श्रीमती उज्ज्वला केळकर
मनमंजुषेतून
☆ साठवणीतल्या आठवणी – स्व. ह. मो. मराठे ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
७६-७८चा सुमार असेल. मी जरा उत्साहाने कविता लिहित होते. चांगल्या, दर्जेादर मासिकातून याव्यात असं वाटत होतं. पण एकूण स्वभावात न्यूनगंडच जास्त. एकदा माझ्या इंदूरच्या मामेभावाला शरदला मी कविता वाचायला दिल्या. तो म्हणाला, `चांगल्या आहेत.’ मी म्हंटलं, `स्त्री-किर्लोस्कर’कडे यायला पाहिजेत.’ तो म्हणाला, `त्यात काय? किर्लोस्क प्रेसमध्ये जा. मुकुंदरावांना भेट आणि तुझ्या कविता दे. एकदम बाड त्यांच्यापुढे टाकू नकोस . दोन-तीन कविता दे.’
माझ्यात आत्मविश्वास जरा कमीच. त्यात अक्षर चांगलं नसणं, हा आणखी एक मायनस पॉइंट. मी जरा का कू करतेय, असं पाहिल्यावर, माझी वहिनी ललिता मला पुढ्यात घालून प्रेसमध्ये घेऊन गेली.
एका मध्यम आकाराच्या हॉलमध्ये काही सुट्या सुट्या टेबल-खुच्यांवर बसून लोक काम करत होते. अजून संगणक आला नव्हता. साहित्य वाचणं, तपासणं, टायपिंग, फायलिंग वगैरे कामं चालली होती. समोरच एका टेबलामागच्या खुर्चीवर एक उंच, गोरे, चष्मिष्ट गृहस्थ बसलेले दिसले. आम्ही त्यांच्यापुढे उभे राहिलो.
`काय पाहिजे?’
`मुकुंदरावांना भेटायचय.’
`ते बाहेर गेलेत. काय काम आहे?’
`अं… कविता द्यायच्यात.’
`बघू…’ मी कविता त्यांच्या हातात दिल्या आणि लहान मुलीसारखं बजावलं, `नक्की द्या हं त्यांना.’ त्यांनी हसून मान डोलावली. मग वाटलं आपण आपली मौल्यवान इस्टेट (कविता) कुणाकडे सोपवली, त्यांचं नाव तरी माहीत असावं, म्हणून नाव विचारलं. ते म्हणाले, `ह. मो. मराठे’’. तोपर्यंत तरी एक लेखक म्हणून हे नाव मला परिचित नव्हतं. मासिकातून त्यांच्या कथा-लेख वाचलेही असतील, पण ते लेखन आणि ह.मो. हे नाव, याचं समीकरण डोक्यात फिट्ट झालं नव्हतं. तोपर्यंत साहित्य क्षेत्रात आपलं स्थान निर्माण करायची ह.मों.ची धडपड चालू होती, पण प्रथितयशाचं वलय त्यांच्या नावाभोवती अद्याप तेजाळायचं होतं.
त्यानंतर दोन महिन्यांनी माझी एक कविता किर्लोस्करमध्ये प्रकाशित झाली. आणखी काही महिन्यांनी दुसरी. पुढे कळलं, किर्लोस्कर मध्ये छापायच्या साहित्याची बहुतेक सारी निवड तेच करतात.
जानेवारी ७७ पासून ‘किर्लोस्कर’ ने एक उपक्रम राबवला. दरमहा जिल्हावार कविसंमेलने घ्यायची व त्यातल्या ७ कविता किर्लोस्करमध्ये प्रसिद्धीसाठी निवडायच्या. ज्या जिल्ह्यात, ज्या गावी हे कविसंमेलन आयोजित करायचं. तिथल्या एका संस्थेने जबाबदारी घेऊन कविता संकलित करायच्या. त्यापैकी ३० कविता (प्रत्येकी १ किंवा २ ) संमेलनात वाचण्यासाठी निवडायच्या. सांगली नगर वाचनालयाने या उपक्रमाचे यजमानपद स्वीकारले. ३५० कविता आल्या होत्या, असे नंतर कळले. माझ्या `जन्म’ आणि `पेपर’ या दोन्ही कवितांची निवड वाचनासाठी झाली होती. किर्लोस्करकडून ह. मो. मराठे, संजीवनी मराठे या ज्येष्ठ कवयित्रींना घेऊन आले होते. त्यातून ज्या ७ कविता छापण्यासाठी निवडल्या गेल्या, त्यात माझी ‘पेपर’ कविता होती.
त्यानंतर ह.मों.चं एक पत्र आलं. तुमची परवानगी असेल, तर मी `तुमच्या `पेपर’ कवितेवर एक कथा लिहू इच्छितो.’ या मधल्या काळात ह.मोच्या कथा माझ्या वाचनात आल्या होत्या आणि त्या मला आवडल्याही होत्या. एक चांगला, जाने -माने कथालेखक आपल्या कवितेच्या कल्पनेवर कथा लिहितोय म्हंटल्यावर मी जरा फुशारलेच आणि त्यांना आनंदानं परवानगी दिली. त्यानंतर किती तरी महिन्यांनी त्यांची भेट झाल्यावर मी त्यांना विचारलं, `माझ्या `पेपर’ कवितेवर तुम्ही कथा लिहिणर होतात, लिहीलीत का?’
`हो! गोमंतकच्या दिवाळी अंकात ती छापूनही आली.’
‘मला वाचायला का पाठवली नाहीत?’
`तुम्ही कुठे म्हणाला होतात, कथा पाठवा म्हणून?’
`अच्छा? म्हणजे असं मुद्दाम सांगायला लागतं का? मला वाटलं माझ्या कवितेवर लिहिताय, म्हणजे आपणहून पाठवाल तुम्ही!’ त्यानंतर तो विषय तिथेच थांबला. मला ती कथा कधीच वाचायला मिळाली नाही.
किर्लोस्करमध्ये माझी `पेपर’ कविता प्रकाशित झाली आणि पाठोपाठ ह. मों.चं पत्र. `नियमाप्रमाणे तुम्हाला मानधन मिळेल, पण मी एक गोष्ट सुचवू इच्छितो, त्याऐवजी, पुढल्या महिन्यापासून तुम्हाला वर्षभर किर्लोस्करचे अंक पाठवले तर चालतील का? (या महिन्याचा अंक तुमची कविता आल्यामुळे तुम्हाला येईलच.)’ मी वर्षभर किर्लोस्करच्या अंकाचा पर्याय स्वीकारला. एवढंच नाही, तर पुढेही किती तरी वर्ष स्त्री-किर्लोस्करची वर्गणी भरत राहिले. मला वाटतं, अनेकांनी दुसरा पर्याय स्वीकारला असणार. कारण त्यावेळी, घराघरात टी.व्ही.ची इडियट बॉक्स बसलेली नव्हती. त्यानंतरही पुढे कितीतरी वर्षं मी स्त्री-किर्लोस्करची वर्गणी नियमितपणे भरत राहिले. मला वाटतं, अनेकांनी तसंच केलं असेल.
त्यानंतर काही वर्षांनी ह.मों.चं `मधलं पान’ पुस्तक वाचनात आलं. त्यात त्यांनी आपण लोकप्रभा, सामना, घरदार, इ. नियतकालिकांचा खप वाढवण्यासाठी काय काय प्रयत्न केले, कोणते उपक्रम राबवले, ते सारं विस्तारानं लिहिलय. ते सगळं वाचताना वाटलं, किर्लोस्करचा जिल्हावार कविसंमेलनाचा उपक्रम हा नव्या दमाच्या कवींच्या प्रतिभेचा शोध ( म्हणजे तसं त्यावेळेला म्हंटलं गेलं तरी…) यासाठी नसून तिथेही किर्लोस्करचे वर्गणीदार वाढवावेत हाच हेतू असावा.
प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈