श्री अरविंद लिमये
जीवनरंग
☆ सांदीकोपरे ☆ श्री अरविंद लिमये ☆
एक व्यक्तिमत्त्व विकास शिबीर.दीदींनीच आयोजित केलेलं.प्रत्येकाने आपापलं होमवर्क वाचून दाखवून त्यावर चर्चा करण्याचं आजचं सत्र. ‘गतायुष्यातले असमाधानाचे प्रसंग आणि त्यांचं विश्लेषण’ हा होमवर्कचा विषय.
“मृणालिनीs”
दीदींनी नाव पुकारलं.मृणालिनी अस्वस्थ.कांहीशी गंभीर. शेजारीच बसलेल्या ओंकार कडे,तिच्या नवऱ्याकडे पहाणारी तिची चोरटी नजर.
“ओंकार,समजव बरं तिला.ती तुलाच घाबरतीय बहुतेक”.दीदी हसत म्हणाल्या. ओंकारने नजरेनेच तिला दिलासा दिला.ती उठली.दीदींनी पुढे केलेले कागद थरथरत्या हातात घेऊन सर्वांसमोर उभं राहून ते वाचताना ती भूतकाळात हरवली….
सुखवस्तू, प्रेमळ आईबाबांची ती मुलगी. सश्रध्द विचारांच्या संस्कारात वाढलेली. माहेरी कर्मकांडांचं प्रस्थ नव्हतं.तरी रोजची देवपूजा, कुलाचार, सणवार हौसेने साजरे व्हायचे.पण सासरी..?
तिचे सासरे स्वत: इंजिनिअर. स्वत:चं वर्कशाॅप नावारुपाला आणलेलं. ओंकार इंजिनिअर होताच आता सर्व सूत्रं त्याच्याकडे.ओंकारचे कामाचे व्याप वाढत असतानाच त्याचं लग्न झालं. सासरघरची गरज म्हणून मृणालिनीने तिची आवडती नोकरी सोडली. पूर्णवेळचं गृहिणीपद स्विकारलं.तशी कुठलीच गोष्ट मनात घट्ट धरुन ठेवणारी ती नव्हतीच.सासू-सासरे दोघेही नास्तिक. त्यामुळे त्यांचाच (आणि अर्थात ओंकारचाही)हट्ट म्हणून त्याचं लग्न रजिस्टर पध्दतीनेच झालेलं.तेव्हाही तिने स्वतःच्या हौशी स्वभावाला मुरड घातली. सगळं आनंदाने स्विकारलं.
तरीही इथे रोजची देवपूजा नसणंच नव्हे तर घरी देवाचा एखादा फोटोही नसणं तिच्या पचनीच पडायचं नाही. अंघोळ करुनही तिला पारोसंच वाटायचं.
“आपण एक देव्हारा आणू या का छानसा?”ओंकारला तिने एकदा सहज विचारलं.
“भलतंच काय गं?आईदादांना आवडणार नाही आणि मला तर नाहीच नाही.” थप्पड मारल्यासारखी ती गप्प बसली.त्या चुरचुरणाऱ्या ओरखड्यावर तिने स्वतःच फुंकर घातली.
बंगल्याभोवतीची बाग मग तिने नियोजन करुन आकाराला आणली.छान फुलवली.त्या बागेतल्या झोपाळ्यावर घटकाभर शांत बसलं की तिला देवळात जाऊन आल्याचं समाधान मिळायचं.तिचा छोटा सौरभ तर या बागेत हुंदडतच लहानाचा मोठा झालाय.
घर, संसार सांभाळताना तिने अशा तडजोडी केल्या ते आदळआपट करुन देवपूजेचं समाधान मिळणार नाहीच या समंजस विचारानेच.पण गेल्या वर्षीचा तो प्रसंग घडला आणि…
मृणालिनी वाचत नव्हतीच.जणू स्वतःशीच बोलत होती.
‘सौरभ जन्माला आला तेव्हापासून एक हौस आणि संस्कार म्हणून त्याच्या मुंजीचं स्वप्न मी मनाशी निगुतीनं जपलं होतं.त्याला आठवं लागताच उत्साहाच्या भरात मी आईदादांसमोर विषय काढला. आईंनी चमकून दादांकडे पाहिलं आणि दादा आढ्याकडे पहात बसले. त्यांची ही नि:शब्द, कोरडी प्रतिक्रिया मला अनपेक्षित होती.
“तू ओंकारशी बोललीयस का?त्याच्याशी बोल आणि ठरवा काय ते”.
रात्री ओंकारकडे मुंजीचा विषय काढला.माझा उत्साह पाहून तो उखडलाच. ‘मुंजीचं खूळ डोक्यातून काढून टाक’ म्हणाला. ‘त्याची कांहीएक आवश्यकता नाहीs’असं ठामपणे बजावलंन्. आणखीही बरंच कांही बोलत राहिला.मला वाईट वाटलं. त्याचा रागही आला.मन असमाधानाने, दु:खातिरेकाने भरुन गेलं. टीपं गाळीत ती अख्खी रात्र मी जागून काढली.
या घटनेला एक वर्ष उलटून गेलंय.या होमवर्कच्या निमित्ताने याच प्रसंगाकडे मी तटस्थपणे पहातेय. मला जाणवतंय की ती रात्रच नव्हे तर पुढे कितीतरी दिवस मी अस्वस्थच होते. कुणीतरी आपलं हक्काचं असं कांहीतरी हिसकावून घेतलंय ही भावना मनात प्रबळ होत गेली होती.
आज मी मान्य करते की माझ्या असमाधानाला फक्त ओंकारच नाही,तर मीच कणभर जास्त जबाबदार आहे.ओंकारने सांगायचं आणि मी हो म्हणायचं ही सवय मीच त्याला लावली होती. मलाही मन आहे,माझेही कांही विचार,कांही मतं असू शकतात हे मला तरी इतकं तीव्रतेने जाणवलं कुठं होतं?सौरभच्या मुंजीला ओंकारने नकार दिला आणि माझा स्वाभिमान डिवचला गेला. हे सगळं नंतर मी कधीच ओंकारजवळ व्यक्त केलं नाही.करायला हवं होतं. ते ‘बरंच कांही’ अव्यक्तसं मनाच्या सांदीकोपऱ्यात धुळीसारखं साठून राहिलंय.आज मनातली ती जळमटं झटकून टाकतेय….!
ओंकार,खरंच खूप कांही दिलंयस तू मला.पण ते देत असताना त्या बदल्यात माझं स्वत्त्व तू स्वत:कडे कसं न् कधी गहाण ठेवून घेतलंस समजलंच नाही मला.त्या रात्री तुझ्या प्रत्येक शब्दाच्या फटकाऱ्यांनी तू मला जागं केलंयस.
आपल्या घरात देव नव्हते.आईदादांनी तुला दिलेला त्यांच्या नास्तिकतेचा हा वारसा. आस्तिक असूनही मी तो स्विकारला.माझ्या आस्तिकतेचे देव्हारे मात्र मी कधीच मिरवले नाहीत. पण तुमच्या लेखी या सगळ्याला किंमत होतीच कुठे?
माझी एकच इच्छा होती. सौरभची मुंज करायची.योग्य ते संस्कार योग्यवेळीच करायचे. त्याच्या जन्मापासून मनात जपलेली एकुलत्या एका मुलाच्या मुंजीतल्या मातृभोजनाची उत्कट असोशी.तू खूप दिलंस रे मला पण ही एवढी साधी गोष्ट नाही देऊ शकलास.तू मला झिडकारलंस. ‘असल्या थोतांडावर माझा विश्वास नाही’ म्हणालास. मग माझ्या विश्वासाचं काय? ‘तो माझा एकुलता एक मुलगा आहे आणि त्याच्या बाबतीत मी म्हणेन तसंच होणार’ एखाद्या हुकूमशहासारखं बजावलं होतंस मला.मग सौरभ माझा कोण होता रे?माझाही तो एकुलता एक मुलगाच होता ना?पण तू त्याच्या संदर्भातला माझ्यातल्या आईचा हा एवढा साधा अधिकारही नाकारलास. तुझं ते नाकारणं बोचतंय मला.एखाद्या तीक्ष्ण काट्यासारखं रुतलंय ते माझ्या मनात…’
आवाज भरुन आला तशी मृणालिनी थांबली.शब्द संपले. संवाद तुटला.पण आवेग थोपेनाच.ती थरथरत तशीच उभी राहिली क्षणभर.तिच्या डोळ्यातून झरझर वहाणारे अश्रू थांबत नव्हते.दीदीच झरकन् जागेवरून उठल्या आणि तिला आधार द्यायला पुढे झेपावल्या. पण त्यापूर्वीच कसा कुणास ठाऊक पण ओंकार पुढे धावला होता. त्याचे डोळेही भरुन आले होते.ते अश्रूच जणू मृणालिनीचं सांत्वन करत होते…!
त्या सांत्वनाने तिच्या मनातल्या सांदीकोपऱ्यातली
धूळ आणि जळमटं
कधीच नाहीशी झाली होती..!!
©️ अरविंद लिमये
सांगली
(९८२३७३८२८८)
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈