सुश्री मंजुषा सुनीत मुळे
१४ नोव्हेंबर – संपादकीय
आज १४ नोव्हेंबर :==
“ मुक्तपणा पूर्णपणे न उधळलेली लेखिका “ अशा शब्दात ज्यांचे वैशिष्ट्य सांगितले जायचे, त्या लेखिका श्रीमती पद्मजा फाटक यांचा आज जन्मदिन. ( १४/११/१९४२ – ६/१२/२०१४ ). वयाच्या २२-२३ व्या वर्षांपासून ‘ स्त्री ‘, ‘ वाङ्मयशोभा ‘ अशा तेव्हाच्या लोकप्रिय मासिकांमधून पद्मजाताईंनी लेखनास सुरुवात केली. आणि विविध प्रकारचे लेखन केले. त्यांनी वीसेक पुस्तके लिहिली, त्यातील काही सांगायची झाली तर — ‘ आवजो ‘ हे प्रवासवर्णन, ‘ चमंगख- चष्टिगो’, चिमुकली चांदणी ‘ असे बालसाहित्य, ‘ बापलेकी ‘ या नावाने संपादित आत्मकथने ज्यात अन्य दोन संपादिकांचाही सहभाग होता, ‘ बाराला दहा कमी ‘ या नावाने विज्ञानकथा, ‘ सोव्हेनियर ‘ आणि ‘ हॅपी नेटवर्क टु यू ‘ हे अमेरिकन जीवनावरील लेख, ‘ हसरी किडनी अर्थात ‘अठरा अक्षौहिणी ‘ ‘ हे आत्मकथन ज्यावर ‘ मजेत ‘ असे स्वतःचे टोपणनाव त्यांनी लिहिले होते, आणि या सगळ्याच्या जोडीने, ‘ गर्भश्रीमंतीचे झाड ‘, ‘ दिवेलागणी ‘, ‘ माणूस माझी जात ‘, ‘ राही ‘, अशी त्यांची बरीच पुस्तके प्रकाशित झालेली होती. ‘ पुरुषांच्या फॅशन्स ‘ या विषयावर स्त्री मासिकासाठी त्यांनी केलेले लेखन विशेषत्वाने सांगायला हवे. या वैविध्यपूर्ण साहित्यिक मुशाफिरीसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे ५ पुरस्कार, इतर अनेक पारितोषिके, सन्मान, शिष्यवृत्ती असे गौरव प्राप्त झाले होते. ‘ बाराला दहा कमी ‘ ही विज्ञानकथाही विशेष पुरस्कारप्राप्त ठरली होती.
याच्या जोडीनेच, दूरदर्शनवरील “ सुंदर माझं घर “ आणि “ शरदाचं चांदणं “ या कार्यक्रमाच्या निवेदिका म्हणूनही त्यांनी काम केले होते.
श्रीमती पद्मजा फाटक यांना आजच्या त्यांच्या जन्मदिनी मनःपूर्वक प्रणाम
☆☆☆☆☆
बालसाहित्यिक, सामाजिक आणि ऐतिहासिक कादंबरीकार, कथाकार, व्याख्याते, संपादक, मुद्रक, प्रकाशक अशा विविध भूमिका समर्थपणे पेलत ख्यातनाम झालेले लेखक श्री. — नारायण हरी तथा ना. ह.आपटे यांचा आज स्मृतीदिन. ( ११/७/१८८९ – १४/११/१९७१ )
काही ऐतिहासिक आणि इतर सामाजिक, अशा जवळपास ६० कादंबऱ्यांसह श्री आपटे यांची ग्रंथ-संपदा सुमारे १०० इतकी लक्षणीय आहे. काहीही झाले तरी इंग्रजांची नोकरी करायची नाही, या निश्चयाने त्याकाळी ज्या काही लोकांनी इतर कामं करून हिम्मतीने संसार केला त्यापैकी, केवळ लिखाण करून संसार केलेले श्री आपटे हे एक होते.
अजिंक्यतारा, संधीकाळ, लांच्छित चंद्रमा, राजपूतांचा भीष्म , या त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष उल्लेखनीय ठरल्या. त्यांनी लिहिलेल्या सामाजिक कादंबऱ्याही खूप प्रसिद्ध झाल्या होत्या– न पटणारी गोष्ट, उमज पडेल तर, एकटी, सुखाचा मूलमंत्र, गृहसौख्य, पहाटेपूर्वीचा काळोख, आम्ही दोघे ( ते आणि मी ), ही त्यापैकी काही ठळक उदाहरणे. आराम-विराम, बनारसी बोरे हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध होते. लेखन कुठल्याही प्रकारचे असले तरी लिखाणाच्या शैलीतील प्रासादिकता आणि प्रसन्नता हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आयुष्याचा पाया, गृहसौख्य, अशा पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी संसारसुखाचे मूलभूत सिद्धांत, वैवाहिक नीती, तरुण विद्यार्थ्यांचे आदर्श वर्तन, अशा विषयांवर विचारपूर्ण सखोल विवेचन केलेले होते.
जरठ-कुमारी विवाह ही त्या काळातली ज्वलंत समस्या मांडणारा, आणि अत्यंत गाजलेला “ कुंकू “ हा ‘ प्रभात ‘ ने काढलेला सिनेमा श्री आपटे यांच्या “ न पटणारी गोष्ट ‘ या कादंबरीवर आधारलेला होता. तसेच, त्यांच्या ‘ भाग्यश्री ‘ कादंबरीवरून ‘ अमृतमंथन ‘ हा चित्रपट, ‘ राजपूत रमणी ‘ वरून त्याच नावाने काढलेला चित्रपट, ‘ पाच ते पाच ‘ या कथेवरून ,१९४२ च्या चळवळीतील भूमिगत क्रांतिकारकांचे खडतर साहसी जीवन दाखवणारा ‘ भाग्यरेखा ‘– हे सिनेमे निर्मिलेले होते. या वरून त्यांच्या लेखनातील सकसपणा आणि प्रभावीपणा ठळकपणे दिसून येतो. ‘ न पटणारी गोष्ट ‘ या कादंबरीचा, १९८६ साली महाराष्ट्र टाईम्सच्या सर्वोत्कृष्ट पुस्तकांच्या यादीत समावेश केला गेला होता.
लेखनाबरोबरच त्यांचे आणखी कार्यकर्तृत्व असे— ‘ किर्लोस्कर खबर ‘ चे ते पहिले उपसंपादक होते. उद्यान, लोकमित्र, आल्हाद, या साप्ताहिकांचे, आणि मधुकर या मासिकाचे ते संस्थापक-संपादक होते. त्यांनी ‘ आपटे आणि मंडळी ‘ या नावाने प्रकाशनसंस्था सुरु केली होती, आणि त्यासाठी ‘ श्रीनिवास ‘ हा स्वतःचा छापखानाही सुरु केला होता.
१९३३ साली बडोदा इथे झालेल्या वाङ्मय – परिषदेच्या अधिवेशनाचे संमेलनाध्यक्ष, १९४१ साली पुण्यात झालेल्या शारदोपासक संमेलनाचे अध्यक्ष, १९६२ साली साताऱ्यात झालेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष ,– अशी महत्वपूर्ण पदे त्यांनी भूषवलेली होती.
“ ना. ह. आपटे –व्यक्ती आणि वाङ्मय “ या पुस्तकाद्वारे डॉ. सौदामिनी चौधरी यांनी त्यांचे हे चतुरस्त्र व्यक्तिमत्व शब्दांमधून रेखाटलेले आहे.
श्री. ना. ह. आपटे यांना आजच्या स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली.
☆☆☆☆☆
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈