श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवितेचा उत्सव
☆ दान… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆
दान…
प्रकाश जगतात
आपल्याच सौंदर्याचा टेंभा मिरवणाऱ्यांना
माहिती नसते की
काळोखाचेही असते जग, प्रकाश जगाप्रमाणेच
अदभुत अन् विलक्षण..
पहा नं,
प्रकाशाच्या मिटतात पाकळ्या अन्
माना टाकतात रंगबिरंगी ही फुले,
तेंव्हा रातराणी..जाई ..जुईच्या
सुरु होतात दर्वळवेळा.
काळोखावर कोरलेली ही नक्षी,जणू
चांदणवेलच.
अन् एरव्ही पाना पानात मिटून असलेला
काजव्यांचा थवा उतरतो..तरंगतो अवकाशात
तेंव्हा वाटते जणू आकाश-झुंबरच.
दृष्टी पलीकडे याहूनही बरेच काही असे.
वाटते,
‘त्याने’ साऱ्यांनाच दिले आहे सारे काही
भरभरून…
ज्याच्या त्याच्या तोलाचे.. मापाचे.
फक्त
वेळ अन् संधी यायचा अवकाश…..
© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा टाकिज जवळ, मिरज
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈