श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
☆ कवितेचा उत्सव ☆ चंद्र त्यांचा नी अमुचा ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
चंद्र त्यांचा मधुचंद्राचा
आम्हा कधी दिसलाच नाही
अमुचा चंद्र तो भाकरीचा
त्यांना कधी रूचलाच नाही
कोजागिरीच्या दुधात त्यांच्या
विसावला तो कसा ते पहिलेच नाही
असेलही तो भांड्यात अमुच्या
पण पडावा तो इतके दूधच नाही
सजलेल्या प्रेयसीच्या मुखाला
उपमा शशीची दिली तुम्ही
घामेजल्या चेहऱ्यात साजणीच्या
कधी तो विसावलाच नाही
असेल तो बरसवित अमृताला
आम्ही तो कधी चाखलाच नाही
झोपलो थकूनी तुज बघ पहाता
गोडवा अमृताचा हवा सा वाटलाच नाही.
कष्टाचा करपला जीव अमुचा
कधी सौंदर्य तुझे उलगडलेच नाही
वासरमणी तो जगवे जीव अमुचा
त्याहून तू सुंदर हे पटलेच नाही
© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈