सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 109 ?

☆ मला भेटलेली दुर्गा ☆

आजचा विषय खूपच चांगला आहे, मी खूप विचार केला आणि माझी दुर्गा मला माझ्या घरातच सापडली, होय मला भेटलेली दुर्गा  म्हणजे माझी सून सुप्रिया !

माझा मुलगा अभिजित चोवीस वर्षाचा झाल्यावर आम्ही त्याच्यासाठी मुली पहायला सुरूवात केली.

कारण त्याची बदली अहमदाबाद ला झाली होती आणि त्याच्या पत्रिकेत मंगळ असल्यामुळे आम्ही पत्रिका पाहून  लग्न करायचं ठरवलं होतं, म्हणजे आमचा थोडा फार ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे. सुप्रिया तशी नात्यातलीच, माझ्या चुलत बहिणीने तिला पाहिले होते आणि ती म्हणाली होती, ती मुलगी इतकी सुंदर आहे की तुम्ही नाकारूच शकत नाही. पण ती अवघी एकोणीस वीस वर्षांची होती आणि इंजिनिअरींगला होती, तिचं शिक्षण, करिअर… तिचे आईवडील इतक्या लवकर तिचं लग्न करतील असं वाटलं नाही!

पण सगळेच योग जुळून आले आणि खूप थाटामाटात लग्न झालं!पण सुरूवातीला अभिजित अहमदाबादला आणि ती पुण्यात आमच्या जवळ रहात होती कारण तिचं काॅलेज पुण्यात… ती लग्नानंतर बी.ई.झाली फर्स्ट क्लास मध्ये! काही दिवस जाॅब केला. अभिजितची अहमदाबादहून मुंबई ला आणि नंतर पुण्यात बदली झाली, दोघेही जाॅब करत होते नंतर प्रेग्नंट राहिल्यावर तिने सातव्या महिन्यात जाॅब  सोडला. नातू झाला. तिने तिच्या मुलाला खूप छान वाढवलं आहे, पाचव्या महिन्यात बाळाला घेऊन ती माहेरहून आल्यानंतर बाळाला पायावर अंघोळ घालण्यापासून सर्वच!थोडा मोठा झाल्यावर पुस्तक वाचायची सवय तिने त्याला लावली, तो आता तेरा वर्षाचा आहे सार्थक नाव त्याचं तो खूप वाचतो आणि लिहितो ही,अकरा वर्षाचा असताना त्याने एक कादंबरी लिहिली (फॅन्टसी) ती प्रकाशितही झाली आहे, अमेझाॅनवर! ते सर्व सोपस्कार त्याने स्वतः केले! नातू लेखक आहे, कविताही केल्यात त्याने, त्याचे श्रेय लोक मला देतात पण सार्थक ला वाचनाची गोडी सुप्रिया ने लावली आणि तिच्या स्वतःमध्ये ही लेखनगुण आहेत, तिच्या फेसबुकवरच्या पोस्ट (अर्थात इंग्रजी) वाचून कविमित्र लेखक श्रीनिवास शारंगपाणी म्हणाले होते, “तुमची सून चांगली लेखिका होईल पुढे”! खरंतर मी लग्नात तिचं सुप्रिया नाव बदलून अरुंधती  ठेवलं ते बुकर पुरस्कार विजेत्या अरुंधती राॅय च्या प्रभावानेच ! असो !

सुप्रिया (माझ्यासाठी अरुंधती) काॅन्व्हेन्ट मध्ये शिकलेली तरीही मराठीचा अभिमान असलेली,फर्डा इंग्लिश बोलणारी तरीही उगाचच इंग्रजीचा वापर न करणारी चांगली, स्वच्छ मराठी बोलणारी! सर्व प्रकारचा स्वयंपाक उत्कृष्ट करणारी, खूप चांगलं,सफाईदार ड्रायव्हिंग करणारी !

माझे आणि तिचे संबंध सार्वत्रिक सासू सूनांचे असतात तसेच आहेत, कुरबुरी, भांडण ही आमच्यातही झालेली आहेत, मुळात माझ्या सूनेने माझ्या अधिपत्याखाली रहावं अशी माझी कधीच इच्छा नव्हती, तिने तिच्या आवडी निवडी जपाव्या, स्वतःतल्या क्षमता ओळखून स्वतःचा उत्कर्ष करून घ्यावा अशीच माझी सूनेबद्दल भावना, अपेक्षा कुठलीही नाही!

मला ती दुर्गा भासली तो काळ म्हणजे कोरोना चा लाॅकडाऊन काळ! त्या काळात अभिजित सिंगापूर ला गेलेला, आम्ही सोमवार पेठेत आणि सुप्रिया सार्थक पिंपळेसौदागर येथे पण लाॅकडाऊन च्या काळात ती सार्थक ला घेऊन सोमवार पेठेत आली, कामवाली बंद केली होती, घरकामाचा बराचसा भार तिने घेतला, त्या काळात सार्थकनेही न सांगता भांडी घासली, खूपच सुसह्य झालं ती आल्यामुळे!

नंतर माझं मणक्याचं ऑपरेशन, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेली कोरोनाची लागण…. घरी गेल्यावर एका पाठोपाठ एक पाॅझीटीव्ह होत जाणं…. आम्हाला दोघांनाही तिनं हाॅस्पिटल मध्ये अॅडमीट करणं…. त्या काळातलं तिचं धीरोदात्त वागणं आठवलं की अजूनही डोळे भरून येतात, हे टाईप करतानाही अश्रू ओघळत आहेत, आमच्या नंतर, आम्ही हाॅस्पिटल मध्ये असताना,  ती आणि सार्थक पाॅझीटिव आले, काही दिवस ती घरीच क्वारंटाईन राहिली, दोन तीन दिवस तिचा ताप उतरेना मग ती सार्थकला  बरोबर घेऊन मंत्री हॉस्पिटल मध्ये अॅडमीट झाली तेव्हा तर ती झाशीची राणीच भासली, काही दिवस आगोदरच आम्ही मणिकर्णिका पाहिला होता ऑनलाईन, खूपजण म्हणतात ती “कंगना राणावत” सारखी दिसते! पण कंगना पेक्षा ती खूपच सुंदर आहे सूरत और सिरतमे!

लेख जरा जास्तच लांबला आहे. पण माझ्या कोरोना योद्धा सूनेबद्दल एवढं तरी लिहायलाच हवं ना अर्थात या लढाईत तिला तिच्या बहिणी आणि मेहुण्यांची महत्वाची साथ होती हे ही कृतज्ञतापूर्वक नमूद करते!

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Prabha Sonawane

धन्यवाद हेमंत सर ?