श्री अरविंद लिमये
विविधा
☆ एक गूढ निरोप. . . भाग 2 ☆ श्री अरविंद लिमये ☆
पूर्वसूत्र- “या वर्षी तरी दिवाळी पाडव्याची आपली नामसाधना आपल्याच वास्तूत व्हावी असं आपलं मला वाटतं. त्यानंतरच्या दिवाळीपासून जावई म्हणालेत तसं करू.” त्यांनी आजोबांना सुचवलं. ते विचारात पडले. त्यांना काय बोलावं ते सुचेचना.
“पण थोडक्यासाठी त्यांना दुखावले असं नको व्हायला. ठरलंय तसंच होऊदे” ते म्हणाले. आजी हिरमुसल्या.
“ठरलंय तसं करू पण नाईलाज झाला तरच. मी बोलेन जावयांशी.समजावेन त्यांना. सांगून बघू तरी काय म्हणतात ते.” आजी म्हणाल्या.
जे जे होईल ते ते पहावे असा विचार करून आजोबा नाईलाजाने गप्प बसले.)
जावई आढ्यतेखोर नव्हतेच.त्यामुळे त्यांनी आजींच्या विनंतीला मान दिला. मग पूर्वीप्रमाणे त्या वर्षीही सर्वजण दिवाळीसाठी सोलापूरच्या बंगल्यातच एकत्र आले. दिवाळीच्या फराळाचे सर्व जिन्नस सुनेच्या मदतीने पुढाकार घेऊन आजीनीच बनवले होते. त्यांनी मुलं, सुना, मुलगी, जावई, नातवंडं सर्वांसाठी आपले आशीर्वाद म्हणून त्यांच्या त्यांच्या आवडीच्या भेटवस्तूही आवर्जून खरेदी केलेल्या होत्या. या वर्षीच्या दिवाळीची रंगत काही औरच होती. पाडव्याच्या आदल्या रात्री स्थानिक साधकांना नामसाधनेसाठी आमंत्रित केलेले होते. रात्री उशीरपर्यंत नामसाधना, मग अल्पोपहार, भक्तिगीतांचा कार्यक्रम,असा भरगच्च कार्यक्रम होऊन त्या आनंदसोहळ्याची सांगता झाली. त्या रात्री आजी- आजोबांनी अतिशय प्रसन्नचित्ताने अंथरुणाला पाठ टेकली. रात्री झोपायला खूप उशीर होऊनसुद्धा ठरल्याप्रमाणे पहाटे चार वाजता रोजच्यासारखी दोघांनाही जाग आली.
रोज असे पहाटे उठून मुख-संमार्जन करून दोघेही गुरुदेवांसमोर निरांजन लावून त्यांना मनोभावे नमस्कार करून नामसाधनेला बसत.नेमक्या ठराविक वेळी अंत:प्रेरणेनेच आजोबा प्रसन्नचित्ताने नेमातून बाहेर येत. मग उठून फुलांची परडी आणि दुधाचे पातेले घेऊन बागेत जात. दूधवाला येईपर्यंत त्यांची फुलांची परडी बागेतल्या फुलांनी अर्धी भरलेली असे. तो येताच पातेल्यात दूध घेऊन ते खिडकीत ठेवीत. बाकी फुले काढून आत येईपर्यंत दूध गॅसवर चढवून आजीनी चहाची तयारी सुरू केलेली असे. हा त्यांचा गेल्या कित्येक वर्षांचा न चुकणारा दिनक्रम. आजही असेच झाले. नेहमीप्रमाणे फुले काढत असताना दूधवाला येताच आजोबांनी दूध घेऊन पातेले खिडकीत ठेवले.फुले काढून झाल्यावर ते आत आले तरीही आजी अजून साधनेतच. खिडकीत दुधाचे पातेले तसेच होते. आजी नामसाधनेत तल्लीन. त्यात व्यत्यय येऊ नये म्हणून आजोबांनी खिडकीतले
पातेले हळूच घेऊन ते आत नेऊन गॅसवर चढवले. चहाची सगळी तयारी करून ठेवली. आणि देवघराच्या दाराशी येऊन त्यांनी हलक्या आवाजात आजीना हाक मारली. प्रतिसाद आला नाही तसे पुढे होऊन त्यांनी आजींच्या खांद्यावर हलक्या हाताने थोपटले तशी त्या स्पर्शाने आजींची मान कांहीशी कलली. आजोबांना वेगळीच शंका आली. क्षणार्धात ती खरीही ठरली. नामसाधनेतल्या तल्लीनावस्थेतच आजी परतत्त्वात विलीन झाल्या होत्या!
दुसऱ्या दिवशीच्या पेपरमधे आजी गेल्याची बातमी वाचून मला धक्काच बसला. पण त्यांच्या या अलौकिक जिवा-शिवा च्या भेटीचा वृत्तान्त मी कुंटे आजोबांच्या सांत्वनासाठी गेलो तेव्हा मला समजला. सांगताना आजोबा स्थिरचित्तच होते.
“मृत्यूसुद्धा कृपावंत ठरला तिच्यासाठी.” ते म्हणाले होते.
“आला तेही तिला कणभरही वेदना न देता. नामस्मरणात दंग असताना मोठ्या सन्मानपूर्वक पालखीतून मिरवत न्यावं तसं घेऊन गेला तिला. माझ्यासकट सगळ्या सग्यासोयऱ्यांना या उत्सवासाठी जणू काही तिने आवर्जून बोलावून घेतले होते. स्वतःसह सगळीच छान आनंदात असताना अशी अलगद निघून गेली….!! “
आजोबा म्हणाले होते. त्यांच्या आवाजात थरथर जाणवत होती.पण चेहऱ्यावर मात्र त्यांच्या आनंदाश्रूनी ओलावलेल्या नजरेतून अलगद विलसलेलं अस्फुटसं स्मित..!
ऐकतानासुध्दा अंगावर शहारा आला होता माझ्या..!
कांही कांहीं अनुभव अविस्मरणीय असतात ते असे.
खूप विचार करुनही या अशा प्रस्थानाचं गूढ मला आज तागायत उलगडलेलं नाहीय. कुणालाही निरोप न देता न् कुणाचाही निरोप न घेता आलेला असा कृतार्थ मृत्यू विरळाच.त्या अर्थाने कुंटे आजी भाग्यवान हेही खरेच.पण तरीही एक निरुत्तर प्रश्न आजही माझ्या मनात डोकावून जातोच.’ठरल्याप्रमाणे दिवाळीला लेक जावयाकडे जाण्याचा बेत बदलायची व सर्वांना दिवाळीला इकडेच बोलावून घेण्याची आजीना झालेली प्रेरणा ही एक निव्वळ योगायोग की त्यांना आधीच लागलेली स्वतःच्या प्रस्थानाची चाहूल?
या प्रश्नाचं उत्तरही आजींसोबतच निघून गेलंय.म्हणूनच तो प्रश्न माझ्यासाठी तरी आजींच्या मृत्यू सारखाच एक गूढ बनून राहिलेला आहे..!
समाप्त
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈