श्री उदय गोपीनाथ पोवळे
जीवनरंग
☆ पितृपक्ष …भाग 1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
“काव, काव ……. काव, काव, काव”
गेले वीस मिनिट्स संदेश काव काव करतोय, पण एकही कावळा ठेवलेल्या पानाला शिवायला येत नव्हता. तरीही बरे तात्यांना जिलेबी आणि मठ्ठा आवडत असे म्हणून मुद्दाम मुंबादेवी जिलेबीवाल्याकडून जिलेबी आणली होती. तरी पण कावळा काही पानाजवळ येत नव्हता. त्याच्या बिल्डिंग मधल्या सोपानकर आणि जोशीने ठेवलेल्या पानांना कावळा लगेच शिवला होता. हे असे का होते ते मात्र संदेशला पुरते माहित होते—-
तात्या जाऊन आता दहा महिने झाले असतील. पण अजूनही संदेश त्या धक्यातून बाहेर पडला नव्हता. संदेशला एक मोठा भाऊ समीर आणि एक बहीण संध्या. संध्या लग्न होऊन तिच्या संसारात मग्न होती, आणि समीरने पण बँकेतील नोकरी करत लोन घेऊन विरारला स्वतःचा २ बेडरूमचा फ्लॅट घेतला होता आणि आपल्या बायको आणि दोन लहान गोंडस अशा मुलांबरोबर संसारात खुश होता. समीरने नवीन फ्लॅट घेतला तेंव्हा तात्यांना दाखवायला नेले होते. पण त्याने तात्यांना ‘ गिरगावातील चाळ सोडून कायमचे माझ्याकडे या ‘ असे कधीही म्हटले नव्हते. समीरने तात्यांना जरी सांगितले असते तरी तात्यानी ते कधी ऐकले ही नसते. तात्यांचे जवळजवळ संपूर्ण आयुष्य हे चाळीमध्ये गेले असल्याने चाळ सोडून तात्या कुठेच रहायला तयार नव्हते.
वयाच्या विसाव्या वर्षीच गावावरून मुंबईला आलेल्या तात्यांनी लहानसहान कामे करता करता ‘बेस्ट’ मध्ये कंडक्टरची नोकरी मिळवली आणि रिटायर्ड होइपर्यंत इमानेइतबारे लोकांची सेवा केली. त्याच नोकरीवर तात्यांनी या तिन्ही भावंडाना शिकवून मोठे केले. आईच्या अकस्मात निधनाने तात्या खचले. त्यांच्या पाठीच्या ताठ कण्याने बाक घेतला. रिटायर्ड होईपर्यंत तर तात्यांना काही ना काही आजाराने ग्रासले होते.
वाडीतल्याच एका मुलीने संदेशच्या प्रेमाला बाजूला करून तिच्या बॉस बरोबर लग्न केले आणि संदेशचा प्रेमावरचा विश्वासच उडाला. संदेशने लग्न न करता तात्यांबरोबर तात्यांसाठी चाळीतच रहायचे असे ठरविले. लग्न कर, लग्न कर अशी तात्यांची भुणभुण नेहमीच असायची. पण त्याकडे संदेशने कायम दुर्लक्षच केले. संदेशने लग्न केल्यावर तात्या काही चाळ सोडून नवीन जागेत आले नसते, आणि एखादी चांगली शिकलेली मुलगी चाळीत राहायला तयार झाली नसती. त्यामुळे संदेशने लग्नाचा विचार कायमचा सोडून दिला आणि तो तात्यांबरोबर रहात होता.
गेले तीन वर्षे तात्यांच्या आजाराने डोकं खूपच वर काढलं होतं . प्रोस्टेटच्या त्रासाने तात्या ग्रासले होते. उपचार, ऑपरेशन हे चालूच असायचे. त्यामध्ये डायबिटीस असल्याने खाण्यावरही बंधन होती. गोड खायला बंदी होती तरी तात्या न ऐकता रोज काही ना काही गोड खातच असत. वेळेवर गोळ्या घेऊन स्वतःच स्वतःची काळजी घेत असत.
आज कावळा ठेवलेल्या पानाला शिवत नाही हे पाहून संदेशला दहा महिन्याआधीचा काळ डोळ्यसमोर आला. शेवटचा एक महिना तात्या हॉस्पिटलमध्येच होते. समीर दोन दिवसांनी एक चक्कर मारायचा, बाकीचा वेळ संदेशच हॉस्पिटलमध्ये थांबत होता. तात्या गेले, त्याच्या तीन दिवस आधी तात्यांनी संदेशला जवळ बसविले. संदेशचा हात हातात घेऊन तात्या बोलायला लागले, ” संदू, आता मी काही जास्त दिवस बघीन असे वाटत नाही. मला माहित आहे माझ्या काळजीपोटी तू लग्न केले नाहीस. माझी नको तेवढी सेवा तुझ्याकडून झाली आहे. एका बापाच्या आपल्या मुलाकडून ज्या काही अपेक्षा असतात, तशा माझ्या सगळ्या अपेक्षांना तू पूर्तता दिलीस. आता फक्त तुला एकच काम माझ्यासाठी करायचे आहे. ते पण मी गेल्यावर— तुझं पुढचं आयुष्य असे एकट्याने न काढता तू लग्न कर. आपली चाळीतली जागा मी तुझ्याच वाटणीला ठेवली आहे. तू तुझा जो काही प्रिंटिंगचा धंदा करतोयस तो आता वाढव. त्यासाठी मी माझ्या पाच लाखाच्या फिक्स्ड डिपॉसिट्स पण तुझ्याच नावावर करून ठेवल्या आहेत. तसे मी माझा मित्र कर्णिक वकिलाकडे माझे मृत्युपत्र बनवून ठेवले आहे.
क्रमशः ….
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
ठाणे
मोबा. ९८९२९५७००५
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈