सुश्री मंजुषा सुनीत मुळे
विविधा
☆ दिन दिन दिवाळी – भाग-1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
दिन दिन दिवाळी ।
गाई- म्हशी ओवाळी ।।
असं अगदी आनंदाने म्हणत, दिवाळीचं स्वागत करण्यासाठी अगदी घराबाहेरच्या गोठ्यापर्यंत जायचं, अशी एक छान “ अगत्यशील “ प्रथा आपल्याकडे आहे. आणि हा स्वागताचा दिवस म्हणजे “ वसुबारस “, ज्याला “ गोवत्सद्वादशी “ असेही म्हटले जाते. आपल्या शेतीप्रधान देशात गाई-गुरे-जनावरे यांना रोजच्या आयुष्यातच अतिशय महत्वाचे स्थान आहे. त्या सर्व गोधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अशी “ गोधनपूजा “ ही प्राधान्याने केली जाणारी पूजा. बैलपोळा खास बैलांच्या पूजेसाठी असतो, तशी वसुबारस खास गाईंच्या पूजेसाठी. आता काही ठिकाणी स्वतःला जगतांना उपयोगी पडणाऱ्या इतर काही प्राण्यांचीही पूजा केली जाते. यादिवशी घरोघरी दारात, अंगणात रांगोळी काढून दिवाळीची जणू पूर्वतयारी केली जाते.
पौराणिक कथेनुसार, देव आणि दानवांनी केलेल्या समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून पाच कामधेनू बाहेर आल्या होत्या. त्यापैकी “ नंदा “ नामक कामधेनूसाठी वसुबारसेचे व्रत अंगिकारले जाते. यादिवशी गो -वासराची मनोभावे पूजा केल्याने अनेक जन्मांच्या कामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. आजच्या काळाचा विचार करता, कृषी-उत्पादन भरघोस आणि दर्जेदार व्हावे, उत्तम दूधदुभते उपलब्ध व्हावे आणि त्यायोगे मुलाबाळांना चांगले आरोग्य आणि सुख लाभावे, अवघा देशच धनधान्यसमृद्ध व्हावा, अशी कामना मनी बाळगून सर्वांनीच गाई-वासराची प्रतीकात्मक का होईना, पण कृतज्ञतापूर्वक पूजा करणे संयुक्तिक ठरणारे आहे. आता प्रत्येकाच्या घरी गाय पाळणे दुरापास्तच आहे. त्यामुळे अनेक घरात रांगोळीने किंवा तांदुळाने पाटावर गायीचे चित्र रेखाटून, किंवा मातीच्या बनवलेल्या प्रतिमा आणून ही पूजा करतात. दिवाळीचे स्वागत करण्यासाठी, एरवी सतत बंद असलेली, आणि घराची बेल वाजल्यानंतर ‘ कोण आहे ‘ असं त्रासिकपणे विचारून, किँवा की-होलमधून बघून, आत बोलावण्यास हरकत नाही याची खात्री करून उघडली जाणारी हल्लीच्या घरांची दारे, यादिवशी मात्र सताड उघडी ठेवली जातात, म्हणून ही “ अगत्यशील प्रथा “ आहे असे आवर्जून म्हणावेसे वाटते. आणि अर्थातच सर्वात महत्वाचे म्हणजे, पूजा करण्याची पद्धत, किंवा पूजासामग्रीतला नेमकेपणा , यापेक्षा पूजा किती श्रद्धेने, आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा मूळ उद्देश लक्षात ठेवून केली जाते, हे सर्वात जास्त, किंबहुना हे एवढेच महत्वाचे असते. बरोबर ना ?
या अनुषंगाने असा विचार मनात येतो की, अशा सणाच्या निमित्ताने सगळं कुटुंब, आप्तेष्ट प्रत्यक्ष किंवा आजकाल निदान virtually तरी आवर्जून एकत्र येतात, काहीवेळ एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेतात, एकमेकांची आस्थेने चौकशी करतात, आणि हा सणांचा मोठाच फायदा सगळ्यांनाच होतो, हे अगदी १००% खरे आहे. पण इतके सारे सण साजरे करण्याची सुरुवात फक्त याच उद्देशाने झाली असावी, असे मात्र नक्कीच वाटत नाही. सण साजरा करण्याचे हे सगळे ancillary किंवा complementary फायदे आहेत, हे सुजाण माणसांनी नक्कीच ध्यानात ठेवायला हवे. याचं कारण असं की, आपल्या प्रत्येक श्वासात, रोजच्याच जगण्यात, अर्थार्जनाच्या आणि इतर प्रत्येकच कामात, अनेक सजीव तसेच निर्जीव वाटणाऱ्या गोष्टींचा महत्वाचा हातभार अतिशय गरजेचा असतो, हे सत्य कुणालाच नाकारता येणार नाही. आणि अशा सर्व गोष्टींबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आपल्या बहुतेक सर्व सणांचे आणि उत्सवांचे प्रयोजन विचारवंत आणि ज्ञानी सत्पुरुषांनी खूप पूर्वीपासूनच केलेले आहे. त्यामुळे नेमकी तेवढीच भावना वगळून, बाकी सगळे आनंदाने साजरे करणे, म्हणजे सण साजरा झाला का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःलाच विचारायला हवा—- प्रत्येक सण साजरा करतांना— आणि आता हाच विचार मनात ठेऊन दिवाळीच्या दुसऱ्या दिवसाकडे वळू या.
“धनत्रयोदशी “ – धनतेरस -. हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्वाचा असतो, कारण यादिवशी त्यांच्या हिशोबाच्या नव्या वह्यांची साग्रसंगीत पूजा करून त्यांचा वापर करण्यास ते सुरुवात करतात — हिशोबाच्या वह्या म्हणजे, ते कुठल्या दर्जाचे जीवन जगू शकतील हे दाखवणारे अदृश्य आरसेच–महत्वाचे मार्गदर्शक- त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून वापरण्याआधीच त्यांची पूजा. काही ठिकाणी याच दिवशी धनाची आणि लक्ष्मीची पूजाही केली जाते. दागिने -कपडे -नवीन वस्तू खरेदी करायला हा दिवस म्हणजे एक हुकमी कारण.
हा दिवस आणखी एका कारणाने शेतकरीवर्गातही साजरा केला जातो. त्यांच्यासाठी ‘ धान ‘ म्हणजे स्वतःच्या शेतात पिकलेले धान्य, हे त्यांचे धनच असते. म्हणून यादिवशी घरात आलेल्या धान्याची तर ते मनोभावे पूजा करतातच, पण त्याच्या जोडीने शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या अवजारांचीही कृतज्ञभावनेने पूजा करतात.
या दिवसाला “ धन्वंतरी जयंती “ असेही म्हटले जाते, आणि पौराणिक कथांनुसार यामागची प्रचलित कहाणी अशी आहे की—— देव- दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून देवी लक्ष्मीच्या पाठोपाठ, हातात अमृतकुंभ घेऊन श्री धन्वंतरी प्रकटले. भगवान विष्णूंचा अवतार समजले जाणारे धन्वंतरी सर्ववेदविद्यापारंगत, मंत्र-तंत्रांचे जाणकार तर होतेच , आणि त्यांच्या अलौकिक सामर्थ्यामुळे, त्यांनी अमृतरूपाने देवांना अनेक औषधींचे सार प्राप्त करून दिले होते. म्हणूनच की काय, बऱ्याच दवाखान्यांमध्ये, अगदी मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्येही श्रीगणेशाच्या जोडीने धन्वंतरीची, एका हातात कलश असलेली चतुर्भुज मूर्ती, सहजपणे दिसेल अशी, अगदी मापाची काचेची उभी पेटी तयार करून, त्यात ठेवलेली हमखास पहायला मिळते. या दिवशी ईशान्य दिशेला तोंड करून भगवान धन्वन्तरींची प्रार्थना केल्यास दीर्घायुष्य प्राप्त होते, असेही मानले जाते.
यादिवशीपासून घराभोवती, घरासमोर सगळीकडे भरपूर पणत्या, आकाशकंदील लावून सर्व परिसर लखलखीत प्रकाशाने उजळून टाकला जातो. घर आणि घराचा परिसर जसा प्रकाशमान– अंधःकारहीन होतो, तशी त्या घरातल्या माणसांची मनेही तेवढ्या काळापुरती का होईना, दुःख – चिंता -यातना – वेदना, तसेच राग, मत्सर, हेवेदावे, दुस्वास, तुलना, अशासारख्या सगळ्या नकारात्मक भावनांना विसरून, निखळ आनंदाच्या प्रकाशाने उजळून जावीत, हाच त्या इतक्या सगळ्या पणत्या लावण्यामागचा हेतू असायला हवा.
पुराणांमध्ये या लखलखाटाचे कारण सांगणारीही एक गोष्ट आहे — एका राजपुत्राचा सोळाव्या वर्षी अकाली मृत्यू होईल, आणि तोही त्याच्या लग्नानंतरच्या चौथ्या दिवशी, असे भविष्य वर्तवलेले असते. त्यादिवशी त्याची नववधू त्याच्या अवतीभवती आणि महालाच्या प्रवेशद्वारात सोन्याचांदीच्या मोहरांची रास ठेवते, आणि मग महालात मोठमोठे दिवे लावून लखलखीत प्रकाश केला जातो, आणि राजपुत्राला जागे ठेवले जाते. रात्री यमाने सर्परुपात महालात प्रवेश केल्यावर तिथल्या लखलखीत प्रकाशाने डोळे दिपल्यामुळे त्याला काहीच दिसत नाही, आणि तो यमलोकात परत जातो. राजपुत्राचा प्राण वाचतो.
एकूण लक्षात घेण्यासारखे काय, तर ज्ञानाचे – सारासार विचारांचे – योग्य आणि आवश्यक तितक्या प्रयत्नांचे – सहभावनांचे, सद्भावनांचे आणि सकारात्मक विचारांचे अनेक दीप प्रत्येकाने नंदादीपासारखे स्वतःच्या मनात सतत आणि श्रद्धेने तेवते ठेऊन, अंध:कारजनक नकारात्मक भावना त्याच वातीने फटाक्यांसारख्या पेटवून संपवून टाकून, मन निर्मळ निर्व्याज आनंदाने सतत लखलखते ठेवले, तर आयुष्यात फक्त चारच दिवस नाही, तर रोजच दिवाळी साजरी होईल यात शंकाच नाही.
क्रमशः ….
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈