सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ एका रेषेच्या पलिकडे..भाग 2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆
खेड्यावरुन मोहन माधव आळीपाळीने फेर्या मारत.इथेच रहात.आक्का सकाळी नानांचं अटोपून आंघोळीला वगैरे घरी येत.
सुनबाईची धांदल चाललेली असायची.नातींचे अभ्यास.एकीकडे स्वयंपाक.नाश्ते.नानांचा डबा.अॉफीसात जाताजाता डबा पोहचता करायचा .सारं काही घड्याळाबरहुकुम. वेळेवर. रोजच. मिनीटाचाही फरक नाही.
आक्का आल्या की स्वयंपाक घराच्या खूर्चीवर बसत.
सुनबाई ओट्याजवळ.भाजी चिरणे.डाळ तांदुळ धुणे.
“..कां ग आज पारुबाई आल्या नाहीत?”
“आल्यात ना दळण आणायला गेल्यात..”
“तू आतापासून का स्वयंपाक करुन ठेवतेस? भाऊ जेवायला येईपर्यंत गार नाही होत? नानांचा डबाही आतापासून भरुन ठेवतेस..त्यांनाही थंड जेवण…राम राम!!..”
“मीआॉफीसात गेल्यावर कोण करणार? आणि नानांचं जेवण गार नाही होत.या टिफीनमधे गरम राहतं.. नानांनी कधी तक्रार केली का?”
आक्का जरा बिचकल्या.
“असेल बाई.आता सारंच बदललंय्.आमच्या वेळी , नव्हतं बाई असं काही.तुझ्या सासर्याला तर इथे भाजी अन् इथे पोळी लागायची. सारं काही गरम आणि नरम. चिकीत्सा तरी किती? शिवाय कुणी वाढलेलं चालायचं नाही. केलेलं चालायचं नाही.तूच कर सारं….”
सूनबाई ओठातच हसायची. काहीच बोलायची नाही.
“चहा देऊ कां आई तुम्हाला?”
“दे बाई थोडा.सकाळी दवाखान्यात पाठवलेलाचहा काही प्यायलासारखा वाटत नाही.आणि थोडी साखर घाल बाई,दूध नको फार….”
सूनबाई सारं काही हसत मुखानं करायची.चहाचा कप,
गरम पोहे तिने आक्कांसमोर प्रेमाने ठेवले.
पोहे खाता खाता आक्का मधेच थांबल्या…
“केव्हढा मोठा ग केस? दुसर्यांदा आला बघ. कसं काम तुझ.? बाई ग ,आमच्या आजे सासुबाई होत्या…डोळ्यांना धड दिसायचं नाही,पण खाताना केस आला तर घर डोक्यावर घ्यायच्या,.. नुसत्या थरथरायचो आम्ही त्यांच्यापुढे… कसलं स्वातंत्र्य नव्हतंच आम्हाला दूध काढून भांडं खरडलेली साय सुद्धा खायला जीव धडधडायचा. गेले ग बाई ते दिवस!! आतां तुमचे नवे संसार. आमच्या सारखं तुम्ही सोसलं तरी काय??”
मग आक्का भराभर खाणंपिणं संपवायच्या.नळाखाली कपबशी धुवायच्या .पालथी ठेवायच्या.हात झटकत आतल्या खोलीत जाऊन ,अंगावर शाल पांघरुन अंमळ पडायच्या…
सुनबाईंला माहीत असायचं,नानांनी रात्री झोपू दिलं नसेल त्यांना..आक्कांना जाग्रण सहन होत नाही. शिवाय दवाखान्यातले वास ,वर्दळ ..आक्कांना शांत झोप मिळते कुठे?नानांनी दहा वेळा उठवलं असेल…कूस बदलून दे..पाय जवळ कर..एक ऊशी कमी कर. नाना तरी काय करतील?त्यांचीही करुणा येते.वार्धक्य. असहाय्य .अगतिक.नाना आणि आक्का दोघेही.पिकलेले.कुणी कुणाची सेवा करायची?तशीअवतीभवती मुलं होती.सुना होत्या.सारेजण झटत होते.पण आयुष्याचा एक हिस्सा होता.तो मात्र फक्त त्या दोघांचाच होता.एका रेषेच्या पलीकडे त्या दोघांना फक्त एकमेकांचीच सोबत होती….
क्रमश:…
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈