सौ. सुचित्रा पवार
विविधा
☆ मैने तेरे लिये ही ☆ सौ. सुचित्रा पवार ☆
मैने तेरे लिये ही …?
मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने …गाणं ऐकताना मन कसं आनंदानं भरून गेलं ..अन तुझी आठवण आली . होय ! …कोण तू ? चेहरा …रंग रूप ..काही काही निश्चित नाही ,डोळ्यासमोर तुझे कुठलेच चित्र ,आकृती नाही; तरी मी तुझ्यासाठी ही स्वप्ने चुनते नुसते सातच का ?नाही ..अगणित रंगांची ,गंधाची ,आकारांची फुले वेगवेगळ्या ऋतूत बहरून येऊन आनंदाने श्रुष्टीत डोलावीत अन आनंदाचा सोहळा साजरा करावा अशीच ती नानाविध स्वप्ने मी तुझ्यासाठी विणते .तुला यत्किंचित कल्पनाही येणार नाही ..का ? हेही माहित नाही ती पूर्ण ही होत नाहीत …होणार नाहीत तरीही का ,का ही स्वप्ने मी गुंफावी ?कधी कधी कोडेच उलगडत नाही .
पण प्रत्येक क्षणाला स्वप्नांची माळ गुंफणे सुटत नाही. कारण ….कारण ती गुंफण्यात एक आनंद असतो …असा की खरेच त्या अनिश्चित आकाराच्या स्वप्नाला कोण पाहू शकत नाही पण मी अनुभवू शकते अन युगे न युगे ही स्वप्ने रचते फक्त फक्त तुझ्यासाठी कारण तुझ्यासाठी काही करताना मला आनंद होतो ! होय ,कधी राधा ,कधी मीरा ,कधी रुक्मिणी ,कधी उमा ,सत्यभामा ,सीता अन गीताही होऊन चरोंचरी तुझ्या साठीच फक्त …पण तू अनभिज्ञ .निर्विकार ,बेफिकीर …अजाणता ….तुला कळतच नाही अन कळणारही नाहीत या मनाच्या सुख संवेदना अन दुःखाच्या सूक्ष्म छटा …तरीही मी गुंफतेय …विणतेय …जपतेय ..रंगीत स्वप्ने फक्त तुझ्यासाठी …कारण ….तुला त्या स्वप्नात गुंफलेय म्हणूनच तर हे आंतरिक सुखावणे फक्त त्या अपूर्ण स्वप्नांसाठीच !!
स्वप्नातल्या कळ्यांची फुले फुलतच नसतात तरीही कळ्या उमलू पहातातच न ??
© सौ.सुचित्रा पवार
22/4/19
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈