डॉ. ज्योती गोडबोले
मनमंजुषेतून
☆ फ्रीझ इन्स्पेक्शन…प्रकाश तांबे ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆
अत्यंत साशंक नजरेने, पत्नी घरात नसताना, मी आमच्या Fridgeची पहिल्यांदा आणि शेवटची झडती घेतली होती.
Fridge उघडताच आंब्याच्या पेटीत जसे वरवर चांगले आंबे रचतात आणि खाली गाळ भरतात तसेच वरच्या कप्यात पॕकबंद दुधाच्या पिशव्या, पातेल्यातले वापरातले दूध, लोणी, पनीर, प्लास्टिक कंटेनरमधे चिरून ठेवलेल्या दोन भाज्या व तत्सम ताजे पदार्थ पाहिल्यावर मी सुखावलो.
परंतु गाफिल न रहाता खालच्या कप्प्यांकडे जरा आधिक बारकाईने बघायचं ठरवलं. वरून अलगद झाकणाने बंद केलेल्या पण ओसंडून वहाणा-या विविध आकाराच्या बऱ्याच वाट्या आणि दोन तीन पातेल्यांनी माझे दाटी वाटीत का होईना, पण सर्व प्रथम, जोरदार स्वागत केले. तेलाची तीन चार लसणीच्या पाकळ्या शिल्लक असलेली तळाला गेलेली फोडणी, मळलेल्या कणकेचा गोळा, एक दोन दिवसापूर्वी केलेल्या पावभाजीसाठीचा कांदा व लिंबाच्या फोडी व विरजणासाठी संभाळून ठेवलेले दही वगैरे कॉमन पदार्थ आढळले. यात दडलेल्या मालाला काळाचे बंधन नसते कारण expiry date चे बंधन तो जुमानत नाही. कंझमशन रेटही खूप हाय असतो.
परंतु त्याच बरोबर, एक दोन दिवसापूर्वीच्या उरलेल्या तयार भाज्याही झाकणीखाली आपला केंव्हा नंबर लागेल या विवंचनेत पडून राहिलेल्या आढळल्या आणि हळूहळू मला आमच्या घरी वारंवार होणाऱ्या पराठे वा सँडविचेसचे कोडे उलगडत गेले. ओलसर भाज्या पराठ्यासाठी आणि कोरड्या भाज्या सँडविचेस साठी असे त्यांचे ढोबळ वर्गीकरण असते.
दुपारचे टाइमपास कुकरी शो बघणे हा केवळ वरवरचा दिखावा असून शेवटी आईकडून परंपरेने शिकलेले पराठेच कामी येतात हेच खरे. शिवाय हेच पराठे न लाटता पोळपाटावर थापून मधे भोक पाडून तूप लोणी सोडले की थालीपीट म्हणून तुमच्या पानात अवतरू शकतात. आहे की नाही मल्टी पर्पज युटिलिटी?
कुकरच्या एका गोलसर भांड्यात शिजवून ठेवलेले दाट वरणही या गर्दीत होते. बहुदा पहिल्या कप्यातील पळीची फोडणी देऊन डाल तडका या नावाखाली येत्या एक दोन दिवसात ते माझ्या पानात अवतरणार होते.
अजून एक उभा गंज होता. हात लागताच त्यातले ताक जागे झाले आणि ढवळताच वर वर दिसणा-या पाण्याशी एकरुप झाले. शेजारीच पसरट पातेल्यात साईचे दही होते. खूप विचार केला पण कोणत्याही प्रयत्नाने ‘हि’च्या नकळत साय लाटणे अशक्य होते म्हणून नाद सोडला.
दारा मागच्या साईडच्या कप्यात विविध मसाल्यांची तयार पाकिटे त्यांच्या वापराच्या frequency प्रमाणे लावली होती. दुसर्-यात सर्व टाईपच्या सॉसच्या बाटल्या होत्या. काहींवर माझ्या हलगर्जीपणामुळे आलेले ओघळ दिसले ते पटकन ओल्या फडक्याने पुसून घेतले.
भाजीच्या कप्यात objectionable काहीच आढळलं नाही. गाजर, काकडी, टोमॕटो एकमेकांच्या साथीत ” मरेंगे तो साथमे ” असे म्हणत एकमेकांना कंपनी देत होते. डीप Fridgeमधेही एकदम सामसूम होती. सगळेच लांबच्या रेसचे घोडे air packed अवस्थेत उभे होते. Icecream container sealed होता. मी हताश झालो. तेवढ्यात एक काजू दिसला तो तोंडात टाकला Inspection fee समजून.
एवढ्यात ही आली आणि मी Fridgeचा दरवाजा पटकन बंद केला. तिच्या लक्षात आले आणि मी ‘त्यातला’ नसून सुध्दा तिने विचारले सोडा शोधताय का? मी माझे निर्दोशत्व सिध्द केलंच पण त्याच बरोबर एकही पदार्थ वाया न घालवता संसाराचा गाडा अविरत चालवणा-या तिचे व तिच्यासारख्या तुम्हा असंख्य गृहिणींचे मनोमन आभार मानले.
ले. प्रकाश तांबे
8600478883
(Repost)
संग्राहक : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈