श्री सुहास रघुनाथ पंडित
१२ नोव्हेंबर – संपादकीय
आज बारा नोव्हेंबर. मराठी साहित्यातील दोन ज्येष्ठ साहित्यिकांचा आज स्मृतीदिन आहे तर एका ज्येष्ठ साहित्यिकाचा आज जन्मदिवस आहे. आज त्यांच्या साहित्य सेवेबद्दल जाणून घेऊया.
रावबहादूर विष्णू मोरेश्वर महाजनी हे मागच्या पिढीतले चतुरस्त्र साहित्यिक. त्यांचा जन्म 12/11/1851चा. त्यांचे शालेय शिक्षण धुळे व महाविद्यालयीन शिक्षण डेक्कन काॅलेज, पुणे येथे झाले. पुढील काळात त्यांनी एज्युकेशन इन्स्पेक्टर या पदावरून नोकरीला सुरूवात केली व डायरेक्टर ऑफ एज्युकेशन या उच्च पदावरून ते निवृत्त झाले. या सर्व कालावधीत त्यांच्यातील साहित्यिक , लेखक अखंडपणे कार्यरत होता. त्यांनी कादंबरी, कविता, नाटक, समीक्षा, चरित्रलेखन , प्रवासवर्णन तर केलेच. पण याशिवाय अर्थशास्त्र, इतिहास, राजकारण,
शिक्षणशास्त्र या विषयांवरही मार्मिक समीक्षात्मक लेखन केले आहे. वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी ज्ञानसंग्रह या नावाचे मासिक काढून ते काही वर्षे चालवले. व-हाड शाला-पत्रक हे मासिकही काही वर्षे चालवले.
त्यांची काही महत्वाची साहित्य संपदा अशी:
कुसुमांजली(भाषांतरीत कवितांचा संग्रह), डेक्कन काॅलेजच्या आठवणी, रामायणकालीन लोकस्थिती हा निबंध, तारा, मोहविलसित आणि वल्लभानुनय ही तीन नाटके. ही तीन नाटके म्हणजे शेक्सपियरच्या तीन नाटकांची भाषांतरे आहेत.
( अनुक्रमे सिंबेलाईन, द विंटर्स टेल, ऑल वेल दॅट एन्डस वेल , )
1907 च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. जळगाव येथील कविसंमेलनातील ‘ कवी आणि काव्य’ हे त्यांचे व्याख्यान खूप गाजले. आत्मपर भावकविता मराठीत आणण्याचे श्रेय श्री. महाजनी यांना जाते.
अशा या चतुरस्त्र साहित्यिकाचा 1923 मध्ये मृत्यू झाला. त्यांच्या स्मृतीस वंदन !
☆☆☆☆☆
मोहन आपटे :
एकीकडे भौतिकशास्त्राची पदवी आणि त्याच वेळेला चित्रकला, काव्य एवढेच नव्हे तर कुस्तीचीही आवड असे अजब रसायन म्हणजे मोहन आपटे. मुंबईतील सोमाणी महाविद्यालयात भौतिक शास्त्राचे अध्यापन करणारे मोहन आपटे एक उत्तम साहित्यिकही होते. त्यांचे लेखन हे विज्ञान संबंधी असले तरी सोपे करून सांगण्याच्या भाषावैशिष्ट्यामुळे हे सर्व लेखन लोकप्रिय झाले. त्यांनी अवकाशशास्त्र, भौतिकशास्त्र, शरीरशास्त्र,
संगणक, गणित, इतिहास, निसर्ग अशा विविध विषयांत लेखन केले आहे. त्यांची इंग्रजी भाषेतही नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विज्ञान विषयी जागृती करण्यासाठी त्यांनी लेखन, व्याख्याने व प्रदर्शने यांचे आयोजन केले. ‘मला उत्तर हवंय’ ही 11 पुस्तकांची विज्ञान शंका निरसन मालिका सुरू करून जनजागृती घडवली. भास्कराचार्यांचे संस्कृत श्लोक, गणिती सूत्रे, सोप्या मराठीत उपलब्ध करून दिली. त्यांची 75 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यातील काही :— अग्निनृत्य, अण्वस्त्रांचा मृत्यूघोष, आकाशगंगा, आपली पृथ्वी, डळमळले भूमंडळ, निसर्गाचे गणित, स्मरणशक्ती कशी वाढवावी इ. इ. इ.
त्यांच्या कार्याबद्दल त्यांना खगोल मंडळ मुंबई यांचेकडून पहिला भास्कर पुरस्कार 2005 साली मिळाला. तसेच महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कारही मिळाला आहे. ते जनसेवा समिती, मराठी विज्ञान परिषद, लोकमान्य सेवा संघ, अ. भा. विद्यार्थी परिषद अशा विविध सामाजिक संस्थांशी निगडीत होते. अशा या अष्टपैलू साहित्यिकाचे 2019 मध्ये निधन झाले. त्यांना आदरांजली.
☆☆☆☆☆
रावसाहेब कसबे :
आंबेडकरवादी विचारांचा स्विकार करून आपल्या लेखनातून ते मांडणारे ज्येष्ठ लेखक श्री. रावसाहेब कसबे यांचा दि 12/11/1944 हा जन्मदिवस. त्यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
त्यांच्या ग्रंथसंपदेतील डाॅ. आंबेडकर आणि भारतीय घटना, आंबेडकर आणि मार्क्स, देशीवाद समाज व साहित्य, भक्ती आणि धम्म, रेषेपलीकडील लक्ष्मण, गांधी: पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा, झोत ही काही प्रसिद्ध पुस्तके. झोत या पुस्तकात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांची समीक्षा केली आहे.
त्यांना स्नेहबंध पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठान पुरस्कार, मिलिंद समता पुरस्कार, सुगावा पुरस्कार असे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 2014 मध्ये नाशिक येथे भरलेल्या अ. भा. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच 2015 मधील सम्यक साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष होते. म. सा. परिषद चे उपाध्यक्ष व अध्यक्षपद त्यांना लाभले होते.
त्यांच्या लेखन कार्यासाठी व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा !
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
साभार: विकीपीडिया, विकासपिडीया, मराठी विश्वकोश
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈