श्री सुहास रघुनाथ पंडित
३० ऑक्टोबर – संपादकीय
‘रणांगण’ या गाजलेल्या कादंबरीचे लेखक श्री.विश्वनाथ चिंतामणी उर्फ विश्राम बेडेकर आणि ‘वासूनाका’ कार श्री.प्रभाकर नारायण उर्फ भाऊ पाध्ये यांचा आज स्मृतीदिन.
विश्राम बेडेकर यांचा जन्म 1906 मध्ये अमरावती येथे झाला.त्यांचे शिक्षण अमरावती व पुणे येथे झाले.मराठी साहित्यात कादंबरी बरोबरच त्यांनी पटकथा लेखनही केले. शिवाय सुमारे 15 चित्रपटांचे दिग्दर्शन व सहदिग्दर्शनही त्यांनी केले आहे. 1934 साली त्यांनी कृष्णार्जुन युद्ध या चित्रपटाचे सर्वप्रथम दिग्दर्शन केले. एक झाड दोन पक्षी हे त्यांचे आत्मचरित्र खूप गाजले. टिळक आणि आगरकर, ब्रह्मकुमारी, वाजे पाऊल आपुले, नरो वा कुंजरोsवा इ. नाटके त्यांनी लिहिली. शेजारी, स्वा.सावरकर, काबुलीवाला(हिंदी),
The Immortal सांग (अमर भूपाळी) इ. चित्रपटांचे पटकथा लेखन केले. सिलीसबर्गची पत्रे हे त्यांचे आठवणींवर आधारीत पुस्तक.
एक झाड दोन पक्षी’ या त्यांच्या आत्मचरित्रास 1985 चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. तसेच विष्णूदास भावे पुरस्कार सांगली येथे 1982 ला देण्यात आला. 1986 च्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मुंबई येथील मराठी साहित्य संमेलनाचेही ते 1988 ला अध्यक्ष होते.
दि.30/10/1998 ला त्यांचे पुणे येथे निधन झाले.
भाऊ पाध्ये हे अर्थशास्त्रातील पदवीधर! पण त्यांनी साहित्य,कामगार चळवळ, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले.
अग्रेसर, करंटा, बॅ.अनिरुद्ध धोपेश्वरकर, राडा, वणवा, वासूनाका या त्यांच्या काही कादंब-या. डोंबा-याचा खेळ, पिचकारी, मुरगी, थालीपीठ, थोडी सी जो पी ली हे त्यांचे कथासंग्रह. शिवाय गुरूदत्त चरित्रही व ऑपरेशन छक्का हे नाटक त्यानी लिहिले.
वैतागवाडी या त्यांच्या कादंबरीस 1965 सालचा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार मिळाला. बॅ. धोपेश्वरकर या कादंबरीला 1968 चा ‘ललित’ पुरस्कार मिळाला. 1993 साली महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने त्यांना गौरववृत्ती जाहिर केली.
त्यांच्या साहित्याविषयी जाणकारांनी अनेक मते व्यक्त केली आहेत. मराठी साहित्य विश्वात वादळ निर्माण करणारे साहित्यिक असे त्यांचे वर्णन केले जाते. त्यांचे लेखन थेट वास्तवाला भिडणारे आहे. त्यांच्या लेखनातून मुंबईतील संक्रमणकाळात झालेले बदल चित्रित झालेले दिसतात. मराठी साहित्यात स्वतःचा ठसा निर्माण करणा-या भाऊ पाध्ये यांचे 30/10/1996 ला निधन झाले.
श्री.बेडेकर व पाध्ये यांना स्मृती वंदन!.
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :- विकिपीडिआ साभार.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈