श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
मनमंजुषेतून
☆ शुभंकरोती….….! ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
आज्जी भूषणला म्हणाली, “बाळा, दिवेलागणीची वेळ झाली, शुभंकरोती म्हणायला चल. हातपाय धुवून ये हं.” भूषण आला नि आज्जीजवळ बसला. आज्जी शिकवायला लागली.” शुभंकरोती कल्याणम् आरोग्यम धनसंपदा———-बाहेरची लक्ष्मी घरात येवो, घरातली इडापिडा बाहेर जावो,” हे सगळं आज्जीने शिकवलं.
भूषण म्हणाला, “आजी, लक्छुमी म्हंजे काय?”
आज्जीने सांगितलं, “लक्ष्मी म्हणजे पैसे, दागिने, धान्य, वगैरे.”
“आनी इलापिला म्हंजे काय?”
त्याला समजेल अशा भाषेत आज्जीने सांगितलं—-
” इडापिडा म्हणजे गरिबी, खायला मिळत नाही, फाटके कपडे, आजारी पडणं असं सगळं “
“इलापिला बाहेल जाऊदे म्हंजे कुथे?”
“जाऊदे तिकडे रस्त्यावर” आज्जीने उत्तर दिलं .
“मी शुभंकलोती म्हननाल नाही.”
“कारे”?आज्जीने विचारलं.
“लश्त्यावल पबीचं घल आहेना! (पबी म्हणजे त्याची छोटी मैत्रिण प्रभी,ती झोपडीत रहाते.)
इलापिला तिच्याकले गेली तल ती आजाली पलेल”.
लहानशा भूषणचा समाजवाद ——
—–आज्जीला खूप काही शिकवून गेला.
प्रस्तुती : श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
सांगली
मो. – 8806955070
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈