श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

⭐  चि म टा ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“आई s s s गं ! किती जोरात चिमटा काढलास !”

काय मंडळी, आठवतंय का तुम्हांला उद्देशून कोणीतरी किंवा तुम्ही कोणाला तरी उद्देशून हे असं म्हटल्याचं ? माझ्या पिढीतील मंडळींना हे नक्कीच आठवत असणार ! कारण त्या काळी मुलं मुली शाळेत किंवा घरी, सारे खेळ एकत्रच खेळत होती. मुला मुलींची शाळा वेगवेगळी, ही कन्सेप्ट खूपच नंतरची. एखाद्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी खेळतांना काही कारणाने भांडण झालं, तर त्याची परिणीती फार तर फार दुसऱ्याला चिमटा काढण्यात व्हायची. अगदीच तो किंवा ती द्वाड असेल तर चिमट्या बरोबरच दुसऱ्याला बोचकरण्यात ! आत्ताच्या सारखी पाचवी सहावीतली मुलं, आपापसातल्या भांडणातून एकमेकांवर वर्गात चाकू हल्ला करण्यापर्यंत, तेंव्हाच्या मुलांची मानसिकता कधीच गेली नव्हती ! कालाय तस्मै नमः! असो !

तर असा हा चिमटा ! ज्याचा अनुभव आपण आपल्या लहानपणी कोणाकडून तरी घेतला असेल किंवा तसा अनुभव दुसऱ्या कोणाला तरी नक्कीच दिला असेल ! अगदीच काही नाही, तर आठवा शाळेत कधीतरी “गुरुजींनी” तुम्हांला “घरचा अभ्यास” पूर्ण न झाल्याने दंडाला काढलेला चिमटा ! तो “गुरुजींनी” काढलेला चिमटा एवढा खतरनाक असायचा की दुसऱ्या दिवशी सुद्धा ती चिमट्याची जागा ठुसठुसायची आणि काळी निळी पडायची ! आणि ही गोष्ट घरी कळली की दुसरा दंड पण घरच्या वडीलधाऱ्या लोकांकडून काळा निळा व्हायचा !  हल्लीच्या “सरांना” किंवा “मॅडमना” कुठल्याही यत्तेच्या मुलांना हात लावून शिक्षा करणे तर सोडाच, उंच आवाजात ओरडायची पण चोरी ! कारण उद्या त्या मुलांच्या “मॉम किंवा डॅडने” “प्रिन्सिपॉलकडे” तक्रार केली, तर “सरांना” किंवा “मॅडमला” स्वतःची मुश्किलीने मिळवलेली नोकरी गमवायची भीती ! तेंव्हाच्या “गुरुजींना” सगळ्याच मुलांच्या घरून, त्यांना वाटेल तसा त्यांच्या दोन्ही हातांचा, डस्टर, पट्टी किंवा छडी यांचा अनिर्बंध वापर करायचा अलिखित परवाना, “गुरुजी” म्हणून शाळेत नोकरीला लागतांनाच मिळालेला असायचा ! आणि या पैकी कुठल्याही गोष्टीचा यथेच्छ वापर करायला ते “गुरुजी” त्या काळी मागे पुढे पहात नसत.

 तारेवर ओले कपडे वाळत घालतांना ते वाऱ्याने पडू नयेत म्हणून, “हा चिमटा तुटला, जरा दुसरा दे !” असं आपण घरातल्या कोणाला म्हटल्याच बघा आठवतंय का ? (कधी अशी काम केली असतील तर ?) माझ्या लहानपणी लाकडाचे स्प्रिंग लावलेले चिमटे, अशा तारेवरच्या सुकणाऱ्या कपड्यांना लावायची पद्धत होती !  ते चिमटे तसे फार नाजूक असायचे. आता तुम्ही म्हणाल नाजूक चिमटे ? म्हणजे काय बुवा ! तर तुम्हांला लगेच कळणाऱ्या भाषेत सांगायचं तर, तरुणपणी जर तुम्ही प्रेमात पडला असाल(च)?आणि कधीकाळी तुमच्या प्रेयसीने तुम्हांला लाडात येवून प्रेमाने नाजूक चिमटा काढला असेल, तर तो आठवा, तेवढं नाजूक ! हे उदाहरणं लगेच पटलं ना ? ?पण ज्यांच्या नशिबात कांद्या पोह्याचा कार्यक्रम होऊन गळ्यात वरमाला पडली असेल त्यांनी आपल्या लग्नाचं फक्त पाहिलं वर्ष आठवून बघा ! तर लग्ना नंतरच्या पहिल्या वर्षातच बरं का, असा नाजूक चिमट्याचा आपल्याला हवा हवासा प्रसाद, आपापल्या बायकोने आपल्याला दिल्याचं बघा आठवतंय का ! मी फक्त पहिल्या वर्षातच असं म्हटलं, त्याला कारण पण तसं ठोस आहे. कसं असत ना, लग्ना नंतरचे नव्या नवलाईचे दिवस संपल्यावर, उरलेल्या वैवाहिक जीवनात बायकोकडून वाचिक चिमटे ऐकायची सवय नवरे मंडळींना करून घ्यावी लागते ! पण जसं जशी संसाराची गाडी पुढे जाते, तसं तसा या वाचिक चिमट्याचा त्रास, त्याची स्प्रिंग लूज झाल्यामुळे असेल कदाचित, पण नवरोबांच्या अंगावळणी पडतो एवढे मात्र खरे !?त्यामुळे अशा वाचिक चिमट्याचा पुढे पुढे म्हणावा तसा त्रास होतं नाही, नसावा !

तर मंडळी, पुढे पुढे हे त्या काळी वापरात असलेले लाकडी चिमटे जाऊन, त्याची जागा तारेच्या चिमट्याने घेतली.  तारेच्या म्हणजे, आतून तार आणि बाहेरून प्लास्टिकचे आवरण ! पण या चिमट्याचा एक ड्रॉबॅक होता. तो म्हणजे आतल्या तारेवरचे प्लास्टिकचे आवरण निघाले की त्याच्या आतली तार गंजत असे आणि त्यामुळे तो ओल्या कपड्यावर लावताच त्यावर डाग पडत असे. नंतर नंतर हे चिमटे पण वापरातून हद्दपार झाले आणि त्याची जागा निव्वळ प्लास्टिकने बनलेल्या, लहान मोठ्या आकाराच्या चिमट्याने घेतली, जी आज तागायत चालू आहे. माझ्या मते या पुढे सुद्धा तीच पद्धत अनंत काळ चालू राहील, हे आपण स्वतःच स्वतःला चिमटा न काढता मान्य कराल यात शंका नाही !?

मागे मी एका लेखात म्हटल्या प्रमाणे, विषय कुठलाही असला तरी त्यात नेते मंडळींचा उल्लेख असल्या शिवाय, तो लेख पूर्ण झाल्याच समाधान मला तरी मिळत नाही ! ?आता तुम्ही म्हणाल चिमट्याचा आणि नेते मंडळींचा संबंध काय ? तर तो असा, की पूर्वी जी खरोखरची विद्वान नेते मंडळी होऊन गेली, ती आपल्या विद्वताप्रचूर भाषणातून, आपापल्या विरोधी पक्षाच्या नेते मंडळींना चांगलेच शाब्दिक चिमटे काढीत ! तो तसा चिमट्याचा शाब्दिक मार, तेंव्हाच्या नेत्यांची कातडी गेंड्याची नसल्यामुळे, त्या काळी त्यांच्या खरोखरचं जिव्हारी लागतं असे ! गेले ते दिवस आणि गेले ते विद्वान नेते !

आपली मराठी भाषा कोसा कोसावर बदलते याचा अनुभव आपण कधी ना कधी घेतला असेलच. “अरे बापरे, पाणी उकळलं वाटतं ! जरा तो चिमटा बघू !” आता या वाक्यात आलेला चिमटा हा कोणत्या प्रकारात मोडतो हे आपल्या लगेच लक्षात यायला हरकत नाही ! म्हणजे काही महिला मंडळी ज्याला “सांडशी” किंवा “गावी” किंवा “पकड” म्हणतात त्यालाच काही काही महिला चिमटा असं पण म्हणतात !

“तू तुझ्या पोटाला कधी चिमटा काढून जगला आहेस का ?” असा प्रश्न आपण जर का आजच्या तरुण पिढीतल्या मुलांना किंवा मुलींना विचारला, तर ९९% तरुणाईच उत्तर असेल “मी कशाला माझ्याच पोटाला चिमटा काढायचा ? दुखेल ना मला ! पण हां, तुम्ही सांगत असाल तर मी दुसऱ्या कोणाच्या तरी पोटाला नक्कीच चिमटा काढू शकतो हं!” या अशा उत्तरावर, आपण माझ्या पिढीतील असाल तर नक्कीच खरोखरचा कपाळाला हात लावाल !

शेवटी, आपल्या सगळ्यांवरच या पुढे आपापल्या पोटाला कधीही चिमटा न काढता, सुखी आणि समाधानी आयुष्य व्यतित करायला मिळू दे, हीच त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि हे चिमटा पुराण आणखी चिमटे न काढता संपवतो !

ता. क. – वरील पैकी कुठल्याही “चिमट्याचा” कोणाला वैयक्तिक त्रास झाल्यास, त्याला लेखक जबाबदार नाही !

© श्री प्रमोद वामन वर्तक

०९-११-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments