श्रीमती अनुराधा फाटक

?  विविधा  ?

 ☆ सुरू….. ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

 रोज गडबडीने ग्राउंडवर फेऱ्या मारून घरी येऊन कामाला लागणारी मी रविवार असल्याने फेऱ्या मारून झाल्यावर ग्राउंडवरच एका बाकावर बसले.इकडं तिकडं बघितलं. ओळखीचं कुणी दिसलं नाही तसं सभोवताली बघू लागले आणि एका झाडाने माझे लक्ष वेधले.

सरळसोट वाढलेले ते सुरुचे झाड होते.त्याच्याकडं बघताना मनात विचार आले.आपल्या विस्ताराचा पसारा न वाढविता, आजूबाजूला न बघणाऱ्या या झाडाने आकाशाकडंच झेप घेतली की,

त्याची ही वृत्ती मला फार आवडली.ना फांद्यांचे अवडंबर ना फुलांचा मायापाश, सोस!स्वतंत्र जगण्याची ओढ असलेलातो वृक्ष मला एखाद्या व्रतस्थासारखा वाटला.

शाळेत मुलांना शिकविलेला सूचीपर्णी वृक्षांचा प्रदेश आठवला. बर्फाळ प्रदेशात आपल्या टोकदार पानांनी अंगावरचे बर्फ झटकणारा तो सुरे आणि आकाशात झेप घेणारा हा सुरु.एकमेकांचे भाऊबंदच दुसऱ्यात न अडकणारे !

त्या सुरूची मी माझ्याशी तुलना करु लागले. आपल्याला गोतावळा गोळा करण्याची हौस !त्यात अडकलेल्या मायापाशात बऱ्याचवेळा आपल्या ध्येयाचाही आपल्याला विसर पडतो. ज्याची गरज नसते त्यात गुंतून पडतो.अहंकार,  स्वार्थ जोपासतो.

‘कसला विचार करतेस?’

माझं मन मला म्हणालं, मन नव्हे तो सुरुच माझ्याशी बोलला.तशी मी सावध झाले.

‘जमेल कां आपल्याला सुरुसारखे जगणे?सोडता येईल कां मायापाश?तोडता येतील कां स्वार्थाच्या फांद्या?’

खांद्यावर असलेल्या पर्समधील मोबाईल वाजला.नाईलाजाने हातात घेतला.मुलाचा फोन होता.पटकन उठले.

‘मी नाही सुरु होऊ शकणार’

सुरुच्या झाडाकडं बघतच उठले.घरच्या ओढीने !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments