श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ मागोवा स्वप्नांचा – भाग – 2 ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

(पूर्वसूत्र-वडील अतिशय प्रसन्न,शांतपणे गेले.जाताना ते आम्हाला पैशात मोजता न येणारं असं भरभरुन खूप कांहीं देऊन गेलेत.स़स्कारधन तर होतंच आणि जणूकाही स्वतःची सगळी पूर्वपुण्याईही ते आम्हा कुटुंबियांच्या नावे करुन गेलेत नक्कीच.त्यांनी मनोमन कांहीं स्वप्न म्हणून जपलं असेल तर ते फक्त आम्हा सर्वांच्या समाधानी सुखाचं…!)

या पार्श्वभूमीवरचा माझ्या कळत्या वयानंतरचा माझा जीवन प्रवास.हा प्रवास बाबांच्याइतका खडतर नव्हता तरीही खाचखळग्यांचा होताच. सरळ साधा नव्हताच. त्यामुळे रुढार्थाने कांहीएक स्वप्न उराशी बाळगावं आणि त्या दिशेने अथक प्रयत्न करून ते पूर्ण झाल्याचं समाधान मिळवावं एवढी उसंत आम्हा भावंडांपैकी कुणालाच मिळाली नव्हती. आम्ही दोघे पाठचे भाऊ पहिलीपासून एकाच वर्गात.मी त्याच्यापेक्षा सव्वा दोन वर्षांनी लहान,त्यामुळे लहानपणापासून त्याच्याशी खेळत आणि भांडतच मी लहानाचा मोठा होत होतो. तो सात वर्षाचा होताच पहिलीत जाऊ लागला तेव्हा त्याच्या बरोबर मीही.तो तिसरीत गेला तेव्हा मुख्याध्यापकांच्या अधिकारात माझी पहिली आणि दुसरीच्या परीक्षा घेऊन त्यांनी रीतसर मलाही तिसरीत प्रवेश दिला. तेव्हापासून अकरावीपर्यंत आम्ही दोघेही एकमेकांच्या गळ्यात हात टाकून एकत्र शाळेत जायचो. एकाच बाकावर बसायचो. माझ्यापुरतं तरी वयातलं अंतर पुसूनच गेलं होतं. तो माझा फक्त भाऊच नाही तर माझा मित्रच झाला होता.ती मैत्री अजूनही तशीच आहे. तो माझ्यापेक्षा बुद्धीने अतिशय तल्लख. अभ्यासात खूप हुशार. त्याचे भाषा आणि सायन्स  सर्वच विषयात चांगले स्कोअरिंग होत असे. पहिल्या पाच नंबरात तो असायचाच. आणि त्या पाचही नंबरात फक्त एखाद-दुसऱ्या मार्कांचेच अंतर असे. त्यांची पहिल्या नंबरासाठी  सतत चुरस असे. अर्थात तेव्हा मैत्रीसारखी स्पर्धाही  निकोप असायची. त्यांच्यापाठोपाठ माझा नंबर. अर्थात सहावा.पण पाचवा नंबर आणि मी यात दहा-बारा मार्कांचं अंतर असायचं. तरीही शाळेत आणि घरी ‘ लहान असून इतके मार्ग मिळवतो ‘ म्हणून कणभर का होईना जास्त माझंच कौतुक व्हायचं. माझ्या भावाला इंजिनीयर व्हायचं होतं. ते त्याचं जिवापाड जपलेलं स्वप्न होतं. मला अर्थातच भाषा विषय खूप आवडायचे. वक्तृत्व, कथाकथन, चित्रकला, अभिनय,निबंधलेखन अशा सगळ्या कलांमध्ये मला विशेष गती. शाळेतल्या सर्व वर्षांत या सगळ्या स्पर्धांमधे  माझा पहिला नंबर ठरलेलाच असे. अर्थात जे आवडतं ते करीत त्यातून आनंद मिळवायचा एवढंच तेव्हा समजत असे.त्याचं छंदात, स्वप्नात रुपांतर, परिस्थिती  अनुकूल असती तर कदाचित झालंही असतं. पण तसं व्हायचं नव्हतं. आम्ही दोघेही अकरावीत असताना अचानक वडिलांचं आजारपण उद्भवलं. त्यापुढची त्यांची नोकरी ते निभवत राहिले तरी अनिश्‍चिततेच्या भोवर्‍यातच सापडली. हक्काच्या रजा संपल्या नंतर जेव्हा बिनपगारी रजा होत तेव्हा ऑफिसमधे सर्वजण सांभाळून घेत असले तरी दर महिन्याला हातात येणारा पगार थोडा जरी कमी आला तरी घराचा आर्थिक डोलारा डळमळू लागे. मॅट्रिकचा रिझल्ट लागला. मला जेमतेम फर्स्ट-क्लास आणि भावाला डिस्टिंक्शन मिळाले होते. माझ्या आनंदाला उधाण आलेले पण भाऊ मात्र हिरमुसलेला. त्या काळी मॅट्रिक नंतरही चांगल्या नोकऱ्या मिळत. पण माझं वय खूप लहान आणि मोठ्या भावाचं मात्र नोकरीचं वय झालेलं. त्यामुळे त्याने मिळेल ती नोकरी करायची आणि माझं कॉलेज शिक्षण होईपर्यंत घरची जबाबदारी घ्यायची. आणि मला नोकरी मिळाली की मी ती जबाबदारी स्वतःकडे घ्यायची असा वडिलांशी चर्चा  करुन आईने नाईलाजाने निर्णय घेतला आणि भावाची समजूत काढली. त्या रात्री डोक्यावर पांघरूण घेऊन तो घुसमटत रडत होता. का ते सगळं माझ्यापर्यंत पोचलेलंच नव्हतं.मी खोदून खोदून विचारलं तरी भाऊ ‘काही नाही’ म्हणाला. मग दुसऱ्या दिवशी मी आईच्या खनपटीलाच बसलो तेव्हा आईने जे ठरवलं होतं ते माझ्या गळी उतरवलं. ऐकलं आणि कॉलेजला जायचा त्या वयात इतरांना होणारा आपसूक आनंद मी हरवूनच बसलो. भाऊ आधीच अबोल, आता तर घुमाच झाला. तो रोज लायब्ररीत जाई, पेपरमधल्या नोकरीच्या जाहिराती वाचून अर्ज करी. टेलिग्राफ ऑफिसमधे त्याला नोकरी मिळाली.गोव्याला पोस्टींग झालं.ट्रंक घेऊन तो सर्वांचा निरोप घेऊन घराबाहेर पडला. या सगळ्या उलघालीत इंजिनीयर व्हायचं त्याचं स्वप्न उध्वस्त झालं होतं आणि ती बोच त्याच्याइतकीच माझ्याही मनात सलत राहीलेली.मग अर्थातच मी सुखद स्वप्न पहायचा माझा अधिकारही विसर्जित करून टाकला.त्यानंतर स्वप्न पाहिलं ते फक्त भावाचे हे उपकार कधीच न विसरण्याचं.तेव्हा गोव्यासारख्या महागाईच्या ठिकाणी दरमहा जेमतेम दोनशे रुपये त्याच्या हातात येत. त्यातल्या दीडशे रुपयांची तो न चुकता घरी मनिऑर्डर करी. राहिलेल्या पन्नास रुपयात पुढे स्टेट बँकेत नोकरी मिळेपर्यंतची दोन वर्ष त्यांनी कशी काढली होती ते खूप वर्षं उलटून गेल्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यावर  गप्पांच्या ओघात त्यांनी मला ओझरतंच सांगितलं,तेव्हा ते ऐकूनही माझ्याच अंगावर सरसरून काटा आला होता. अतिशय काटकसरीत का होईना पण आई-वडिलांच्या सहवासात सुरक्षित छपराखाली मी रहात असताना, माझ्यापेक्षा खूप हुशार असूनसुद्धा केवळ माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा म्हणून त्याच्यावर पडलेलं जबाबदारीचं ओझं स्वतःचंच कर्तव्य म्हणून त्याने मनापासून पारही पाडलं होतं. माझ्या मनावरचं ओझं आणि जबाबदारीची जाणीव मला स्वस्थ बसू देत नव्हती.त्या मनोवस्थेत मी माझी कॉलेजची चार वर्षे एकाग्रतेने अभ्यास करीत एक एक दिवस मोजून काढलीत.हे करीत असताना मनातली अस्वस्थता कमी व्हावी म्हणून आणि त्याक्षणी ते मीच करायला हवं म्हणूनही, तेव्हा आठवड्यातले रिकामे मिळणारे शनिवार-रविवार हे दोन दिवस मी एका ठिकाणी अकाउंटस् लिहायची कामं घेऊन स्वतःला गुंतवून ठेवलेलं होतं. ते दोन पूर्ण  दिवसभर खाली मान घालून काम करावं तेव्हा महिन्याला वीस रुपये मिळत. ते पैसे साठवून मी माझ्या लहान भावाचे युनिफॉर्मचे दोन जोड, त्याची वह्या पुस्तकं, माझे दोन शर्ट आणि पायजमे, आणि कॉलेजसाठीचा रेल्वेचा पास एवढे खर्च बाहेरच्या बाहेर करू शकायचो. हे प्रथम भावाच्या लक्षात आलं तेव्हा तो माझ्यावर खूप चिडला होता.’ हे सगळं करताना तू मला विश्वासात घेऊन बोलला का नाहीस ‘ या त्याच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हतं. तो गोव्याहून एक्स्टर्नल ग्रॅज्युएशन च्या परीक्षेसाठी वर्षातून फक्त एकदा मिरज सेंटर घेऊन घरी येऊ शकायचा. तो स्वतःची इतकी ओढ करीत असताना त्याच्या जीवावर दोन वेळा बसून खाणं मला नको वाटायचं. त्या क्षणी मीच करायला हवं अशी ही एकच गोष्ट होती. हे सगळं या शब्दात त्याला सांगून मला त्याला दुखवायचं नव्हतं. अखेर आईने त्याची समजूत काढली तेव्हा ‘पैसे मिळविण्यापेक्षा ग्रॅज्युएशनला जास्तीत जास्त स्कोरिंग करायची तुझी जबाबदारी तू पार पाडणं महत्वाचं आहे ‘असं मला त्याने बजावून ठेवलं होतं. ते तर मी करणार होतोच पण त्याच्या सांगण्या-समजावण्यातली  कळकळ पाहून कोणत्याही कारणाने मी कमी पडून उपयोगाचं नाही हे स्वतःला रोज नव्याने बजावत असायचो.त्या चार वर्षांत माझी स्वप्नं यश मिळवून आई-बाबांना न् भावाला कृतार्थतेचं समाधान द्यायचं याच परिघाभोवती फिरत असायची.

पुढे भावाला स्टेट बँकेत आणि दोन वर्षानंतर मला युनियन बँकेत जॉब मिळाला आणि नाही म्हटले तरी अस्वस्थता बऱ्याच प्रमाणात कमी झाली. त्यानंतर मी भावाला त्याच्या आर्थिक जबाबदारीतून मोकळं केलं, तरीही आम्हा दोन्ही लहान भावांना वेळोवेळी काय हवं नको याकडे त्याचं बारीक लक्ष असायचंच. पुढे आम्ही आमचे संसार सुरू करून अन्नाचा शेर असेल तिथे फिरत राहिलो. परस्परांना लिहिलेली पत्रे आणि कारणपरत्वे गरज निर्माण होईल तसं मदतीला आम्हा सगळ्या भावंडांकडे धाव घेणारी आई ही दोनच संपर्काची साधने. तरीही आम्ही मनाने सतत जवळच असायचो. दोघांच्याही सुरु झालेल्या बँकिंग क्षेत्रातील निसरड्या वाटांवरूनच्या वाटचाली पाय न घसरु देता उत्कर्षाच्या दिशेने चालू राहिल्या ते अर्थातच आई-बाबांनी वेळोवेळी केलेल्या संस्कारांमुळेच. या प्रवासातही यशासाठी हव्यासापायी कोणतीही अनाठाई तडजोड न करायचं बंधन आम्ही कोणी न सांगताच आमच्या स्वप्नांना घालून घेतलेले होतं. त्यामुळे वेळोवेळी मिळालेली प्रमोशन्स असोत,कधी सोयीची तर कधी गैरसोयीची पोस्टिंग्ज असोत,इतरांना अप्राप्य असं सतत मिळत रहाणारं ‘ जॉब सॅटिसफॅक्शन ‘ असो, सगळं आम्हाला मिळत गेलं. यातलं काहीच आम्ही अट्टाहासाने स्वप्न उराशी बाळगून, तडजोडी करून मिळवलं नाही.आणि ते सगळं आम्ही समाधानाने स्वीकारत गेलो. आज त्या समाधानाबरोबर कृतार्थताही आहे.

मी स्वप्न पाहिलं होतं ते फक्त कर्तव्यपूर्तीचं आणि कितीही यश आणि ऐश्वर्य प्राप्त झालं तरीही न उतण्या-मातण्याचं. त्या स्वप्नाची पूर्तता हेच माझं जीवन ध्येय होतं आणि ते ध्येय साध्य झाल्याचं समाधान हीच माझ्या उर्वरित आयुष्याला पुरूनही उरुन राहील अशी कृतार्थता..!

मला मिळालेली ही स्वस्तात माझ्या मुलाला उत्तुंग स्वप्ने पहात उंच झेपावण्यासाठीचं विस्तिर्ण आकाश देऊ शकली.

क्रमश:….

 ©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments