सौ राधिका भांडारकर

?  विविधा ?

☆ महात्मा ☆ सौ राधिका भांडारकर  

राष्ट्रातील प्रत्येक घर ही शाळा आहे.आणि घरातील मातापिता हे शिक्षक आहेत.

 

ही पृथ्वी ,हवा, भूमी, पाणी,हे सर्व म्हणजे आपल्या बापजाद्यांनी वारसाहक्काने दिलेली मालमत्ता नव्हे,तर ते पुढील पिढ्यांसाठीची जोखीम आहे.ती किमान जशीच्या तशी त्यांच्या हाती सोपवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

तलवार ही शूराची निशाणी नाही तर ती भीतीची निशाणी आहे बलहीन व्यक्ती कुणाला ही क्षमा करु शकत नाही. बलवान माणूसच क्षमा करु शकतो.

 

जे लोक म्हणतात,धर्माचा राजकारणाशी संबंध नाही त्यांना धर्म काय हेच माहीत नाही.

 

असे आणि अशा तर्‍हेचे अनमोल विचार देणारे गांधीजी त्यांची आज जयंती.त्यानिमीत्ताने त्यांच्या बहुमोल विचारांचे चिंतन व्हावे ही अपेक्षा…

नेता याचा अर्थ मी असा समजते की जो समाजाला,सत्याच्या,न्यायाच्या ,नीतीच्या मार्गावर नेतो तो नेता.तो जाणता असला पाहिजे.निस्वार्थी असला पाहिजे.

समाजाची दु:ख,होरपळ या बाबतीत कृतीशील कनवाळु असला पाहिजे.त्याच्या कार्यावर त्याचा स्वत:चा विश्वास ,श्रद्धा,भक्ती आणि त्या प्रवाहात इतरांना आत्मविश्वासाने घेउन जाणारा हवा…

।।वैश्णव जन तो तेने कहिये जो पीड पराई जाणे रे।।

स्वातंत्र्यपूर्व काळातील गांधीजींची हीच प्रतिमा होती..

म्हणून ते लोकनेता ठरले.ते देशाचे बापू झाले. राष्ट्रपिता ठरले.

गांधीजींना महात्मा हे संबोधन दिलं गेलं कारण ,एक स्वतंत्र सेनानी, अहिंसेचा पुरस्कर्ता म्हणून त्यांचे संपूर्ण कार्य महान होते.त्यांनी त्यांचं आयुष्य देशाला समर्पित केलं होतं.ते खर्‍या अर्थाने लोकांप्रती,लोकांसाठी आणि लोकांतर्फेच होते.!

सत्य अहिंसा परमोधर्म…

ही त्यांची निष्ठा होती.जीवन सूत्री होती.न्यायासाठी त्यांनी अंदोलने केली. चंपारण्य अंदोलनाद्वारे,शेतकर्‍यांवर होणार्‍या अत्याचाराला वाचा फोडली.. ब्रिटीश जमीनदारांच्या विरोधात हडताळ केले. आणि त्यांना झुकण्यास भाग पाडले. “भारत छोडो” अंदोलनात,

‘करो या मरो’ असा घणाघाती नारा दिला. लोकांच्या जाणीवा पेटवल्या. गुलामगिरीचे जोखड फेकून देण्यासाठी प्रवृत्त केले.

जातीभेद,अस्पृष्यता वर्णद्वेष,यांच्या उच्चाटनासाठी ,त्यांनी त्यांचं जीवन समर्पीत केलं.

गोल चष्मा ,काठी ,चरखा आणि पंचा म्हणजे गांधींची प्रतिकात्मक छबी!

या उघड्या भारतीय नेत्यांने जगाला नमवलं..थक्क केलं..

मातृभूमीसाठी त्यांनी बलीदान केलं. भारतीयांच्या मनात ते राष्ट्रपती आणि बापू  म्हणूनच सदैव जागृतच असतील.

प्रख्यात शास्त्रज्ञ, आईनस्टाईनने, गांधीजींच्या बाबतीत असं म्हटलं आहे, की “असा कुणी माणूस या धरतीवर निर्माण झाला होता ,हेच एक महान आश्चर्य आहे,.”

गांधीवाद, गांधीजींची तत्व, त्यांचे जीवन, त्यांच्या निष्ठा, म्हणजे एक मोठा अभ्यासक्रम आहे. एक संस्कृती प्रणाली आहे.

बदलत्या काळानुसार उलटसुलट वैचारिक प्रवाह  वाहताना दिसतात.

आज गांधीजी असते तर…? पासून ते गांधीजींने हे करायला नको होतं… पर्यंत विचारधारा आहेत..

आजही जनयात्रा, रथयात्रा, आशिर्वाद यात्रा निघतात.

उपोषणं केली जातात.. अंदोलने होतात. धरणे धरली जातात. संप होतात.. केंद्रस्थानी गांधीजींचे उपोषण, गांधींची दांडीयात्रा ही शिकवण असेलही पण ती तळमळ ,ती तात्विकता ,समर्पण आहे का?….

गांधी हत्येचं समर्थनही केलं जातं

GREAT MEN COMMIT GREAT MISTAKE

असं कंसात म्हटलंही जातं.

पण माझ्या मते गांधी एक इतिहासाचं पान आहे…

एक संस्था आहे.

एक ग्रंथ आहे.

वेळोवेळी उघडावा, वाचावा, अभ्यासावा…

गांधीजींचे जीवन म्हणजे मूर्तीमंत गीता आहे!

झाले बहुत।होतील बहुत।

परी या सम हाच।।

या दिव्यत्वासमोर कर माझे आदरे जुळती….!!

दोन आॅक्टोबर. आज त्यांची जयंती .म्हणून

या तत्वाला भावपूर्ण आदरांजली!!

धन्यवाद!

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments