श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ डायरीतली कोरी पाने – भाग – 3 ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

पूर्वसूत्र- “मीच त्याला म्हंटलं होतं, लग्नानंतरचा सत्यनारायण एकदा होऊ दे मगच जा प्रवासाला “

” बोललाय तो मला”

” मी आपलं मला योग्य वाटलं ते सांगितलं. तरीही तुला वाईट वाटलं असेल तर…”

“नाही आई.ठीक आहे.”

” तोवर मग माहेरी जाऊन येतेस का चार दिवस?”

” नाही. नको. माहेरीही नंतरच जाईन सावकाशीने”

  हे ऐकून आईंना बरं वाटलं,..पण प्रभावहिनी…?)

               —————–

प्रभावहिनींनी मात्र चमकून नंदनाकडे पाहिलं.  ‘ही अशी कशी..?..’ अशा कांहीशा नजरेने..तिची किंव केल्यासारखं. त्यांचं हे असं बघणं नन्दनाच्या नजरेतून सुटलं नाही. प्रभावहिनी एखाद्या कोड्यासारख्या तिच्यासमोर उभ्या होत्या. हाताने पोळ्या लाटत  होत्या पण नजर मात्र नन्दनाकडे. नंदना मोकळेपणाने हसली.

 ” वहिनी तुम्ही लाटून द्या, मी भाजते.”

 ” नको..नको.. करते मी”

 “अहो, पटकन् होतील. खरंच” नन्दनाचा सहजपणा प्रभावहिनींना सहजासहजी झिडकारता येईना. खरं तर त्यांना तिला दुखवावसं वाटत नव्हतं. दोन्ही सूनांची ही जवळीक आईंच्या नजरेतून मात्र सुटली नव्हतीच. त्यांना आणखी वेगळीच काळजी. नन्दना आपली शांत, सरळ स्वभावाची आहे. पण या प्रभाने तिचे कान फुंकले आणि ती बिथरली तर..?

 “तिच्यापासून चार पावलं लांबच रहा गं बाई.” एक दिवस न रहावून आईंनी नन्दनाला सांगितलंच.

“एक नंबरची आक्रस्ताळी आहे ती.’सुसरबाई तुझी पाठ मऊ’ म्हणत मी आपली गप्प बसते.पण शेजार्‍यांना तमाशा नको म्हणून जीव टांगणीला लागलेला असतो बघ माझा. दोन गोड नातवंडांकडं पाहून जीव तुटतो माझा. यांचं आणि राहुलचं त्यांना वेगळं काढायचं चाललंय. मीच आपली यांना म्हणते, जरा सबुरीने घ्या.घाई कशाला? जे काही व्हायचंय ते आपले डोळे मिटल्यावर होऊं दे. नंतरचं कुणी बघितलंय? दृष्टीआड सृष्टी.”

सगळं ऐकून नन्दनाच्या तोंडाची चवच निघून गेल्यासारखं झालं. तिला आपलं उगीचंच वाटत होतं ….’ आता या राहुलला कसं समजवायचं? त्यांना वेगळं करायचं तर ते नंतर बघू.आत्ता लगेच तर मुळीच नको. मी लग्न होऊन या घरात आले न् घर मोडून बसले असंच व्हायचं. नकोच ते.राहुलला एक वेळ समजावता येईल पण या  प्रभावहिनी? सगळं चांगलं असून अशा कां वागतायत या?..’ ती स्वतःलाच विचारत राहिली. पण या प्रश्नाचे नेमके उत्तर फक्त प्रभावहिनींच्या जवळच होते. ते उत्तर शोधत एक दिवस नन्दना प्रभावहिनींच्या मनाच्या तळापर्यंत जाऊन पोचली. पण तो प्रवास आणि मिळालेले उत्तर दोन्ही सुखकर नव्हतेच…!

“मीही आधी तुझ्यासारखीच होते.शांत.समंजस.कधी ‘असं कां?’ म्हणून न विचारणारी. दोन मुलं होईपर्यंत गाफिलच राहिले मी. ‘तुम्ही म्हणाल तसं’ म्हणत दिवस ढकलले. पण माझा पदरच फाटका. पदरात पडणार तरी काय, किती आणि कसं..?” प्रभावहिनी अगदी मनाच्या आतलं मोकळेपणाने बोलत राहिल्या. स्वतःशीच बोलावं तसं.

“सासूबाईंचा बाकी कांही म्हणून त्रास नव्हता. पण त्यांचा कुणावरच वचक कसा तो नव्हताच. त्यामुळे घरचे हे तिन्ही पुरुष शेफारलेले होते. सतत आपली त्यांची नांगी डंख मारायला टपलेलीच. सासुबाईंचं त्यांच्यापुढे काही चालायचं नाही.म्हणून  मग सासूबाईंच्या तावडीत मी आपसूक सापडले. रागावणं,टाकून बोलणं हे फारसं काही नव्हतं, पण देव देव फार करायच्या. घरात सारखं पूजाअर्चा,सवाष्ण-ब्राह्मण, सोवळं ओवळं सारखं सुरुच असायचं. माझी पाळी असली की गोळ्या घेऊन पुढे ढकलायला लावायच्या. खूप त्रास व्हायचा त्या गोळ्यांचा. नको वाटायचं. पण सांगणार कुणाला? यांना काही बोलायची सोय नव्हती. लगेच आकांत-तांडव सुरू करायचे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत दिवस ढकलले. राबराब राबत राहिले. परवा सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळीही ‘गोळी घे’ म्हणाल्या. ‘मला त्रास होतो’ म्हटलं तरी ऐकेचनात. मग त्यांना ठणकावण्याखेरीज दुसरा मार्गच नव्हता. तुला वाटलं असेल ना,ही बाई अशी कशी असं?”

“हो.वाटलं होतं. तुमचं आईना तोडून बोलणं मला आवडलं नव्हतंच.”

“पूर्वी बोलणं सोड वर मान करून बघायचीही नाही.आता नाही सहन होत. ताडताड बोलून मोकळी होते.त्याशिवाय बरंच वाटत नाही. राहुलभाऊजीनी आईंचं रूप घेतलंय आणि हे मामंजींवर गेलेत. सतत त्रागा.. आदळआपट..भसाभसा सिगरेटी ओढणं असं सगळं त्यांचं नको तेवढं उचललंय.

मध्यंतरी धंद्यात जबरदस्त खोट आली होती. आत्ता आत्ता कुठं डोकं वर काढतायत. तेव्हा शांतपणे एकत्र बसून चर्चा करून काही मार्ग काढतील असं वाटलं होतं. पण तिघेही ढेपाळून गेले. दोघींच्या अंगावरचे दागिने त्यांनी आधी उतरवून घेतले. आम्ही बिनबोभाट काढून दिले. पण तेवढ्याने भागणार नव्हतं.मग आदळाआपट..चिडचिड सुरु. माझं माहेर पोटापुरतं मिळवून खाणारं पण स्वाभिमानाने जगणारं.पैशांची सोंगं ती माणसं कुठून घेणार? तरीही माझ्या माहेरच्या गरिबीचा मामंजीनी उद्धार केला आणि मी बिथरले. यांनी त्यांचीच री ओढली. सासुबाई घुम्यासारख्या गप्प. आणि राहूलभाऊजी त्या गावचेच नसल्यासारखे. त्या दिवशी सणकच गेली डोक्यात माझ्या.राग दाबून ठेवून घुसमट सुरु झाली न् मी फणाच काढला. मनात साचलेलं भडभडून बोलून टाकलं. ऐकून सगळेच चपापले… त्यांच तिरीमिरीत हे पुढे झेपावत माझ्या अंगावर धावून आले.. मुलं कावरीबावरी झाली होती… मुलांकडे पाहून मी गप्प बसेन असं त्यांना वाटलं होतं.. पण मी गप्प बसूच शकले नाही…यांनी संतापाने माझ्यावर हात उगारला  तेव्हा मात्र माझा तोल गेला..तो हात तसाच वरच्यावर घट्ट धरुन ठेवत यांना निक्षून बजावलं,’आज अंगावर हात उगारलात तो पहिला न् शेवटचा. पुन्हा हे धाडस करू नका. पस्तवाल. डोक्यात राख घालून घर सोडणार नाही मी.  जीवही देणार नाही. पण लक्षात ठेवा,..पुन्हा हात उगारलात तर मात्र तो मूळापासून उखडून टाकीन….!’

सगळं ऐकून नन्दनाच्या  अंगावर सरसरून काटाच आला.

त्या दिवसापासून नन्दना पूर्णपणे मिटूनच गेली. हे घर,ही माणसं, सगळं तिला परकंच वाटू लागलं. तिच्या माहेरी तरी उतू जाणारी श्रीमंती कुठं होती? पण.. आई-आण्णांच्या मनाची श्रीमंती या रखरखाटाच्या पार्श्वभूमीवर तिला अगदी असोशीने हवीशी वाटू लागली…माहेरच्या ओढीने तिचा जीव तळमळू लागला. पण तिने स्वतःचीच समजूत घातली.

आई-आण्णा किती दिवस पुरणार आहेत? आणि या वयात  त्यांच्या जीवाला माझा घोर कशाला..? घोर लावायचाच तर तो राहुलच्या जीवाला का नको? सगळंच दान उलटं पडूनसुद्धा प्रभावहिनी पदर खोचून एवढ्या ताठ उभ्या राहू शकल्या,त्यांना निदान आपली साथ तरी द्यायला हवीच. फक्त आपलीच नव्हे राहुलचीसुद्धा..! पण..तो ऐकेल?

नन्दनाचं असं मिटून जाणं राहुलच्या नजरेतून सुटलं नव्हतंच.

“प्रभावहिनीनी तुला काहीतरी सांगितलेलं दिसतंय”

“त्यांनी मला सांगू नये असं आहे कां काही?”

“त्यांनी काय सांगितलय तुला?”

“त्या या घरात समाधानी नाहीत हे सांगितलंय आणि त्या कां समाधानी नाहीत हेसुद्धा.”

” समाधानी नसायला काय झालंय? सुख दुखतंय त्यांचं. दुसरं काय?”

“असा एकदम टोकाचा निष्कर्ष काढायची घाई करू नकोस राहुल.”

“तुला नेमकं काय म्हणायचंय?” त्याचा आवाज नकळत चढलाच.

“राहुल प्लीज.आपण चर्चा करतोय का भांडतोय? प्लीज,आवाज चढवू नकोस”

“पण तू त्यांची तरफदारी का करतेयस? राग येणारच ना?”

“त्यांची नको तर मग कुणाची तरफदारी करू? मामंजीची, भाऊजींची, आईंची की तुझी..?”

“त्यांनी नेमकं काय सांगितलंय तुला तेवढं बोल”

“त्यांनी काय सांगितलंय हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं नाहीच आहे राहुल.त्या सगळ्याबद्दल तुला काय वाटतं हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे.तू नीट आठवून अगदी प्रामाणिकपणानं सांग. त्या लग्न होऊन या घरी आल्या तेव्हापासून तू त्याला पहातोयस. पहिल्यापासून त्या अशाच त्रासिक,आक्रस्ताळी, आदळआपट करणाऱ्या होत्या का रे?”

राहुल निरुत्तर झाला. थोडा विचारात पडला.

“राहुल, तुला सांगू?आपलं लग्न ठरत होतं तेव्हा माझ्या आईचा या लग्नाला पूर्ण विरोध होता. इथे एकत्र-कुटुंबात रहावं लागेल आणि ते मला जमणार नाही असं तिला वाटत होतं. पण मी ठाम राहिले.’मला नक्की जमेल’ असं निक्षून सांगितलं. राहुल,पण तेव्हाचा माझा तो आत्मविश्वास आज थोडासा डळमळीत झालाय..”

“नंदना…?”

“होय राहुल. तू ऐकण्याच्या मनस्थितीत आहेस तोवर मला बोलू दे सगळं. तुला सांगू? खूप लहानपणापासून मी अगदी नियमितपणे डायरी लिहायचे. अगदी रोज. लग्नानंतरही त्यात खंड पडणार नाही हे मी गृहितच धरलं होतं. पण….”

“पण काय..?”

“पण लग्नानंतर फक्त पहिल्या दिवशी एकच दिवस मी डायरी लिहू शकलेय. पुढची पानं कोरीच राहिलीत. रोज मनात यायचं, लिहावं.मन मोकळं करावं असं.खूप लिहायचं होतं.पण नाही लिहिलं.. का कुणास ठाऊक..पण भिती वाटायची.. तू कधी चुकून ती डायरी वाचलीस..वाचून बिथरलास…मला समजून घेऊ शकला नाहीस.. तर?.. या..या एका भितीपोटीच मनातलं सगळं मनातच दाबून टाकलंय मी. डायरीची पानं कोरीच राहिली…!पण मनातलं सगळं मनातच दाबून ठेवून आपल्या माणसाशीही वरवर चांगलं वागणं ही सुध्दा प्रतारणाच नव्हे का रे?निदान मला तरी ती तशी वाटते. त्यामुळेच डायरीतल्या त्या कोर्‍या पानांवर लिहायचं राहून गेलंलं सगळं मला मोकळेपणानं बोलायचंय.

राहुल,तुमचं हे ‘एकत्र कुटुंब’ खऱ्या अर्थाने एकत्र आहे असं मला कधीच वाटलं नाहीये. ते तसं असायला हवं ना सांग बघू.

लग्न ठरलं, तेव्हा आण्णांनी मला खूप छान समजावून सांगितलं होतं. ते म्हणाले होते,

‘नंदना, एका लग्नामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी दुसऱ्या व्यक्तिशी बांधल्या जातात. त्यांना आपण ‘बांधिलकी’ मानतो की ‘बंधन’ समजतो यावर आपलं सहजीवन फुलणार कि विझणार हे अवलंबून असतं.’बांधिलकी’ मानली की आनंदाची फळं देणारं फुलणं अधिक सुगंधी असेल. ‘बंधन’ समजलं तर कालांतराने कां होईना ते जाचायलाच लागेल. आणि तसंही ‘बांधिलकी’ तरी फार अवघड कुठे असते?फक्त एक व्यक्ति म्हणून दुसऱ्याचं स्वतंत्र आस्तित्व मनापासून स्वीकारणं हेच फक्त लक्षात ठेवायचं की सगळं सोपं होऊन जातं.आणि ते सहजपणे स्वीकारलं की जीवनातली वाटचाल अधिकाधिक माणूसपणाकडे होऊ लागते…’ खूप छान वाटलं होतं ऐकताना! छान आणि सोपंसुध्दा. पण बांधिलकी मानणाऱ्यांनासुद्धा ती बांधिलकी एकतर्फीच असेल तर त्याची बंधनंही कशी जाचायला लागतात ते प्रभावहिनींकडे पाहून मला  समजलं. राहुल, तुला सांगू? पूर्वी बालविवाह व्हायचे तशा लग्नात लहान नसतो रे आम्ही मुली आता. पूर्वीचं वेगळं होतं. कच्ची माती सासरच्यांच्या हाती यायची. ते तिला दामटून हवा तसा आकार द्यायचे..ते आकार मग त्यांना जगवतील तसे जगायचे. ‘बाईच्या वागण्यावर सासरचा आनंद अवलंबून असतो’ असं म्हणणं किती सोपं आहे..! प्रभावहिनी त्रागा करतात म्हणून मग त्यांच्यावर वाईटपणाचा शिक्का मारून मोडीत काढणंही तितकंच सोपं आहे. त्यांना या घरात आल्यावर आनंद कसा मिळेल हे कुणी आवर्जून पाहिलंच नाही ही तू नाकारलीस तरी वस्तुस्थिती आहेच. उशिरा कां होईना ती स्विकारावीस एवढंच मला मनापासून सांगायचंय. पूर्ण वाढ झालेलं एक झाड माहेरच्या मातीतून मुळासकट उपटून सासरच्या मातीत लावण्यासारखं असतं रे आजकाल आमचं सासरी येणं. त्याची मूळं या नव्या मातीत रुजायला जाणीवपूर्वक मदत करणं, स्वच्छ हवा आणि मोकळा प्रकाश,पाणी त्या मूळांना द्यायची जबाबदारी स्वीकारणं हे काम सासरच्या माणसांनी करायला नको का रे? त्या चौघांना घरातून वेगळं काढणं म्हणजे नेमकं निदान न करता दुखरा अवयव कापून काढण्यासारखं होईल राहुल. या निर्णयाला तुझा आणि माझा विरोध असायला हवा,त्यात सहभाग नको.. तरच या घरी प्रभावहिनींवर झालेल्या अन्यायाचं थोडं तरी परिमार्जन होईल असं मला वाटतं…”

नन्दना कधी बोलायची थांबली  ते राहुलला समजलंच नाही.तिनं असंच बोलत रहावं म्हणून तो अधिरतेने तिच्याकडे पहात राहिला..!

नन्दना दिसायला चांगली होती. कुणालाही आवडावी अशीच‌.नंदनाचं रुप त्यालाही मनापासून आवडलं होतंच की.पण आजची नंदना त्याला नेहमीच्या नंदनापेक्षाही अधिक सुंदर वाटू लागली..! सुंदर आणि हवीहवीशी! …आणि..नंदना? ..डायरीतील कोरी पाने मनासारखी लिहून झाल्याच्या समाधानाने मनावरचं ओझं कुणीतरी अलगद उतरवून घ्यावं तशी ती सुखावली होती…!!

समाप्त

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments