डॉ. ज्योती गोडबोले

? मनमंजुषेतून ?

☆ शुक्रवारची कहाणी …. ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

(व्हाट्सअपवरून आलेल्या एका अतिशय चांगल्या मेसेजवरून सहज सुचलेलं.)

कीर्ति लहान असल्यापासून मी तिला ओळखत होते.आमच्या शेजारीच राहायचे हे लोक.

कीर्ति फार हुशार मुलगी– स्वभावाने गरीब, भिडस्त, सर्वांना मदत करणारी.  पुढे ते दुसरीकडे राहायला गेले, मग  फारसा  संपर्क नाही राहिला. पण कानावर येत असत बातम्या, की कीर्ति  छान शिकतेय– एका चांगल्या फर्ममध्ये नोकरीही लागलीय. कीर्तिला लहान भाऊही होता, तोही एमबीए झाला, चांगला पगारही मिळवू लागला.

मग असे कानावर आले,की कीर्तीने आईवडिलांच्या मनाविरुद्ध लग्न केले. मुलगा  गरीब कुटुंबातील होता, कीर्तिइतका पगारही नव्हता त्याला. माहेरची श्रीमंत कीर्ति, आता भाड्याच्या घरात राहू लागली. पण ती खूश होती. 

भावाचे लग्न झाले. आईने अगदी श्रीमंत घरातली सून शोधली. मुलगी दिसायला अगदी बेताची.  शिक्षणही फारसे नाही. पण म्हणतात ना, पैसा बोलतो. सगळी उणीव पैशाने भरून काढली होती त्या लोकांनी. कीर्तिची आई फारच खुश होती. नवीन भावजय  श्रीमंत घरातली. उशिरा उठायची. सासूबाई आयता चहा-नाश्ता  हातात द्यायच्या. कामाची सवय होती कुठे?

दरम्यान,कीर्तिच्या आईचा एक फ्लॅट रिकामा झाला.  बाबा म्हणाले, “ कशाला भाडे भरत बसतेस? तुम्हीच रहा या फ्लॅटमध्ये. “ —ते  त्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले. फ्लॅट तिच्या माहेरपासून जवळच होता.  कीर्तीला मुलगा झाला. तिच्या भावजयीलाही दोन मुली झाल्या. वहिनीला उरक बिलकुल नाही. मुली अभ्यासात मागे. आईचे लक्षच नाही ना. कीर्तीचा मुलगा मात्र हुशार. कीर्ति अभ्यास घ्यायची  त्याचा.

एक दिवस कीर्तिची आई म्हणाली, “ अग, त्या मुलींचाही घे ना अभ्यास, किती कमी मार्क पडलेत.” —-मुली कीर्तिकडे जाऊ लागल्या. मग, रोज मुलींचे जेवणखाणही कीर्तीच करू लागली. हळूहळू अशी परिस्थिती झाली की, कीर्तिच्या गळ्यात सगळेच पडू लागले– “ अग, आज माझी बाई नाही आली, तुझ्या बाईकडून पोळ्या घे ना करून, आणि दे पाठवून इकडे.”—हे रोजचेच सुरू झाले,आणि कीर्तीला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू झाला. नवराही सगळे दिसत असून  बोलू शकत नव्हता. वैतागून कीर्ति एक दिवस माझ्या घरी आली. म्हणाली,” मावशी, मला काहीतरी सल्ला द्या, माझी फार घुसमट होते आहे. अगदी कठीण झालंय सगळं. माझी भावजय इतकी स्वार्थी आहे— सगळच माझ्या गळ्यात टाकून गावभर फिरत असते. पण आईला तिचेच कौतुक.

‘श्रीमंतांची मुलगी,’ हा एकच गुण आहे तिच्यात. माझी कोणतीही गोष्ट तिला चांगली वाटतच नाही.” 

मी तिला म्हटलं, “ कीर्ति,यासाठी तुला काही गोष्टी कराव्या लागतील. बघ पटतंय का.

एक तर तू आता स्वतः चे घर घ्यायच्या मागे लाग. आणि तेही आईच्या घरापासून लांब घे. 

तुम्हाला चांगले पगार आहेत ना ? मग घ्या की कर्ज.  .किती वर्षे अशी तू राबत राहणार ग.

तू सांगतेस ते ऐकून कीवच येतेय मला तुझी. हे बघ,लहानपणी आपण शुक्रवारची कहाणी ऐकलीय ना, ती सत्यच आहे बरं बाळा. या युगात गुणांना किंमत नाही, तर पैशालाच आहे ..अजूनही.

दागिन्यांनाच  जिलब्या आणि पक्वान्ने वाढतात लोक.—आता तुला बदलले पाहिजे. इतके सहन केलेत, आणखी थोडे करा. लवकर बुक करा फ्लॅट. वेळ असेल तर आईची कामे जरूर कर,

पण नसेल तर तसे स्पष्ट सांग, “  मला ऑफिस मध्ये खूप काम आहे.”  गोष्टी गोड बोलुनही होतात कीर्ति. किती गृहित धरलंय तुला माहेरच्यांनी. आपलेच दात आणि आपलेच ओठ, असं झालंय तुझं.  

पण मला तरी , तू घर घेणे, आणि यापुढे उगीच काही  गळ्यात न घेणे, हेच उपाय दिसतात सध्या.” 

कीर्ति विचारात पडली. तिलाही आईच्या घरात बिनभाड्याचं रहायचा मोह होताच की. तिने तिच्या नवऱ्याला विश्वासात घेतलं . तोही बिचारा भोगत होताच. सासरेबुवांची बरीच कामे करावी लागत त्यालाही..

त्यांनी आईच्या घरापासून दूर फ्लॅट बुक केला. कीर्तीने आईबाबांना त्याबद्दल सांगितलं . बाबांना मनापासून आनंद झाला, पण आईला हे आवडले नाही. “ कशाला ग जातेस एवढ्या लांब, आम्ही काय जा म्हणणार होतो का?”—कीर्ति निमूट राहिली. यथावकाश ते तिकडे राहायला गेले.

वास्तुशांतीला  मला बोलावणे होते. कीर्तीने फ्लॅट सुंदर सजवला होता. अभिमानाने मला घर दाखवतांना म्हणाली, ”आता इथे आम्ही सुखाचा श्वास घेऊ शकू. रोजरोजची कटकट, सुनेचे गुणगान, खोटी स्तुती ऐकणे,  माझ्या गरीब नवऱ्याचा उपहास– काहीच नको.”

मी मनापासून आशीर्वाद दिला– “ कीर्ति, मस्त आहे घर. अशीच सुखात रहा  दोघेही.”  कीर्ति हसत म्हणाली, ” होय गुरू, तुमचा सल्ला ऐकला, आणि सगळे शक्य झाले. ती शुक्रवारची कहाणी सांगितलीत, ती मात्र खरीच आहे हो. या जगात गुणांना किंमत नाही– फक्त श्रीमंतीलाच आहे–  कटु सत्य आहे —- “ दागिन्यांना जिलब्या— “,  हो ना ?” 

मी हसले, आणि म्हटलं , “ विसर ते–आता गोष्टीतली गरीब बहीणही झालीये  घरदारवाली.  आणखीही घेशील सगळे.” 

बघा ना–

आपल्या  पूर्वीच्या शहाण्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी या काळातसुद्धा कशा लागू पडतात ना—

 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments