? वाचताना वेचलेले ??‍?

☆ द्रौपदीचा कृष्ण….गौरव गद्रे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

ती स्टेशनवर बाळाला दूध पाजत होती आणि लोक तिच्याकडे विकृत नजरेने पाहत होते, इतक्यात…

मुंबई, १० एप्रिल – जगात फार कमी लोकांमध्ये माणूसकी आहे असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे मुंबईच्या ट्रेनमध्येही अशी फार कमी माणसं आहेत ज्यांच्या चांगुलपणामुळे आपण कळत-नकळत खूप काही शिकत असतो. मी गौरव गद्रे आज तुम्हाला माझ्यासमोर घडलेल्या घटनेबद्दल सांगणार आहे. अगदी एका छोट्याशा कृतीमधूनही तुम्ही कसा बदल घडवू शकता हे मी त्या अनुभवातून शिकलो.

नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी मी वांद्रे स्टेशनला थांबलो होतो. सकाळची वेळ असल्यामुळे अर्थातच पूर्ण स्टेशन माणसांशी भरून गेलं होतं. ऑफिसला उतरण्यासाठी मला मधल्या डब्यात बसणं सोयीस्कर असल्यामुळे मी लेडीज डब्याच्या मागे असणाऱ्या डब्याकडे ट्रेनची वाट पाहत उभा होतो.

इतक्यात माझ्या बाजूला काही अंतरावर उभ्या असलेल्या एका महिलेचं तान्हं बाळ रडायला लागलं. बाळाच्या रडण्याच्या आवाजामुळे साहजिकच सगळ्यांचं लक्ष तिकडे गेले. बाळाकडे एक कटाक्ष टाकून सगळेजण आपल्या मोबाइलमध्ये, पेपरमध्ये पाहू लागले. थोड्यावेळाने ते बाळ रडण्याचं काही थांबत नव्हतं. आजूबाजूच्या महिलांनीही त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ते शांत होण्यापेक्षा जास्तच रडत होते. त्या आईची परिस्थिती तर पाहण्यासारखी होती. तिने बॅगेतली दुधाची बाटली काढली आणि बाळाच्या तोंडात दिली. पण ते बाळ दूधही पीत नव्हतं.

अखेर तिथल्या महिलांच्या घोळक्यातल्या एका आजीने तिला अंगावरचं दूध पाजायला सांगितलं. तिने सुरुवातीला फक्त हो हो म्हटलं, पण बाळ रडण्याचं शांत होत नाही हे लक्षात येता ती बाळाला घेऊन स्टेशनवरच्याच एका बाकडावर बसली आणि बाळाला पाजू लागली. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी महिलेला बाळाला पाजताना पाहिलं की तिला मॅनर्स नाहीत, अशिक्षित आहे.. एवढ्या लहान बाळाला ट्रेनमधून फिरवतातच का असे अनेक प्रश्न विचारून हैराण करतात. ही घटना घडेपर्यंत मीही त्यांच्यापैकीच एक होतो.

ती महिला शिक्षित होती की अशिक्षित.. सुसंस्कृत होती की नव्हती या नको त्या प्रश्नात अडकण्यापेक्षा ती एक स्त्री होती आणि पाच ते सहा महिन्याच्या बाळाची आई होती हेच महत्त्वाचं आहे. ती बाकड्याच्या कडेला बसून बाळाला पाजत होती. आता आपल्याकडे सार्वजनिक ठिकाणी बाळाला पाजायला बसल्यावर जे होतं तेच वांद्र्याच्या स्टेशनवर होत होतं. काही अपवाद वगळता येणारा जाणारा त्या बाईकडे कटाक्ष टाकून जातच होता. माझं त्या महिलेकडे कमी आणि तिच्याकडे पाहणाऱ्या पुरुषांकडे लक्ष जास्त होतं. आपल्या समाजाची मानसिकता कधी बदलणार हाच एक प्रश्न माझ्या मनात राहून राहून येत होता.

काहींनी तर तिच्याकडे अश्लिल नजरेने पाहायलाही कमी केलं नाही. आपला देश कधीच सुधारणार नाही या मतावर मी येतच होतो, इतक्यात २५ ते २७ वर्षांचा एक मुलगा माझ्यासमोर आला. हाही त्यांच्यापैकीच एक असं मला वाटत होतं. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांपैकी तो एक वाटत होता. जीन्स, टी-शर्ट, कानात इअरफोन्स आणि पाठीला बॅग लावून तो स्टेशनवर उभा होता. त्याने बॅगमधून पेपर काढला आणि तो अगदी सहजपणे त्या महिलेच्या समोर जाऊन उभा राहिला. मी त्याच्याकडेच पाहत होतो, तो नक्की काय करतोय हे माझ्या लक्षात येत नव्हतं.

तो पेपर महिलेला कव्हर करेल अशा पद्धतीने पूर्ण उघडला आणि तो अगदी सहजपणे पेपर वाचायला लागला. एका क्षणासाठी त्या महिलेलाही कळलं नाही की ही व्यक्ती कोण आणि ती अचानक माझ्यासमोर का आली.. पण नंतर काही सेकंदांमध्येच तिला त्या मुलाचा हेतू लक्षात आल्यावर ती फार रिलॅक्स झाली. त्याच्या या कृतीने ती बाई आता पटकन कोणाच्या डोळ्यात येत नव्हती आणि शांतपणे आपल्या मुलाला पाजू शकत होती. त्याची ही काही मिनिटांची कृती पाहून मला खरंच धक्का बसला. ही गोष्ट माझ्या का लक्षात आली नाही… मी अशा पद्धतीने का विचार केला नाही…??? याचाच मला प्रश्न पडला. त्याच्या त्या दोन-तीन पावलांच्या कृतीने माझी विचार करण्याची पद्धतच बदलून टाकली.

प्रत्येक द्रौपदीला असा एखादा कृष्ण भेटायलाच हवा..!!

– गौरव गद्रे 

संग्राहक – सुश्री मीनल केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments