सौ.गौरी गाडेकर
☆ पुस्तकांवर बोलू काही ☆
☆ आकाशवीणा – सौ वीणा आशुतोष रारावीकर ☆ परिचय – सौ.गौरी गाडेकर ☆
पुस्तकाचे नाव : आकाशवीणा
लेखिका : वीणा आशुतोष रारावीकर
प्रकाशक :ग्रंथाली प्रकाशन
किंमत :₹100/-
पदार्थविज्ञान, संगणक तंत्रज्ञान व व्यवस्थापन या विषयांत उच्च शिक्षण घेऊन आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये, विविध देशांत काम करण्याचा दांडगा अनुभव असलेल्या वीणा आशुतोष रारावीकर यांचा ‘आकाशवीणा’ हा स्फुट लेखसंग्रह आहे.
या पुस्तकाचं वैशिष्ट्य त्याच्या नावापासूनच सुरू होतं. आकाशवाणीवर वीणा यांनी साधलेला संवाद म्हणजे आकाशवीणा. कारण खरं तर, मुळात हे लेख नसून ‘ रेडिओ विश्वास ‘ वरून प्रसारित झालेल्या ‘ वीणेचे झंकार ‘, या वीणा यांनी सादर केलेल्या भाषणमालेतील भाषणं आहेत.
यात वीणांनी हाताळलेल्या विषयांतील वैविध्य वाचकाला थक्क करून टाकतं.
सौ. वीणा आशुतोष रारावीकर
‘कहानी टिफिन की’ या मातेच्या मनाला भिडणाऱ्या विषयापासून ते ‘सफर दिल्लीची’, ‘गोष्ट मुंबईची’ वगैरे त्या त्या शहराचं वैशिष्ट्य सांगणारे लेख यात आहेत.राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य, माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी सुरू केलेल्या ‘चांगुलपणाच्या चळवळी’वर दोन भाग आहेतच, शिवाय चांगुलपणाशी निगडित असणारे ‘मातृदिन ‘, ‘जन्म एका विशेष मुलाचा ‘, ‘दानयज्ञ’ वगैरे इतर लेखही आहेत. त्याचप्रमाणे, ‘आरशात पाहताना’, ‘आयुष्य जगण्याचा दुसरा चान्स मिळतो तेव्हा’चे तीन भाग,’ गीत माझ्या मनीचे ‘, ‘ ‘च’ची भाषा ‘, ‘ काळजी आणि अपराध’, ‘ रागाला निरोप देताना’, ‘ न्यायाधीश’, ‘स्पेस’ वगैरे लेख ताणतणावांचं नियोजन कसं करावं, याचं उत्तम मार्गदर्शन करतात. ‘चालढकल’ सारखा टाईम मॅनेजमेंटवरील लेखही यात आहे.
काही वेळा विषय थोडक्यात आटोपल्याची चुटपुट लागते. पण मुळात हे रेडिओवरील कार्यक्रम असल्यामुळे यात शब्द आणि वेळ यांचं उत्तम गणित अपेक्षितच आहे.
लेख छोटेखानी असल्यामुळे व भाषा सुलभ,सुंदर, संवाद साधल्यासारखी असल्यामुळे पुस्तक पटकन वाचून होतं.
हे पुस्तक वाचनीय तर आहेच, शिवाय मनोरंजनाबरोबरच विचार करायला व त्यानुसार आचार करायला लावण्याचं सामर्थ्यही त्यात आहे. हे वाचत असताना एखाद्या गोष्टीकडे वेगळ्याच नजरेने पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला मिळतो.
मोठ्यांप्रमाणेच संस्कारक्षम वयाच्या विद्यार्थ्यांनाही हे पुस्तक आवडेल. त्यांच्या मूल्यवर्धनास या संग्रहाचा नक्कीच हातभार लागेल.
अशाच प्रकारची आणखीही पुस्तकं वीणांनी लिहावीत, या शुभेच्छा.
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
Really a nice book…