श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
चं म त ग ! श्री प्रमोद वामन वर्तक
? फिटनेसचा फ़ंडा ! ?
“गुडमॉर्निंग पंत !”
“नमस्कार, पण आज तुझा आवाज एकदम रडवेला का आणि खांदा कशाला चोळतोयस तुझा ?”
“काठी लागली पंत, डोक्याच खांद्यावर निभावलं, तुमच्यकडे आयोडेक्स असेल तर द्या जरा.”
“देतो देतो, पण सकाळी सकाळी बायको बरोबर भांडण…. “
“नाही हो पंत, जोशी काकूंची काठी लागली.”
“जोशी काकूंची काठी तुला कशी काय लागली ?”
“अहो हा सगळा त्या केळकर काकांचा फिटनेस फ़ंडयाचा प्रताप.”
“आता यात केळकर कुठून आला ?”
“सांगतो सांगतो. तुम्हाला माहीतच आहे सध्या सगळ्या जिम वगैरे बंद आहेत आणि सगळेच आपापल्या घरी अडकल्यामुळे… “
“तू मूळ मुद्यावर ये आधी, उगाच पाल्हाळ नकोय.”
“हां, तर घर बसल्या आणि चाळीत फिरून करायचे काही व्यायाम प्रकार केळकर काकांनी काही लोकांना शिकवले.”
“बर, पण त्यात जोशीणीचा काय संबंध ?”
“पंत केळकरांनी जोशी काकूंना शाखेत जसे काठीचे हात फिरवायला शिकवतात तसे काही प्रकार शिकवले.”
“पण तिच्या काठीचा आणि तुझ्या खांद्याचा… “
“अहो पंत त्याच काय झालं, आता जोशी काकू चाळभर, धुण्याची काठी घेऊन दोन्ही हाताने फिरवत फिरत असतात.”
“काय सांगतोस काय, अख्ख्या चाळभर ?”
“हो ना आणि त्यांच्या काठीचा प्रसाद माझ्या प्रमाणेच अनेकांना बसून चाळीत
भांडणांचे जंगी सामने सुरु झालेत.”
“अरे बापरे !”
“इतकंच नाही काकूंच्या काठीने चाळीतले यच्चयावत सार्वजनिक दिवे पण फुटले ते वेगळेच.”
“काय बोलतोयस काय ? सगळे सार्वजनिक दिवे… “
“फुटले आणि त्यावरून होणारी चाळकऱ्यांची भांडणं सोडवता सोडवता, माझ डोक फुटायची पाळी आल्ये.”
“बर बर, मी असं करतो तुला आयोडेक्स बरोबर अमृतांजन पण देतो मग तर झालं ?”
“पंत इथे माझी काय हालत झाल्ये आणि तुम्हाला विनोद सुचतायत !”
“यात कसला विनोद, तुझ्या दुखऱ्या खांद्यासाठी आयोडेक्स मागायला तूच आला होतास आणि आता तुझ लोकांच्या भांडणामुळे डोक फुटायची वेळ आल्ये म्हणालास म्हणून मी तुला आपणहून अमृतांजन.. “
“खरच आहे ते, अमृतांजन पण लागेलच मला, कारण तुम्हाला अजून बर्वे काका आणि साने काकांच्या भांडणा बद्दल… “
“आता ते दोघे कशाला भांडले एकमेकाशी ?”
“इथे पण केळकर काकांचा फिटनेस फ़ंडाच कारण झाला.”
“तो कसा काय ? “
“पंत त्यांच्या फिटनेस फ़ंडयात दोरीच्या उडया पण होत्या.”
“हो, तो पण एक चांगला घरगुती व्यायाम प्रकार आहे खरा.”
“पंत, सानेकाका त्यांच्या घरात दोरीच्या उडया मारत होते आणि त्याच वेळेस खालच्या मजल्यावरचे बर्वेकाका जेवत होते !”
“म्हणजे दोघेही आपापल्या घरीच होते ना, मग भांडणाचा संबंध आला कुठे ?”
“अहो पंत साने उडया मारायला लागले की खाली बर्व्यांच्या ताटात त्यांच्या सिलिंगची माती पडायची !”
“अरे चाळीस वर्षात चाळ खिळखिळी झाल्यावर सिलिंग मधून माती नाहीतर काय सोन पडणार आहे ? तूच विचार कर म्हणजे झालं.”
“हो बरोबरच आहे पण त्यामुळे बर्वे काकू आल्या माझ्याकडे तणतणत. मी काकूंना म्हटलं, बर्वे काकांना ताट घेऊन दुसरीकडे बसून जेवायला सांगा.”
“बरोबर आहे तुझ, मग ?”
“त्यावर बर्वे काकू मला म्हणतात कशा ‘ती ह्यांची जेवायला बसायची रोजची जागा आहे, दुसरीकडे बसून जेवलं तर त्यांना जेवण जात नाही’ आता बोला ?”
“अरे बापरे, असं म्हणाली बरवीण ?”
“हो ना, वर मला सांगायला लागल्या ‘तूच सान्याला सांग उडया मारायची त्यांची जागा बदलायला’ आणि गेल्या तरातरा निघून घरी.”
“मग तू काय केलंस ?”
“काय करणार, गेलो साने काकांकडे, झाला प्रकार सांगून त्यांना म्हटलं, तुम्ही प्लीज जरा तुमची दोरीच्या उडया मारायची जागा बदलता का ?”
“मग काय म्हणाला सान्या?”
“साने काका म्हणाले ‘मी माझ्या घरात कुठ उडया मारायच्या आणि कुठे नाही हे मला सांगायचा कुणाला अधिकार नाही. तूच बर्व्याला त्याची जेवायची जागा बदलायला सांग.’ असं म्हणून माझ्या तोंडावर धाडकन दार लावले त्यांनी.”
“फारच पंचाईत झाली असेल ना तुझी त्या वेळेस.”
“हो ना, दोघेही वयाने मोठे आणि हट्टाला पेटलेले.”
“मग कसा काय मार्ग काढलास त्यातून तू ?”
“मार्ग कसला काढतोय, घरी येवून मस्त ताणून दिली. पण पाच मिनिट आडवा पडतोय न पडतोय, तोच दाराची कडी वाजली.”
“उगाच तुझी झोप मोड झाली ना, पण दारात कोण आलं होत तुझी झोप मोडायला ?”
“अहो दार उघडून बघतोय तर काय, पहिल्या मजल्यावर जिन्याशेजारी राहणारे राणे काका, रागाने लालबुंद होऊन दारात उभे.”
“आता राण्याला राग यायच काय कारण ?”
“मी विचारलं राणे काकांना, तर मला म्हणाले वरच्या कोकणे काकांनी त्यांची झोप मोड चालवली आहे, जिन्याने सारखं वर खाली जाऊन येवून.”
“जाऊन येवून म्हणजे, मी नाही समजलो.”
“पंत हा पण केळकर काकांचा फिटनेस फ़ंडा.”
“म्हणजे त्यांचे भांडण पण केळकराच्या फिटनेस फ़ंडया मुळे झाले की काय? “
“हो पंत, केळकर काकांनी कोकणे काकांना घरी बसून बसून त्यांचे वजन वाढल्यामुळे आणि घुडघे दुखत असल्यामुळे, जिने चढण्या उतरण्याचा व्यायाम सांगितला होता करायला.”
“बरोबरच आहे केळकराच आणि तुला दुसरा एक उपाय सांगतो गुडघे दुखीवर.”
“पंत इथे मी कशाला आलोय आणि तुम्ही मला….”
“अरे ऐकून तर घे, गुडघे दुखत असतील तर कमरे एव्हढया पाण्यात रोज अर्धा तास चालायचं, घुडघे दुखी कुठच्या कुठे पळून जाईल बघ तुझी.”
“आता मीच पळतो पंत, तुमचं बोलण ऐकून माझ डोक खरच फुटेल की काय अस वाटायला लागलं आहे.”
“सॉरी सॉरी, पण कोकण्याच्या जिन्याने खालीवर जाण्याने, राण्याची कशी काय बुवा झोप मोडायची, ते नाही समजलं !”
“अहो कोकणे काकांचा अजस्त्र देह जिन्याने खाली वर करू लागला की आपल्या चाळीचे आधीच जीर्ण शीर्ण झालेले लाकडी जिने… “
“दाण दाण आवाज करायचे आणि राण्याची खोली जिन्याजवळ असल्यामुळे त्याच्या झोपेचं खोबरं व्हायच, बरोबर ?”
“बरोबर पंत, त्यामुळे त्या दोघांचे पण कडाक्याचं भांडण झालं आणि दोघेही माझ्याकडे एक मेकांची तक्रार घेऊन आले आणि …. “
“तू नेहमी प्रमाणे माझ्याकडे यावर उपाय सुचवा म्हणून, काय खरं ना?”
“हो पंत, तुम्हीच चाळीत सगळ्यात जुने जाणते आणि अनुभवी …. “
“नेहमीची मस्काबाजी पुरे ! आता मला आधी सांग, आपल्या चाळीतले योगा शिकवणारे गोरे गुरुजी सध्या चाळीत….. “
“नाहीत ना, ते मध्यतंरी गावाला गेले आणि सध्याच्या परिस्थितीमुळे गावालाच अडकलेत.”
“बर बर आणि योगासन पण कुणाच्या तरी देखरेखी खाली केलेली बरी, नाहीतर उगाच कोणाला तरी त्याचा त्रास पण होऊ शकतो.”
“मग कसं करायच आता पंत.”
“अरे मी असतांना कशाला घाबरतोस. उद्याच्या उद्या एक पत्रक काढ, चाळ कमिटीचा अध्यक्ष म्हणून.”
“बर, पण त्या पत्रकातून काय सांगायचं लोकांना?”
“लोकांना सांगायचं की कोणीही केळकराचा फिटनेस फ़ंडा वापरायचा नाही.”
“मग पंत लोकांनी फिट राहण्यासाठी काय करायच?”
“माझा फिटनेस फ़ंडा वापरायचा !”
“तुमचा फिटनेस फ़ंडा, म्हणजे काय पंत ?”
“काही नाही, ज्या लोकांना या लॉक डाऊन मधे फिट रहायच आहे त्यांनी आपापल्या घरात रोज सकाळी फक्त बारा सूर्य नमस्कार घालायचे, बस्स.”
“त्यानं लोक खरंच फिट राहतील पंत ? “
“यात तुला शंका घ्यायच कारणच नाही. “
“ते कसं काय पंत?”
“अरे शास्त्र शुद्ध पद्धतीने घातलेल्या प्रत्येक सूर्य नमस्कारात सगळी योगासन समाविष्ट असतात, हे माहित्ये का तुला ?”
“नाही पंत, पण लोकांना शास्त्र शुद्ध पद्धतीने सूर्य नमस्कार घालायला…. “
“मी शिकवणार आणि प्रत्येकला सांग, की घरात राहून ज्यांना ज्यांना फिट रहायच त्यांनी….”
“पंतांना भेटून शास्त्र शुद्ध सूर्य नमस्कार कसे घालायचे ते लवकरात लवकर शिकून घ्या आणि…. “
“केळकराच्या फिटनेस फ़ंडयामुळे होणारी चाळीतली भांडणे टाळा.”
“धन्य आहे तुमची पंत !”
© श्री प्रमोद वामन वर्तक
(सिंगापूर) +6594708959
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈