श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 77 – मन ☆
नको नको रे तू मना
मना असा उगा धावू।
धावुनिया विचारांना
विचारांची वाण लावू।
लावी न्याय, निती थोडी
थोडी कष्टाप्रती गोडी।
गोडी अवीट सत्याची
सत्यासंगे धर्म जोडी।
जोडी मनांची शृंखला
शृंखलेत गुंफी मोती।
मोती विचारांचे लाखो
लाखो पेटतील ज्योती।
ज्योतीच्या या प्रकाशाने
प्रकाशित अंतरंग ।
अंतरंग शुद्ध ठेवी।
ठेवी दूर ते असंग।
असंगाचे मृगजळ
मृगजळ भासमान।
भासमान दिवा स्वप्नी
वास्तवाचे ठेवी भान
भान हरपूनी काम
कामामधे शोधी राम।
राम भेटता जीवनी
जीवनच चारी धाम।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈