श्री सुहास रघुनाथ पंडित
जीवनरंग
☆ मुखवटे – सुश्री शिल्पा कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
जगाच्या कानाकोपर्यातून जमलेल्या सगळ्या नातेवाईकांच्या गाठीभेटी. सिऍटलमधे नुकताच पार पडलेला पुतण्याचा मनोरम्य हृदयस्पर्शी लग्नसोहळा. एकत्र आलेली दोन कुटुंबे आणि दोन् भिन्न संस्कृतींचा संगम. आणि आता लग्नघरातून परतताना जडावलेली पावले.
सिऍटलहून विमानप्रवास करुन आम्ही फिनीक्स स्कायहार्बरवर उतरतो. सामान गोळा करुन बाहेर येतो. माझा नवरा उबर टॅक्सी बोलावतो. ती पाच मिनिटात येते. सामान ट्र्ंकमधे ठेवले जाते. मी माझ्या सासर्यांना हात धरुन पुढच्या सीटवर बसवते. पट्टा लावून देते. मागच्या सीटवर माझा नवरा, मुलगी आणि मी असे स्थानापन्न होतो. एकदम नवीन असलेल्या आलिशान लेक्ससमधून पोटातले पाणीही न हलता आम्ही निघतो. पोटातले पाणी स्थिर राहाते तसे डोक्यातले विचार मात्र कितीही सुखदायी गाडी असेल तरी स्थिर कुठे राहतात? माझ्या डोक्यात चक्रे सुरु होतात.
आधी घरी गेल्या गेल्या काहीतरी गरम जेवण बनवायला हवे असते. कोणीच दुपारचे जेवलेले नसते. ब्याऐंशी वर्षांचे वृद्ध सासरेही थकलेभागलेले दिसत असतात. मुगाच्या डाळीची खिचडी आणि कढी करु हे मनाशी ठरते. कपडे धुवायला लावायला हवे असतात. दुसर्या दिवशी सकाळी कामासाठी लगेच निघायचे असल्याने त्याचीही तयारी करायची असते. लॉसएंजेलिसला सकाळी लवकारची फ्लाईट असते. त्याचे चेकइन मी फोनवरून लगेच करून घेते. कामाच्या जागी देण्यासाठी काही डॉक्युमेंट्स बनवायची असतात. दोन आठवड्याने असलेल्या युजर कॉन्फरन्साठी तयारी करायची असते. टॅक्सीत बसल्या बसल्या मनातल्या मनात माझे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन बनवणे सुरु होते. त्याच्या दुसऱ्या स्लाईड पर्यंत मी येते.
“तुम्ही एअरफोर्समधे आहात?” माझा नवरा उबरवाल्याला विचारतो. त्याचे नाव शेन असते. त्याने सामान ठेवताना तिथे एरफोर्सचा युनिफॉर्म ट्रंक मधे बघितलेला असतो. शेन म्हणतो, “येस… मी फ्लोरिडा आणि टेक्ससमधल्या एअरफोर्सबेसवर कॅडेट इन्सट्र्क्टर आहे.” तो इतर माहीतीही देतो. फिनिक्सपासून शंभर मैलावर त्याचे घर असते. तो फुटबॉल गेम बघायला आलेला असतो आणि आता जाता जाता काही उबर बिझिनेस मिळाला, तर तो करुन तो रात्रीचा घरी परतणार असतो. “या महागड्या गाडीची किंमत भरुन काढण्यासाठी उबर चालवण्याचा धंदाही तो करतो साईडला” हेही तो हसतहसत सांगतो. एअरफोर्स म्हटल्यावर माझ्या डोक्यातले पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन थांबते. पाचव्या स्लाईडला मी बुकमार्क करते. संभाषणात मधेच पडून मी त्याला सांगते की त्याच्याशेजारी इंडिअन एअरफोर्समधला फेलो सर्व्हिसमन बसला आहे. माझे सासरे एकेकाळी इंडिअन एअरफोर्समधे रडार इंजिनिअर असतात. मग त्या योगायोगाबद्दल आश्यर्य व्यक्त केले जाते. दोघेही एकमेकांच्या कामाबद्दल चर्चा करतात. १९६२ साली ते कसे मिसिसिपीला आलेले असतात ह्याची देवाणघेवाण होते. शेन अभिमानाने त्याची मुलगी एम्बरी रिडल युनिव्हर्सिटीत पायलट बनण्याचे शिक्षण घेत असल्याचे सांगतो.
मी पाचव्या स्लाईडकडे परत वळते. इतक्यात पुढून परत एक प्रश्न येतो. मागच्या सीटच्या रोखाने. “So what do you do?” माझ्याही नकळत मी उत्तरासाठी तोंड उघडते. पण तो प्रश्न हवेत असतानाच, बाउंड्रीवर बॉल पकडावा, तसा अलगद माझ्या नवऱ्याने केंव्हाच झेललेला असतो. तो त्याचे प्रोफेशन आणि सर्व काही विशद करून सांगू लागलेला असतो. माझे उत्तर देण्यासाठी उघडलेले तोंड बंद व्हायला वेळ लागतो. नवऱ्याचे उत्तर देऊन संपते. टॅक्सीत थोडावेळ शांतता पसरते. मग माझी मुलगी कुठल्या शाळेत आहे, हवामान कसे बदलते आहे याची चर्चा सुरु होते.
माझ्या पॉवरपॉइन्टच्या स्लाईडचा बुकमार्कच हरवून जातो. जे काही क्षणाभरापूर्वी घडले ते माझ्या डोक्यात फेर धरू लागते. “तुम्ही काय करता”, हा प्रश्न किती सहजपणे फक्त मलाच विचारला असणार असे नवऱ्याला वाटलेले असते. उबरवाल्यानेही तो रिअर व्ह्यू आरशात बघत त्यालाच विचारला हा त्याचा दावा असतो. माझ्या नवऱ्याने उत्तर दिल्यावर मला काही विचारावे असे त्या उबरवाल्याला वाटलेलेही नसते की जास्त चौकशा नकोत म्हणून तो गप्प असतो? की बायका, त्यातूनही भारतीय, कदाचित काही करत नसाव्यात असे त्याला वाटले असावे. त्याने मला विचारले नाही ह्याचे शल्य असते असेही नाही. आणि असेही नसते की त्याने जाणूनबुजून हे केलेले असते. त्यातूनही त्याची स्वतःची मुलगी तर आता पायलट बनत असताना असे बुरसटलेले विचार कुणाचे असावेत हेही पटत नाही. मग हे नेमके असते तरी काय? की हि विचारसरणी कुणा एखाद दुसऱ्या माणसाची नसून हे समाजमनाचे प्रतिबिंब असते म्हणून मला जास्त खटकते? जागा-वेळ-काळ-देश बदलेले तरी त्या टॅक्सितल्या दोन पुरुषांनी किती प्रातिनिधिक स्वरूपात समाजमनाचे दर्शन दिले असे मला वाटून जाते.
आमचे घर येते. माझ्या सासऱ्याना हात देऊन मी खाली उतरवते. ते उतरत असताना, शेन माझ्या सासऱ्याना म्हणतो, “Thank you for your service for the country, no matter what the country is.” मी त्याचे मनापासून आभार मानते आणि म्हणते, “Yes , but as for airforce, there is only one sky, and we all share it, no matter what country it is.” तोही मनापासून हसतो आणि संमतीदर्शक मान हलवतो. टॅक्सी निघून जाते.
पुढे मला हेही म्हणायचे असते कि, की याच आकाशात तुझी मुलगी पायलट होऊन उडणारे आणि याच आकाशाखाली कित्येक कर्तबगार स्त्रिया या जगाचे रहाटगाडगे नीट चालावे म्हणून कष्ट करत आहेत आणि यशस्वी होत आहेत. मात्र ते मनातल्यामनात राहून जाते.
मी घरात येते. बॅगा ठेऊन हात धुऊन खिचडी फोडणीला टाकायला घेते. गौरी नुकत्याच होऊन गेलेल्या असतात. उभ्याच्या गौरींचे दोन मुखवटे असतात म्हणे. त्यातला घर सांभाळणाऱ्या गृहिणीचा, या संध्याकाळसाठी मी तोंडावर चढवते. आणि दुसरा कोर्पोरेट एक्झिक्युटिव्हचा, दुसऱ्या दिवसाच्या फ्लाईट साठी ठेऊन देते.
देवघरात ठेवलेल्या आदिमाया-शक्तीची साग्रसंगीत पूजा, उपास-तापास नवरात्रीचे दिवस असल्याने घराघरात सुरु असतात.
आणि एकीकडे खिचडीच्या फोडणीसोबत माझ्या पॉवरपॉईंट स्लाईड्स खमंग बनू लागतात.
ले.: सुश्री शिल्पा कुलकर्णी
प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈