श्री उदय गोपीनाथ पोवळे
कवितेचा उत्सव
☆ माझा तू ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
प्रेमाचा तू मोहरून टाकणारा
माझा प्रिय तू जीव लावणारा
माझाच तू, होतास माझा
होतास तू , प्रेमाचा माझा
मांडलास डाव, खेळ तो रचिला
प्रेमात रंगुनी तूच तो फुलविला
अघडीत घडले, काळ काळाकडूनी
कसा गेलास खेळ अर्धा सोडुनी
भार मज तो, खांद्यावर देऊन
गेलास तू का, मध्यावर सोडून
रुतलास तू, हृदयी तो काटा
तुझ्याविणा व्यर्थ, जीवन ते आता
तपा वरी वेळ ती, सरून गेली
तुझ्या येण्याची, आस ती पाहिली
नाही लागली हळद, नाही रे उतरली
शशी संगे साथीला, नाही मी बहरली
तुझ्याच प्रतीक्षेत, वेडी मी अजुनी
मनी ज्ञात आहे, येणार तू फिरुनी
निशेदिनी स्वप्नी तूच रोज येशी
आशा मनी खोटी तूच मज देशी
तुझ्याविणा कठीण आहे रे सगळे
तुझ्याविणा जग सगळे ते वेगळे
नसेल मनी तुझे येणे परतुनी
मलाच ने रे त्या, विश्व विलक्षणी
माझाच तू, होतास माझा
होतास तू, प्रेमाचा माझा
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
मो. नं. ९८९२९५७००५.
ठाणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈