डॉ अभिजीत सोनवणे
विविधा
डॉक्टर फॉर बेगर्स डॉ अभिजीत सोनवणे ☆
☆ आई—!!! भाग 1 ☆
(©️doctor for beggars )
एप्रिल चा पहिला आठवडा !
रस्त्यांवर लाॕकडाउन मुळे भयाण शांतता. नाही म्हणायला पोलीस जागोजागी… !
मी भिक्षेक-यांचा डाॕक्टर … माझं काम रस्त्यावरच !
लाॕकडाउन च्या काळात ज्यांना घरं होती, मग भले ती झोपडपट्टीत का असेनात, त्यांना घरी रहायला बजावुन सांगितलं…! ज्यांना घरं नाहीत अशांना काॕर्पोरेशनने निर्माण केलेल्या निवारा केंद्रात पाठवुन दिलं. आता माझ्या भिक्षेकरी वर्गापैकी रस्त्यांवर कुणी नव्हतं. तरीही चुकुन कुणी सापडतंय का हे बघत मी रस्त्यांवरुन फिरत होतो.
फिरता फिरता एका मंदिरापाशी आलो. मंदिराबाहेर शुकशुकाट. मंदिराची दारं बंद… ना भिक्षेकरी… ना भक्त !
—मी तिथुन निघणार तेव्हढ्यात भिक्षेकरी बसतात त्या ठिकाणी एक आजी बसलेली मला दुरुन दिसली. ही माझ्या ओळखीची नव्हती. कपडे ब-यापैकी नीटनेटके… !
भिक्षेकरी वाटत नव्हती…! मग ही इथं का बसली असेल ? माझी उत्सुकता वाढली. मी जवळ गेलो…
हा आता आपल्याला काहीतरी देणार या आशेनं तीनं आपसुक हात पुढे केला.
मला आश्चर्य वाटलं… भिक्षेकरी तर वाटत नाही…मग हात का पुढे करावा हिने ?
वय असेल साधारण 70-75 वर्षे. डोईवरचे सर्व केस पांढरे, डोळे खोल गेलेले, चेह-यावर सुरकुत्यांचं जाळं… हाताच्या बोटापर्यंत पसरलेलं… ! या जाळ्यात मध्येच लुकलुकणारे दोन डोळे, चेह-यावर अजीजी, करुण भाव … !
‘आजी इथं का बसलाय ?’ मी विचारलं.
‘काही नाही, बसल्येय हो देवळाच्या दारात, आपण पोलीस आहात का? बोलणं मृदु आणि स्वच्छ !
माझी खात्री झाली, आजी भिक्षेकरी नाही.
तरीही तिला म्हटलं, “ देवळाच्या दारात बसलाय म्हणता, आणि इथं बसुन मागता. बरोबर ना ? मघाशी हात पुढं केलात, बघितलं ना मी…”
तिनं चमकुन माझ्याकडं पाहिलं, डोळ्यात पाणी तरारलं… पण बोलली काहीच नाही.
“ उठा आजी असं उघड्यावर बसू नका, सध्या काय चालु आहे माहित आहे ना ? जा घरी…कुणी येणार नाही काही द्यायला “. मी पुन्हा बोललो.
ती ओशाळली, म्हणाली, “ तसं नव्हे हो ! जाते मी इथुन …. कुणी येणार नाही काही द्यायला…काय करणार नशीबच फुटकं…! “—-मला या वाक्याचा अर्थ कळला नाही.
ती उठली… जायला निघाली.— मनात नसतांनाही ती जायला उठली, पण तिला थांबायचं होतं अजून— माझ्याकडं तिनं ज्या केविलवाण्या नजरेनं पाहिलं त्यात मला ते स्पष्ट जाणवलं.
मलाच वाईट वाटलं. म्हटलं, “आजी, मी डाॕक्टर आहे, काही औषधं लागत असतील तर सांगा, दुसरी काही मदत हवी असेल तर सांगा…! पण कुणाला भीक मागायला लागू नये यासाठी मी काम करतोय, शिवाय तुम्ही चांगल्या घरातल्या वाटताहात…आणि …”
ती चालता चालता थबकली, वळून हसत म्हणाली…” चांगलं घर , वाईट घर असं पण असतं का ?”
“ नाही तसं नव्हतं म्हणायचं मला…” मी काहीतरी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
ती हसली; काहीतरी विचार करुन म्हणाली, “ केळी आहेत का तुमच्याकडे ? “
मला काही कळेचना, ब-यापैकी परिस्थिती वाटते, भिक्षेकरी तर वाटत नाही, तरी इथं मंदिरात काही मिळेल या आशेनं ती इथं बसली होती, हटकल्यावर निघाली, आता जातांना केळी मागते…!
मानसिक रुग्ण असावी का ?—– उलगडा होईना. उत्सुकता अजुन चाळवली.
मी तिच्या मागं गेलो, म्हणालो “ आजी… काय झालं… इकडे कुणाची वाट पहात होता का ? काही हवं होतं का… ? “
“ मला केळी द्याल…? ” पुन्हा तिनं भाबडेपणानं विचारलं.
मी डायरेक्ट मुद्द्यावर आलो, “ आजी झालंय काय ? नीट सांगाल, तर मी नक्की काहीतरी मदत करेन…! ”
क्रमशः —-
© डॉ. अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈