? जीवनरंग ❤️

☆ लाखातील एक सून..भाग 1…अनामिक☆ संग्राहक – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆ 

रात्री आठ सव्वा आठची वेळ, अमित ऑफिस मधून घरी परतला व अत्यंत उत्साहाने मुग्धाला आवाज देवू  लागला.

“मुग्धा, ए मुग्धा, अगं ऐक ना, उद्या संध्याकाळी गेट टुगेदर ठरलं आहे आपल्याकडे. प्रतिक आणि प्रिया आले आहेत गोव्याहून एका लग्नासाठी, फक्त दोनच दिवस आहेत ते इथे मग काय आपल्या अख्ख्या गॅंगलाही आमंत्रण देऊनच टाकलं. 

अनायसे रविवारच आहे उद्या धम्माल करूया सगळे मिळून. आणि हो, प्रतिकचा खास निरोप आहे तुझ्यासाठी काही तरी अगदी साधा आणि लाईट मेनू ठेव म्हणून. खाऊन खाऊन त्याच्या पोटाचं पार गोडाऊन झालंय म्हणे, असं  म्हणून अमित खळखळून हसला. 

त्याला असं खुश बघून मुग्धाही सुखावली. खरंच किती दिवसांनी असा दिलखुलास हसतोय हा ? नाहीतर नेहमीच कामाच्या व्यापात नको तेवढा बुडालेला असतो. 

मैत्रीची जादूच खरं आगळी, सळसळत्या चैतन्याने ओथंबलेलं निखळ निरागस हास्य ही मैत्रीचीच तर देणगी असते ना ?

बऱ्याच दिवसांनी मैफिल रंगणार होती. एव्हाना अमितचे सगळे मित्र व त्यांच्या बायका ह्या सगळ्यांसोबत मुग्धाची छान घट्ट मैत्री जमली होती आणि नेहमीच्या रुटीनला फाटा देवून कधीतरी फुललेली अशी एकत्र मैफिल म्हणजे फ्रेशनेस आणि एनर्जीचा फुल्ल रिचार्जच. त्यामुळे मुग्धालाही खूप आनंद झाला होता. 

हा हा म्हणता रविवारची संध्याकाळ उगवली आणि चांगली दहा बारा जणांची चांडाळचौकडी गॅंग अमित व मुग्धाकडे अवतरली. हसणे, खिदळणे, गप्पा टप्पांना अगदी ऊत आला होता. 

घरात कितीतरी दिवसांनी गोकुळ भरलेलं पाहून अमितचे बाबा, म्हणजेच नानाही खूपच खुश होते. घरी कुणी चार जण आले की घरात काहीतरी उत्सव असल्यासारखंच त्यांना वाटत असे आणि लहान मुलांसारखं अगदी मनमुरादपणे ते सगळ्यांमध्ये सहज मिक्स होत असत. 

मुग्धाने मस्तपैकी व्हेज पुलाव आणि खास नानांच्या आवडीची भरपूर जायफळ, वेलदोडा व सुकामेवा घालून छान घट्ट बासुंदी असा शॉर्ट, स्वीट आणि यम्मी बेत ठेवला होता.  

गप्पा तर रंगात आल्याच होत्या पण त्याचबरोबर बासुंदी व पुलाव ह्यावरही यथेच्छ ताव मारला जात होता. 

सगळेच जण हसण्या – बोलण्यात व खाण्यात मश्गुल असताना अमित जोरात ओरडला, “नाना अहो हे काय, नीट धरा तो बासुंदीचा बाऊल, सगळी बासुंदी सांडवली अंगावर. नविन स्वेटरचे अगदी बारा वाजवले नाना तुम्ही. जा तुमच्या रूम मध्ये जावून बसा पाहू.”   

भेदरलेले नाना स्वतःला सावरत कसेबसे उठले, तशी मुग्धा लगेच त्यांच्याजवळ धावली. “असू द्या नाना, धुतलं की होईल स्वच्छ स्वेटर. काही काळजी करू नका.” असं म्हणत त्यांच्या अंगावर सांडलेली बासुंदी तिने हळूच मऊ रुमालाने पुसून घेतली व त्यांना फ्रेश करून त्यांच्या रूम मध्ये घेवून गेली.  

थोड्याच वेळात मैफिलही संपुष्टात आली व सगळे आपापल्या घरी गेले, तसं प्रेमभराने अमितने मुग्धाचा हात हातात घेतला व म्हणाला, “वा ! मुग्धा, पुलाव काय, बासुंदी काय, तुझं सगळ्यांशी वागणं बोलणं काय, सगळंच अगदी नेहमीप्रमाणे खूप लाजवाब होत गं. 

खरंच खूप छान वाटतंय आज मला. फक्त एक गोष्ट ह्यापुढे लक्षात ठेव मुग्धा, अशा कार्यक्रमांमध्ये नानांना आता नको इन्व्हॉल्व करत जावू. काही उमजत नाही गं आताशा त्यांना. उगाच ओशाळल्यासारखं वाटतं मग.”

अमितचं बोलणं संपताच इतका वेळ पेशन्स ठेवून शांत राहिलेली मुग्धा आता मात्र भडकली. “हो रे, अगदी बरोबर आहे तुझं. कशासाठी त्यांना आपल्यात येवू द्यायचं ? पडलेलं राहू देत जावूया एकटंच त्यांना त्यांच्या रूम मध्ये, नाही का ?

मला एक सांग अमित, तू ही कधीतरी नकळत्या वयाचा होताच ना रे ? तू ही त्यांना क्वचित कधीतरी ओशाळवाणं वाटेल असं वागतच असशील, मग तुलाही असं एकटं ठेवायचे का रे तुझे आई बाबा ? नाही ना ?

क्रमशः….

ले.: अनामिक

सौ. मेधा सहस्रबुद्धे

पुणे

मो  9420861468

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments