श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
चं म त ग ! श्री प्रमोद वामन वर्तक
? कुकर आणि गॅसवरचा पाडवा ! ?
“अहो ऐकलंत का जरा !”
“अगं लग्न झाल्यापासून तुझ्या शिवाय कुठल्या बाईच ऐकलंय का मी ?”
“आता मला कसं कळणार, ऑफिसमध्ये कोणा कोणाचं ऐकता ते ?”
“बरं, बरं, कळतात हो मला टोमणे ! ते जाऊ दे, सकाळी सकाळी मला सणा सुदिला वाद नकोय ! बोल काय म्हणत होतीस तू ?”
“अहो आपण किनई या पाडव्याला स्वर्गात जाऊ या !”
“काय s s s s ?”
“अहो केवढ्या मोठ्याने ओरडताय ? शेजारी पाजारी बघायला येतील, काय झालं म्हणून !”
“अगं मग तू बोललीसच तशी ! दसऱ्याला जसं सिमो्लंघन करतात तसं पाडव्याला काय स्वर्गारोहण करतात की काय ?”
“अहो नीट ऐकून तर घ्याल किनई, का लगेच सुतांवरून स्वर्ग गाठाल ?”
“अगं मी कुठे स्वर्ग गाठायला चाललोय ? तूच म्हणालीस नां, की आपण या पाडव्याला स्वर्गात जाऊ या म्हणून ?”
“अहो हा स्वर्ग म्हणजे एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची शो रूम !”
“अगं मग असं सविस्तर सांग नां, मला कसं माहित असणार तुझ्या डोक्यात कुठला स्वर्ग आहे ते ? पण तिथून तुला काय घ्यायच आहे ते नाही बोललीस.”
“अहो आता मला प्रत्येक पाडव्याला ओवाळणीत नवीन साडी वगैरे नकोय. अजून पाच सहा कोऱ्या साडया तशाच पडल्येत !”
“पण त्या साडया काय तुला ‘इधर का माल उधर !’ करण्यात कधीतरी कामाला येतीलच नां ?”
“म्हणजे ?”
“अगं म्हणजे एखादी मिळालेली साडी आवडली नाही, तर तोंड दाबून बुक्क्याचा मार खाल्ल्यागत तुम्ही बायका ती ठेवून घेताच की नाही ?”
“मग तोंडावर कसं बरं सांगणार आवडली नाही म्हणून ? ते बरं दिसत का ?”
“हो ना, मग तीच साडी कधी ना कधी तरी दुसऱ्या बाईला देता नां, त्यालाच मी ‘इधर का माल….’
“कळलं, कळलं ! आम्हां बायकांचं ते ट्रेड सिक्रेट आहे !”
“यात कसलं सिक्रेट, ओपन सिक्रेट म्हणं हवं तर ! बरं ते जाऊ दे, तुला त्या स्वर्गाच्या शो रूम मधे कशाला जायचय ते नाही कळलं !”
“मला ‘ठुशी’ घ्यायची आहे ! सासूबाईंनी त्यांची खरी ‘ठुशी’ मोठ्या जाऊबाईंना दिली, तेंव्हा पासून माझ्या डोक्यात निदान एक ग्रॅमची ‘ठुशी’ घ्यायच फारच मनांत आहे !”
“अगं पण तुला आईनं, वहिनीला दिलेल्या ठुशीच्या बदल्यात तिचा ‘घपला हार’ दिला ना, मग?”
“अहो त्याला ‘घपला हार’ नाही ‘चपला हार’ म्हणतात!”
“तेच ते, अगं पण मग खोटी खोटी एक ग्रॅमची ‘ठुशी’ कशाला ? आपण वा. ह. पे. कडून किंवा पु. ना. गा. कडून खरी ‘ठुशी’ घेऊ या की ?”
“नको गं बाई, हल्ली खरे दागिने घालायची सोय कुठे राहील्ये ? सगळ्या बायकांचे सगळे खरे दागिने लॉकरची शोभा वाढवताहेत झालं !”
“मग माझ्या डोक्यात एक नाही दोन वस्तू आहेत, ज्या नुकत्याच बाजारात नव्याने आल्येत, त्या नवीन आणि इनोव्हेटिव्ह असल्यामुळे खूपच महाग आहेत, त्या घेऊ या का ?”
“अगं बाई, त्या आणि कुठल्या ?”
“प्रेशर कुकर आणि…..”
“काय s s s ?”
“अगं किती जोरात ओरडलीस ? मगाच्या सारखे शेजारी पाजारी बघायला येतील ना ?”
“अहो तुम्ही बोललातच तसं ! प्रेशर कुकर काय बाजारात नवीन आलेली वस्तू आहे ? गेली कित्येक वर्ष मी वेग वेगळे कुकर वापरत्ये.”
“अगं खरंच सांगतो, हा प्रेशर कुकर बोलणारा आहे, जो नुकताच नवीन आलाय दिवाळीसाठी बाजारात!”
“काय सांगताय काय ?”
“अगं खरं तेच सांगतोय, या कुकर मधे ना शिट्याच होत नाहीत !”
“मग कळणार कसं कुकर झाला आहे का नाही?”
“अगं जरा नीट ऐक, मी तुला म्हटलं ना की हा बोलणारा कुकर आहे म्हणून, मग त्याच्यात शिट्या कशा होतील ? तुला किती शिट्या हव्येत त्यावर तो सेट करायचा आणि गॅस चालू करायचा !”
“बरं, मग ?”
“मग त्यातून थोडया थोडया वेळाने one, two, three असे आवाज येतील, त्यावरून तुला कळेल की कुकरच्या किती शिट्या झाल्येत त्या.”
“अस्स होय ! मग बरंच आहे, सिरीयल बघायच्या नादात मला मेलीला कळतच नाही किती शिट्या झाल्येत त्या ! चालेल मला, आपण तो बोलणारा कुकर घेऊयाच ! ते ठुशी बिशीच जाऊ दे, पुन्हा कधी तरी बघू !”
“Ok, मग उद्याच जाऊन बोलणारा कुकर घेऊन येवू, काय ?”
“हो चालेल, पण तुम्ही दुसरी वस्तू पण म्हणाला होतात, ती कुठली ?”
“आहे, म्हणजे तुझ्या लक्षात आहे मी दोन वस्तू म्हटल्याचे.”
“म्हणजे काय? आम्हां बायकांची मेमरी तशी पुरुषांपेक्षा बरी असते म्हणतात!”
“ती फक्त तुम्हाला हव्या असलेल्या खरेदीच्या बाबतीतच बरं का ! बाकी सगळा उजेड.”
“कळलं, कळलं ! मला पण तुम्ही म्हणालात तसा सणा सुदीला वाद नकोय ! ती दुसरी वस्तू काय आहे ना, ती बोला चटचट, मला अजून बरीच कामं पडल्येत !”
“अगं त्या दुसऱ्या नवीन वस्तूच तू नांव ऐकलंस ना, तर नाचायलाच लागशील बघ !”
“ते नाच कामाचं नंतर बघू, पटकन त्याच नांव….”
“रिमोट कंट्रोलची गॅस शेगडी !”
“काय ?”
“अगं आपल्या टीव्हीला कसा रिमोट कंट्रोल असतो ना, तसाच या गॅसच्या शेगडीला पण असतो ! बसल्या जागेवरून तू गॅस चालू किंवा बंद करू शकतेस ! बोल कशा काय आहेत या दोन नवीन वस्तू !”
“झ ss का ss स ss ! आता सिरीयल सोडून मधेच उठायला नको गॅस बंद करायला !”
एवढं बोलून बायको किचन मधे पळाली आणि मी…. खरी सोन्याची ठुशी परवडली असती, पण या दोन नवीन त्याहून महागडया वस्तू घ्यायचे कबूल करून, स्वतःच्या पायावर धोंडा तर मारून नाही ना घेतला, या विचारात पडलो !
© श्री प्रमोद वामन वर्तक
(सिंगापूर) +6594708959
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈