सौ. अर्चना सुरेश देशपांडे
जीवनरंग
☆ नवा संदेश….भाग 1 ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆
कोरोना काळामध्ये संचारबंदी असल्यामुळे सर्वजण अगदी कंटाळून गेले होते. ऑफिसचे काम घरून असलेतरी कामाला वेळेचे बंधन नसायचे.कधी सकाळी लवकर मिटींग तर कधी रात्री उशिरापर्यंत, दिवस कसा संपला हे कळत नव्हतं.शरीर आणि मनाला बिलकुल उसंत नव्हती.
जवळ- जवळ दीड वर्षांनी संचारबंदी शिथिल करण्यात आली होती.एक दिवस रात्री जेवताना तनय म्हणाला,” बाबा , इतके दिवसात आपण कुठे ही बाहेर पडलो नाही,माझी शाळा आँनलाईन,माझे मित्र मला भेटत नाहीत मी अगदी कंटाळून गेलो आहे.” यावर वसुधा म्हणाली,” आपण जवळपास कुठे तरी जाऊन येऊ या का? मलाही सतत संगणकापुढे बसून व मिटिंग अटेंड करून उबग आला आहे.” शेखरला ही कल्पना आवडली . त्याने रविवारी सकाळी जाऊन संध्याकाळी परत येऊ या गोष्टीला हिरवा कंदील दाखवला.लगेच मित्राला अविनाश ला फोन केला.अवि व अनुने येण्याची तयारी दर्शवली.
रविवारी विमल मावशीच्या गावी जायचे ठरले .त्यांचे गाव शहरापासून वीस मैल दूर होते.
रविवारी सकाळी वसु लवकर उठली. तिने अंघोळ उरकून भरपूर तूप घालून सत्यनारायण प्रसादाला बनवतात तसाच शिरा करून घेतला. पाठोपाठ तनय व शेखर ही तयार झाले.
शेखर व वसुधा संगणक कंपनी उच्च पदावर कार्यरत होते. दोघांनाही पहिल्यापासून समाजकार्याची आवड होती. भूकंपामध्ये बेघर झालेल्या लोकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेमध्ये त्यांची ओळख झाली त्यानंतर पूरग्रस्तांना मदत करण्याच्या निमित्ताने ते परत भेटले. आणि भेटीतून एकामेकांच्या कार्यावर फिदा होऊन एकामेकांच्या प्रेमात पडले.. आणि लवकरच लग्नबंधनात बांधले गेले. दोन वर्षांनी त्यांच्या संसार वेलीवर फूल फुलले. तनयचा जन्म झाला. बाळंतपणाची रजा संपल्यावर ओळखीतून तनयला सांभाळण्यासाठी विमल मावशी आल्या आणि बाळाचा सांभाळ करता करता त्यांच्या घरातील केव्हा एक घटक होऊन गेल्या हे कळलेच नाही. त्या आपल्या गावाबद्दल कायम सांगत तिथल्या सुखसोयी, सुधारणा, तिथे राबवले जाणारे उपक्रम याबद्दल त्यांना अभिमान होता आणि या गावचा उमदा सरपंच, याचे तर त्यात सतत कौतुक करत. तो अतिशय प्रामाणिक आहे, त्याने गावात दिवाबत्ती रस्ते यांची सोय केली आहे, ग्रामपंचायतीचा दवाखाना सुरू केला आहे, गावात एक छोटसं उद्यान असून त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाके, मुलांसाठी घसरगुंड्या झोपाळे यांची सोय केली आहे आणि या सुविधांची देखरेख स्वतः गणेश करतो. गाव म्हणजे त्याचे जीवन आहे. गावकऱ्यांच्या अडीअडचणीला तो कायम धावून जातो एवढेच नव्हे तर गावातील मुलांना दूर पायपीट करावी लागू नये म्हणून दहावीपर्यंत शाळाही सुरू केली आहे. त्या शाळेत नियुक्त केलेले शिक्षकही अगदी मनापासून ज्ञानदानाचे कार्य करतात अशा अनेक गोष्टी विमल मावशी सांगत. असा हा गाव पहावा आणि आपल्या लेकाला भेटायला गेलेल्या विमल मावशींना घेऊन यावे या विचाराने त्यांनी विमल मावशीच्या गावी जाण्याचे निश्चित केले.
क्रमशः…..
© सौ. अर्चना सुरेश देशपांडे
पुणे
मो. ९९६०२१९८३६
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈