींना बरे वाटत नसल्याने मैफिल होणार नसल्याचे सांगितले.
पानांची तबके पुढे सरकवत पान घेण्याची आणि दुसऱ्या दिवशी येण्याची विनंती केली. कुणी पान घेऊन, कुणी तसेच निराश मनाने परतले. साजिंदेही गेले तसे मुख्य दार पुढे करून ‘ बाईजींकडे विचारपूस करायला जावं की नको ?… नकोच. बाईजीं जरा अस्वस्थच वाटल्या .. पण नको जायला.. त्यांना वाटलं तर बोलावतीलच..’ असा विचार करून सखी स्वतःच्या खोलीकडे गेली.
सखी बोलवायला आल्यानंतर दार लावून ती कसल्यातरी विचारात भान हरपून गेल्यासारखी मंचकावर येऊन बसली… ‘ आज तरी तो यावा ..’ तिचे मन म्हणत होते. तिला तो यावासा वाटत होता पण त्या दिवसापासून तो कधीच आला नव्हता.
तिच्या मनात तो दिवस..दिवस नव्हे ती रात्र वारंवार एखाद्या चलचित्रासारखी तरळून जात होती.
त्यादिवशी नेहमीप्रमाणेच मैफिल मस्त रंगली होती. रसिक तिच्या नृत्य-गायनाचा आस्वाद घेत होतेच पण त्याचबरोबर तिचे आरसपानी सौन्दर्य, कमनीय काया कवेत घेण्याची आस बाळगत डोळ्यांत साठवत होते. तिने भैरवी रागातील ठुमरी गायला सुरवात केली..
*आ जा सावरिया,
रसके भरे तोरे नैन, सावरिया ।
दिन नही चैन मोहें, रात नही निंदिया,
तडपत हूँ बिन रैन, सावरिया ।।
सारी मैफलच मंत्रमुग्ध झालेली. तिने भैरवी घेतलीय याचेही भान कुणाला राहिले नव्हते. सारे भावशब्दांत रंगलेले असतानाच ती मैफलीचा निरोप घेऊन आपल्या खोलीत आली. स्वर थांबले, सतार मूक झाली. हळूहळू एकेकजण भानावर येऊन तृप्त मनाने स्वरांच्या लहरीवर स्वार होत त्या संमोहनातच बाहेर पडू लागला. सारे परतले. दिवे मंद केले गेले. इतकावेळ नृत्य-नादात रमलेली, रुणझुणणारी पैंजणेथकून विसालीी..काही क्षणातच सरल्या मैफिलीचे उदास अस्तित्व बैठकीच्या खोलीत भरून राहिले. थकलेले साजिंदे बाहेर पडले तसे सखीने दार पुढे लोटले, बैठकीतील दिवा मालवला आणि आपल्या खोलीत गेली.
ती रतिक्लांत होऊन एकटीच मंचकावर पहुडली होती. तिच्या खोलीतला प्रकाशही थकल्यासारखा मंद झाला होता. ती स्वतःच्याच विचारात गढून गेली होती. जीव जगवण्यासाठी आपला देह विकावा लागावा, आपल्या चारित्र्याचा असा बाजार मांडायची वेळ आपल्यावर यावी याची खंत एकटेपणात तिच्या मनाला जाळत असायची. स्वतःच्या विचारात असताना तिला कुणाची तरी चाहूल लागली तशी तीखोलीच्या दाराशी आली. समोरून अंधारातून कुणीतरी येत होते. तिला आश्चर्य वाटलं. ही वेळ कुणी येण्याची नव्हती. तन-मन तृप्तीच्या नशेत परत जाण्याची होती. तो समोर आला. नवख्यासारखा बुजलेला… ती त्याला धीर येण्यासाठी छानशी हसली.
तो काहीसा दबकतच तिच्याजवळ आला आणि म्हणाला,
” माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे,राणी…”
कमलदलासारखे ओठ जरासे विलगून ती हसली. अनेकजण तिला असेच म्हणायचे, अजूनही म्हणतात. अगदी सुरवातीच्या काळात तिला ते खरं वाटायचं, मन फुलून यायचं. पण नंतर मात्र तिला त्या वाक्याचा अर्थ मनाशी, हृदयाशी नसून देहोपभोगाशी आहे हे कळून चुकले होते.
ती हसत म्हणाली,
” थांबा, विडा देते ,तो घ्या आणि उद्या या.. थोडा जास्त दाम घेऊ यान..”
तिने विडा बनवायला पान हातात घेतले आणि वर पाहिलं. तो काही न बोलता झटकन अंधारात विरून जावा तसा गेला होता. काही क्षण ती त्याला इकडे-तिकडे शोधत राहिली. दुसऱ्या दिवशी त्याची वाट पाहिली. वाट पहातच राहिली. तो आलाच नाही.
तिच्या भांग भरल्या मनात, जीवनात तोप्रीतीची तुळस लावून गेला होता. आपण त्याला नीट पाहिलेही नाही ही जाणीव तिच्या मनाला खात राहिली. एकटेपणात त्याच्या शब्दांची, नीट न पाहिलेल्या त्याच,ी आठवण तिला सतावत राहिली. आसावल्या डोळ्यांनी ती त्याची वाट पहायची त्याने, एकदा… एकदा तरे यावे, भेटावे असे तिला वाटत होत.पण तो आलाच नाही.
वर्षे लोटत राहिली पण तो मात्र ध्रुव ताऱ्यासारखा तिच्या मनाकाशात अढळ स्थानी राहिला होता. तो दिवस हाच.. ती सारे काही सोडून याच दिवशी व्रतस्थ राहून त्याची वाट पाहत राहायची.
सखी बोलवायला आली तेंव्हा तिने खोलीचे दार दडपून बंद केले होते पण मनाची दारे मात्र सताड उघडली गेली होती.. फक्त त्याच्यासाठी. फक्त त्याच्यासाठीच तिने विडा बनवला. तो येणार नाही हे जाणवत असूनही ती मंचकावर त्याची वाट पाहत बसली होती.. सारी रात्र ती तशीच त्याची वाट पाहत बसून राहिली होती. आतुर झालेले मन त्याला साद घालत होते.
आन मिलो इकबार सजनवा ।
याद में तोरी रैन बिताई
सून लो जिया की पुकार ।।
तिच्या डोळ्यांना आसवांच्या धारा लागल्या होत्या.. गालावरून आसवे ओघळत होती.. तिचे आर्त स्वर तिच्या मनात आणि खोलीत भरून राहिले होते.असा जोगीया कधीच रंगत नव्हता..कधीच रंगला नव्हता.
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈