? मनमंजुषेतून ?

 ☆ आठवणीतील पुणे: दिवाळी उत्सव ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

लहानपणी सदाशिव पेठेत असताना धमाल असायची… जागा भाड्याची असली तरी त्या छोट्याश्या जागेत खरे जीवन सामावले होते असे वाटते.  आता कितीही मोठी जागा , प्रत्येकाला स्वतंत्र रुम असली तरी जागा अपुरीच वाटते.  छोट्या जागेत माणसे जवळ होती. आता मोठ्या रूम्समुळे माणसांमध्ये दुरावा व भिंती निर्माण झाल्या आहेत.  

त्याकाळी परिस्थिती बेताची असली तरी सण आला की उत्साहाचे वातावरण असायचे.  त्यात दिवाळी सण म्हणजे सर्व सणांचा राजा. आमची सहामाही परीक्षा संपतच आलेली असायची. घरात एव्हाना सणाची तयारी सुरू झालेली असायची.  रेडीमेड कपड्यांची तेव्हा फारशी चलती नव्हती. कापड घेवून आधीच कपडे शिवायला टाकायचे.  प्रत्येकाचे कापड घ्यायचे व कपडे शिवायला टाकायचे ठिकाण ठरलेलेच असायचे.  मी माझे कापड बाळाराम मार्केट मधून घेवून लक्ष्मी रोड वर असलेल्या चार्ली मध्ये शिवायला टाकायचो. वर्षाला ठराविक कपडे फक्त दिवाळीलाच मिळायचे. आत्ता सारखे कधीही जावून कपडे आणायची परवानगी व पर्वणीही नव्हती. आई मंडई मधून चुरमुरे व पुढे रविवार पेठेतून चिवडा तसेच इतर दिवाळी पदार्थ बनविण्यासाठी सामान आणायची. दिवाळी पदार्थ रेडीमेड आणायची पद्धत नव्हती. आईच्या हातच्या पदार्थांचा एक वेगळाच स्वाद होता, मायेचा ओलावा होता. जेमतेम आर्थिक परिस्थिती आई सर्व खर्चाचे नियोजन कसे करायची तीच जाणे. दिवाळी पदार्थ बनवायला सुरुवात झाली की वाड्यातील प्रत्येक घरातून वेगवेगळ्या पदार्थांचा गंध यायला लागायचा. बायका घरात वासावरुन समजायच्या कोणाच्या कडे कोणता पदार्थ चालू आहे. बायका एकमेकींना मदतही करायच्या. दिवाळीच्या एखाद्या दुसर्‍या दिवस आधी नवीन कपडे आलेले असायचे. वाड्यात ते प्रत्येक घरात जावून दाखवायचा कार्यक्रम व्हायचा.  स्त्रियांची खरेदी व ती खरेदी एकमेकींना दाखविणे हा एक वेगळाच विषय, नव्हे वेगळे विश्व असायचे. वाड्यात विकायला आलेल्या विक्रेत्यापासून ते लक्ष्मी रोड वरील दुकानातील सेल् मधील खरेदी असा व्यापक विषय असायचा. फटाके  खरेदी हा पण स्वतंत्र विभाग असायचा. पुण्यात सारसबाग समोर फक्त फटाक्यांचे स्टॉल असायचे. फटाके सुद्धा ठराविक असायचे. लवंगी, पानपट्टी, मिरची,  नाग गोळी,  लक्ष्मी बॉम्ब,  सुतळी बॉम्ब,  चिमणी बॉम्ब, भुईनोळे , बाण यांचीच रेलचेल होती. टिकली रोल आणि पिस्तूल मिळाली तरी खूप भारी वाटायचे.  वाड्यात अभ्यंगस्नानासाठी पहाटेच नंबर लागायचे. पहाटे सर्वात पहिला फटाका कोण फोडतो यात शर्यत लागायची. थंडीने कुडकुडत असताना आई उटणे लावून गरम पाण्याने आंघोळ घालायची. मग नवीन कपडे घालून देवाला व घरातील मोठ्यांना नमस्कार करून फटाके उडवायला पळायचे. किल्ला ही तोपर्यंत तयार असायचा. फटाके उडवून झाले की घरी फराळ व्हायचा. मग आम्ही दिवसभर किल्ला, क्रिकेट,  पत्ते असा धुडगूस घालायला मोकळे. दिवाळीचे सर्व दिवस त्या त्या दिवसाच्या महत्वाप्रमाणे उत्साहात साजरा केला जायचा. वाड्यात मग एकमेकांची फराळाची ताटे एकमेकांत फिरायची. त्यात बरीच टीकाटिप्पणी व्हायची. पण एक वेगळीच गंमत व आपुलकी त्यात असायची. वडीलधारी मंडळी देवाला जावून यायची. बायकांच्या उत्साहाला तर पारावार नसायचा. दिवाळीचा शेवट दिवसात मग उरलेल्या फटाक्यांचे भस्म बनवायचे प्रकार चालायचे. किल्ल्या मधील बुरुज बॉम्ब लावून उडवून दिले जायचे.  पुण्यातील सर्व पेठांमध्ये एकच लगबग व उत्साह असायचा. पाहुणे घरी असतील तर मग मुलांचा प्रचंड धुडगूस चालायचा. दिवाळीचे दिवस सरले की मग मन उदास व्हायचे. प्रत्येकजण हळूहळू आपापल्या कामाला लागायचा. पाहुणे त्यांच्यात्यांच्या गावाला रवाना व्हायचे. 

आता मोबाईल आले. आता कोणाकडे यायची जायची गरज नाही. सर्व फोन कॉल,  video कॉल नाहीतर whatsapp मेसेज वर होवून जाते. महागाचे फटाके उडवून सुद्धा आत्ता तशी मजा नाही,  नव्हे फटाक्यांना आता बंदीच आहे. फराळाची ताटे आता सोसायटी संस्कृतीत फिरत नाहीत. घरात वडिलधारे नाहीत,  नवरा बायको दोघे नोकरीला. आता सुट्टी मिळवायची हेच मोठे दिव्य. चितळे कडून अथवा ओळखीच्या बाईकडून पदार्थ विकत आणले म्हणजे झाले. कपड्यांचे नावीन्य नाही कारण आता येता जाता कधीही अथवा ऑनलाईन सुद्धा आपण कधीही खरेदी करत असतो. सर्वांकडे आता लक्ष्मी आहे पण लहानपणच्या जुन्या फोटोमधील लक्ष्मीची  प्रसन्नता आताच्या डिजिटल फोटो मध्ये जाणवत नाही. आठवणीतील पुण्याची  दिवाळी अजूनही मनांत घर करून आहे.

ले. – जितेंद्र भूस

संग्राहक – श्री माधव केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments