सौ.मंजुषा सुधीर आफळे
विविधा
☆ स्त्रियांमधील नवदुर्गेची रूपं☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆
आजपासून नऊ दिवस, नऊ रात्री जगद्जननी, “जगदंबा” मातेचा उत्सव सुरू होत आहे. सर्वत्र तिच्या विविध रूपांची खूप श्रद्धेने पूजा केली जाते. सुमधुर स्तुति स्तोत्र गात तिला प्रसन्न करून घेऊ या. शिवशक्तीच्या कृपेनेच या विश्वात सर्व प्राणीमात्रांचा संसार सुरू आहे. तिचा गौरव, जागर करण्याने सर्वत्र नवाचेतना जागृत होते. त्यामुळे या पूजे कडे डोळसपणे पाहू या. नऊ दिवसांसाठी नऊ आदर्श संकल्प करू या. व ते सिद्धीस नेण्याचा मनापासून प्रयत्न करू या.
१) आपल्या आसपास कितीतरी सुबोध, सगुण संपन्न, सुविचारी, प्रेमळ स्त्रिया विविध क्षेत्रात वावरताना दिसतात. त्यांच्या गुणांचा गौरव करण्याचा निश्चय करू या. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊ या.
२) प्रत्येक स्त्री मध्ये माता पार्वती अंश रूपात सामावली आहे. याचा कधीही कोणत्याही स्त्रीला विसर न व्हावा.असा प्रयत्न करू या.
३)पीडित महिलांना त्यांच्या जीवन प्रवासात सोबत करू या. योग्य मार्गक्रमण, करण्यासाठी प्रोत्साहन देऊ या. धीर देऊ या.
४)वृद्ध स्त्रियांना हळुवार आधार देऊन, आनंदाने त्यांची सेवा करू या.
५) कुमारिकांच्या डोळ्यांतील सुंदर स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करू या.
६) कष्टकरी महिलांना प्रेम व सन्मान देऊ या. त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ या. त्यांचा आत्मविश्वास वाढवू या.त्यांना आधार देऊ या.
७)गुरुस्थानी असलेल्या महिलां कडून चार चांगल्या गोष्टी शिकून घेऊ या.
८)निरागस मैत्रिणींच्या, बहिणींच्या प्रेमळ हाकेला प्रतिसाद देऊ त्यांची प्राधान्याने सोबत करू या.
९)विविध क्षेत्रात सर्वोच्च पातळीवर कार्यरत असणाऱ्या असणाऱ्या स्त्रियांचा जीवनप्रवास अभ्यासू या.इतिहास समजून घेऊ या.
मैत्रीणींनो, प्रत्येक दिवशी अशी पूजा बांधून नवरात्रीचा नंदादीप अखंड तेवत ठेवू या. मग, नक्कीच सरतेशेवटी नवरात्र आपल्या स्वतःमध्येच आमूलाग्र सकारात्मक बदल घडवून आणेल. ज्यामुळे आपण नव विचारांना अंगीकारण्यात आनंदाने व उत्साहाने सिद्ध होऊ. म्हणजे खऱ्या अर्थाने नवरात्र पूजा सुफळ संपूर्ण होईल.असा आज विश्वास वाटतो.
© सौ.मंजुषा सुधीर आफळे
७/१०/२०२१
विश्रामबाग, सांगली.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈