सौ राधिका भांडारकर
मनमंजुषेतून
☆ संकेत आनंदाचा…. ☆ सौ राधिका भांडारकर ☆
तेव्हां आम्ही धोबी गल्लीत रहात होतो.आमचं एक माडीचं घर होतं.तसं मोठं होतं पण खालच्या मजल्यावर दोन खणी घरात भाडोत्री होते. गद्रे आणि मोहिले. तशी गल्लीत नऊ दहाच घरं होती. काही बैठी काही एक मजली. एकमेकांना चिकटून. गुण्या गोविंदाने रहात होती.
तसे किरकोळ वाद ,भांडणं ,जळुपणा होता. पण किरकोळच. बाकी गल्लीतली सलाग्रे, मथुरे, मुल्हेरकर,दिघे,आब्बास, वायचळ ही मंडळी म्हणजे एक संपूर्ण कुटुंब होतं.सर्वधर्मीय,सर्वसमावेशक. आम्ही घराघरातील सगळीच मुले एकत्र वाढलो ,खेळलो, बागडलो.एकमेकांच्या घरातलं भुकेच्या वेळी मनमुराद खाल्लं. कुठलाही सण असो,एकत्रच साजरा केला. ईद,नाताळ, दिवाळी सारेच. ईदची खीरकुर्मा, नाताळचा केक,आणि दिवाळीचे करंजी लाडू सगळ्यांचा आनंद लुटला….
आजही त्या सणांच्या आठवणी मनाच्या कप्प्यात तितक्याच टवटवीत आहेत..
दिवाळी तर गल्लीतला सर्वात मोट्ठा सण !! कधी परिक्षा संपतात, आणि दिवाळीची मज्जा लुटतो अस्सं होऊन जायचं!!
जैन मंदीरात जाऊन संगमरवरी दगडाचे तुकडे गोळा करायचे.लपत छपत घरी आणायचे ,कुटायचे ,गाळायचे आणि वस्त्रगाळ पांढरी शुभ्र रांगोळी बनवायची.तांदळाची कांजी बनवायची- कंदील करायला. दुकानात जाऊन काठ्या, रंगीत जीलेटीन पेपर्स, सोनेरी, चंदेरी कागद आणायचे.आणि सगळ्यांनी मिळून घरोघरीचे कंदील बनवायचे. दिलीप ,शरद,हे मुख्य कलाकार.आम्ही मदतनीस. भांडणेही व्हायची पण गंमत कमी नाही झाली.
पेटत्या उदबत्तीच्या टोकाने, ठिपक्यांच्या रांगोळीसाठी कागदावर आखून भोके पाडायची.
फराळ तर मिळूनच व्हायचा.आज काय मुल्हेरकरांच्या चकल्या, नाहीतर मथुर्यांकडे करंज्या…कुणाचा चिवडा कुणाची शेव..सामुदायिक मान मोडून केलेला फराळ..
अवीट गोडीचा अन् चवीचा..
मृदुला रांगोळ्या काय मस्त काढायची…घरोघरी तिला डिमांड….कुठे बदकाची, कुठे मोराची….गल्लीत रांगोळ्यांचं प्रदर्शनच व्हायचे….अभ्यंग स्नानाने सारी गल्ली सुस्नात व्हायची…धनाची पूजा..राक्षस म्हणून पायाखाली चिरडलेलं ते सांकेतिक चिराटं….ईड जावो, पीडजावो..सारे सुखी राहो..ही काळोखातच काठी आपटून केलेली प्रार्थना घरोघरी घुमायची..
रात्री तर सारी गल्ली पण त्यांच्या मंद प्रकाशात उजळून जायची….फटाक्यांचीही आतषबाजी असायचीच….
अशी खूप सुंदर दिवाळी..नव्या वस्त्रांची ,नव्या रंगांची, निर्मळ प्रकाशाची…ना कसाला देखावा,ना चढाओढ…निव्वळ आनंद..सणाचा सांकेतिक सामुदायिक उत्सव…
काळ बदलतोच. काळाबरोबर कल्पना बदलणारच. जे काल होतं ते आज कसं असणार…जीवनाची गतीच वाढली..पराकोटीच्या तांत्रिक विकासाने जग जवळ आले. पण आत्मे विखुरले..,रेडीमेडचा जमाना आला.आयता फराळ,आयत्या रांगोळ्या..आयते कंदील..पारंपारिक सण आजही धूमधडाक्यात होतातच….मला ” ,पण..”घालून काही भाष्य नाही करायचय्..सगळ्या नव्याचं स्वागतच आहे…
नवं जपताना जुनं चांगलं राखावंं…परंपरेतलं मूळ आणि उद्देश सांभाळावे. अतिरेक टाळावा. आनंद जपावा..पर्यावरण जपावेच..सृष्टीचेही आणि नात्यांचेही…
शुभ दीपावली…!!
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈