डॉ मेधा फणसळकर
विविधा
☆ नाते जुळले मनाशी मनाचे ! ☆ डॉ मेधा फणसळकर ☆
काही दिवसांपूर्वी पुलंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांचे साहित्य पुन्हा एकवार चाळले गेले. “व्यक्ती आणि वल्ली” पुन्हा वाचताना ‛ते चौकोनी कुटुंब’ हातात आले. शिष्टाचाराच्या सर्व चौकटी असोशीने पाळणारे ते कुटुंब! खाणे- पिणे- हसणे- मनोरंजन या सर्वांच्याच चौकटी ठरलेल्या! ‛अगदी हसतानासुद्धा ओठ किती फाकवायचे?’ याचाही नियम ठरला असावा असे हे कुटुंब! पुलंच्या शैलीत हे सर्व वाचताना हास्याच्या उकळ्या फुटल्या नाहीत तर नवलच!
पण ते वाचतानाच माझ्या मनात विचार आला की प्रत्येक घरालाही स्वतःचा असा एक स्वभाव असतो. आणि त्यावरुन मग मला एक प्रसंग आठवला.मध्ये एकदा माझ्या एका मैत्रिणीकडे एक वस्तू अर्जंट द्यायला मी भर दुपारी गेले. माझ्या दुर्दैवाने नेमकी ती घरी नव्हती. मग ती वस्तू शेजारी ठेवून जावी म्हणून मी शेजारच्या घराची बेल दाबली. दोन मिनिटांनी त्या दाराची एक फट हळूच उघडली गेली व एक तिरसट स्वर कानी आला,“ काय्ये?” मी भीतभीतच माझे काम सांगितले. त्यावर, “दुसऱ्याच्या वस्तू आमच्या घरात ठेवायला हे काय गोडावून आहे काय?” असा प्रतिप्रश्न करुन दार धाड्कन लावून घेतले गेले. त्याचवेळी समोरच्या घरातील एक आज्जी हा प्रसंग पहात होत्या. माझा उतरलेला चेहरा बघून त्यांनी मला हाक मारली व घरात बोलावले. त्यांनी माझी चौकशी केली व माझ्याकडील वस्तू घेऊन ती मैत्रिणीला दयायचे आश्वासन दिले. शिवाय माझ्याशी थोड्या गप्पा मारुन सरबतही प्यायला दिले. मला एकदम प्रसन्न वाटले. चौकोनी कुटुंब डोक्यात असल्याने मी पहिल्या कुटुंबाला ‛ संकुचित कुटुंब’ असे नाव दिले तर आज्जीच्या वागण्याने त्या घराला घरपण देणाऱ्या कुटुंबाला मी ‛अतिथ्यशील कुटुंब’ असे नाव दिले.
काही कुटुंब इतकी ‛अघळपघळ’ असतात की यांच्या स्वभावापासून घरापर्यंत सर्व काही अघळपघळ असते. यांच्या घरात जागोजागी पसारा तर असतोच पण यांच्या अतिथ्याचा पसाराही इतका अस्ताव्यस्त असतो की काही वेळा समोरची व्यक्ती त्या आदरातिथ्यानेच गुदमरुन जाते.
हे जसे कुटुंबाच्या स्वभावाचे झाले , तसे काही कुटुंबांना स्वतःचा गुणधर्म, वारसा असतो.वीणा देव, अरुणा ढेरे, प्रकाश संत या लेखक मंडळींच्या घरी भिंतीसुद्धा पुस्तकांच्या असाव्यात. म्हणूनच ही ‛ पुस्तकांची कुटुंबे’! तर मंगेशकर, शाहीर साबळे, आनंद – मिलिंद शिंदे यांच्या कुटुंबाला सुरांचे वरदान मिळाले आहे. म्हणून ही ‛गाणारी कुटुंबे’! आमट्यांच्या कुटुंबात सेवाभाव पिढीजात मुरलेला! म्हणूनच हे ‛समाजसेवी कुटुंब’! कपूर घराण्याला अभिनयाचा वारसा आहे. म्हणून ते ‛अभिनेत्यांचे’ कुटुंब!
पण यालाही काही अपवाद असतातच.घरात कसलेही शिक्षणाचे वातावरण नसताना ‛डॉ. आनंद यादव’, ‛नरेंद्र जाधव’, ‛ अब्दुल कलाम’ यासारख्या व्यक्ती आपापल्या क्षेत्रात उंच भरारी मारताना दिसतात.तर विद्वानांचे कुटुंब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‛गोवारीकर’ कुटुंबात ‛वसंत गोवरीकरांसारखे’ शास्त्रज्ञ व ‛आशुतोष गोवारीकर’ सारखा अभिनेता – दिग्दर्शकही निर्माण होतात.
याउलट सध्या अशीही अनेक कुटुंब आहेत की त्यातील अनेक मुले- मुली कोणतीही पार्श्वभूमी नसताना सोशल मीडियावर आपला प्रभाव दाखवत आहेत. कलर्स मराठीवरील लोकप्रिय झालेला ‛मॉनिटर’ हर्षद नायबळ त्याचेच एक उदाहरण आहे. अशा अनेक वाहिन्यांवर अनेक हर्षद, अनेक लता-आशा, अनेक शाहरुख-सलमान खान आजकाल बघायला मिळत आहेत.पण त्यातील ‛काळी बाजू’ पण लक्षात घेतली पाहिजे. काहीवेळा या प्रसिद्धीमुळे मुलांपेक्षा पालकांचीच महत्वाकांक्षा वाढीस लागते आणि या कोवळ्या कळ्यांचे बालपणच हरवून जाते. आयुष्यात त्यांची झालेली एखादी हार त्यांचे पालकच सहन करु शकत नाहीत आणि मग असे कुटुंब ठरते ‛अतिमहत्वाकांक्षी’! श्रीदेवी, मधुबाला याना लहानपणी हे भोगावे लागले आहे.
हल्लीच पालकांच्या अपेक्षा पूर्ण करु न शकल्याने एका तरुणीने आत्मदहन केले.मुंबईतील एका डॉक्टरच्या मुलीने आत्महत्या केली. आय.ए. एस. ऑफिसर असणाऱ्या एका जोडप्याच्या मुलाने इंटरनेटवरील गेमच्या आहारी जात स्वतःची जीवनयात्रा संपवली.दहावी- बारावीचे निकाल जवळ आल्यावर तर अशा अनेक घटना कानावर पडतात. मग प्रश्न पडतो “मुलांच्या या नकारात्मकतेला जबाबदार कोण? पालक, समाज की बदलती नीतिमूल्ये?” म्हणूनच आपल्यालाच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
घराला घरपण देतात ती माणसेच! कुटुंब परिपूर्ण, परिपक्व बनते ते त्यांच्यातील स्नेहाच्या बंधाने! रोज पायाशी घुटमळणारे मांजर, खिडकीत येणारे चिऊ-काऊ, दारात फुलणारी अबोली किंवा जाई-जुईसुद्धा या प्रेमाच्या धाग्याने फुलतात , बहरतात. मग घरातील माणसांमधील नातीसुद्धा या धाग्यातच गुंफली गेली तर कुटुंबातील व्यक्ती केंद्राभोवती फिरणाऱ्या चाकाच्या आऱ्याप्रमाणे कुटुंबातूनच ऊर्जा घेऊन उंच भरारी मारतील, पण त्याचवेळी एका धाग्याने घराशीही जोडले जातील. जिथे सुसंवाद असेल अशा अनेक कुटुंबांनी बनलेल्या समाजामध्ये आत्ताच्या काळात भेडसावणारी एकाकी पडणाऱ्या वृद्धांची समस्या, नकारत्मकतेकडे झुकणाऱ्या युवा वर्गाच्या समस्या आणि या दोन पिढ्यांच्या कात्रीत सापडलेली मध्यमवयीन पिढीच्या समस्या आपण बऱ्याच अंशी सोडवू शकू.
© डॉ. मेधा फणसळकर
मो 9423019961
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈